पाकिस्तानसोबत संरक्षण सहकार्य बळकट करण्यात मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांना स्वारस्य असल्याचे पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी जाहीर केले. पाकिस्तानी लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार मलेशियन पंतप्रधानांनी लष्करप्रमुख (सीओएएस) जनरल असीम मुनीर यांचीही अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत भेट घेतली. या बैठकीत द्विपक्षीय धोरणात्मक हितसंबंध, प्रादेशिक सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य यावर चर्चा झाली.
पंतप्रधान इब्राहिम यांनी प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य राखण्यात पाकिस्तानच्या सशस्त्र दलांच्या भूमिकेची प्रशंसा केली. निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादाविरोधातील लढाईत सैनिक देत असलेल्या व्यावसायिकतेची आणि बलिदानाचीही त्यांनी प्रशंसा केली.
दोन्ही मित्र देशांमधील संबंध, विशेषतः लष्करी संबंध वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिल्याचे लष्कराने म्हटले. मलेशियन पंतप्रधानांनी देखील याच संदर्भात सीओएएसना मलेशियाला भेट देण्याचे आमंत्रण दिले.
मुनीर यांनी हे निमंत्रण दिल्याबद्दल मलेशियन पंतप्रधानांचे आभार मानले आणि पाकिस्तानच्या यशस्वी दौऱ्याचे कौतुक केले, या दौऱ्यामुळे दोन्ही देश आणि त्यांच्या सैन्यांमधील चिरस्थायी आणि ऐतिहासिक संबंध आणखी सुधारण्यास मदत होईल.
त्याआधी गुरुवारी मलेशियाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या तीन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान काश्मीरवरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाला आपल्या देशाच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.
“काश्मीरच्या संदर्भात, आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत, तसेच मानवी हक्कांची काळजी ही आमच्यासाठी नक्कीच प्राथमिकता आहे”, असे इब्राहिम यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
त्यांचा संदर्भ 1948 च्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाला उद्देशून होता. ते पुढे म्हणाले की, मलेशिया काश्मीरचा मुद्दा “स्वीकारार्ह मार्गांद्वारे” मांडत राहील आणि आशा आहे की हा मुद्दा “सौहार्दपूर्णपणे सोडवला जाईल.”
टीम भारतशक्ती