जपानला मिळणार पहिल्या महिला पंतप्रधान? पक्षाकडून ताकाईची यांची निवड

0

शनिवारी, जपानमधील सत्ताधारी पक्ष ‘LDP’ (लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी) ने, आपल्या नव्या नेत्या म्हणून माजी आर्थिक सुरक्षामंत्री- सनेई ताकाईची यांची निवड केली, ज्यामुळे जपानच्या पहिल्या पंतप्रधान बनण्यासाठीचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

जागतिक स्तरावर, स्री-पुरुष समानतेमध्ये सातत्याने मागे असणाऱ्या या देशात, ताकाईची यांचा उदय हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. कारण, त्या जपानच्या रुढीवादी आणि पुरुषप्रधान राजकारणात इतक्या वरच्या स्थानावर पोहोचलेल्या पहिल्या महिला नेत्या ठरल्या आहेत.

एलडीपीने घेतलेल्या पक्षांतर्गत, ताकाईची यांनी कृषीमंत्री शिंजीरो कोइझुमी यांच्यावर मात केली. शिंजीरो, हे लोकप्रिय माजी पंतप्रधान जुनिचिरो कोइझुमी यांचे पुत्र आहेत. शनिवारी झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत हा निकाल लागला.

ताकाईची या पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची जागा घेणार आहेत. एलडीपीला, गेल्या काही महत्वाच्या निवडणुकांमधील पराभवामुळे घटलेले जनसमर्थन परत मिळवायचे आहे आणि पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे, त्याच पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आल्याचे समजते.

जपानच्या कनिष्ठ संसद सभागृहात, LDP कडे ठोस बहुमत असल्यामुळे ताकाईची यांचे पंतप्रधान होणे निश्चित असल्याच्या चर्चा आहेत. याशिवाय, विरोधकांचा जोर कमी पडत असल्यामुळे, ताकाईची यांच्या पंतप्रधानपदाचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे.

‘ताकाईची पर्वाची’ सुरुवात

4 ऑक्टोबर 2025 रोजी, टोकियो येथील एलडीपी मुख्यालयात विजय साजरा करतेवेळी, ताकाईची यांनी घोषणा केली की, “जपानच्या सत्ताधारी पक्षासाठी एक ‘नवे पर्व’ सुरू झाले आहे.” “आपण सर्वांनी परस्पर सहकार्याने, एलडीपीसाठी एका नव्या युगाचा आरंभ केला आहे” असे म्हणत, त्यांनी पक्षातील एकजूट आणि नवचैतन्यावर भर दिला.

ताकाईची यांची निवड, ही जपानच्या राजकीय इतिहासातील एक महत्वपूर्ण घडामोड ठरली आहे. या निवडीनंतर, त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर भक्कमपणे पाऊल ठेवत आहेत.

मागील काही संसदीय निवडणुकांमधी सततच्या पराभवांमुळे, एलडीपीचे बहुमत दोन्ही सभागृहांत कमी झाले होते, पक्षाला एका अशा नेतृत्वाची गरज होती, जे ‘अंतर्बाह्य’ आव्हानांना ठामपणे सामोरे जाऊ शकेल. यासोबतच, महत्त्वाच्या विरोधी पक्षांशी सहकार्यपूर्ण संबंध ठेवत, धोरणात्मक सातत्य राखण्याचे उद्दिष्टही आता पक्षाने डोळ्यांसमोर ठेवले आहे.

माजी आर्थिक सुरक्षा मंत्री असलेल्या ताकाईची, या परंपरावादी राष्ट्रवादी नेत्या असून, त्यांचा दृष्टिकोन उद्यमशील आणि विस्तारवादी आहे. संसदेत एलडीपीचा अजूनही चांगला प्रभाव असल्यामुळे, पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यानंतर, ताकाईची यांचे अधिकृत पदग्रहण निश्चित मानले जात आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleहमासचा शांततेला पाठिंबा; इस्रायलने हल्ले थांबवावेत- ट्रम्प यांचे आवाहन
Next articleImmense Opportunities For UK & Indian Defence Sector In Combat Air, Complex Weapons and Maritime Technologies: Jeremy Quin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here