भारत आणि मालदीव यांच्यात तणावाचे वातावरण असतानाच 10 मे नंतर मालदीवमध्ये गणवेश किंवा नागरी पोशाखातील एकही भारतीय लष्करी कर्मचारी राहणार नाहीत, याचा पुनरुच्चार राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांनी पुन्हा एकदा केल्याचे मालदीवच्या एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
10 मे नंतर आपल्या देशात, गणवेशातील असो किंवा नागरी पोशाखातील, एकही भारतीय सैनिक असणार नाही. कोणत्याही प्रकारच्या पोशाखातील भारतीय सैन्य या देशात राहणार नाही, हे मी आत्मविश्वासाने सांगतो”, असे ते म्हणाले.
दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान चालवत राहण्यासाठी भारतीय तांत्रिक कर्मचारी मागच्याच आठवड्यात मालदीवला पोहोचले, त्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी हे विधान केले आहे.
आपले सरकार भारतीय सैन्याला देशाबाहेर हाकलून देण्यात यशस्वी झाले आणि त्यामुळे लोक खोट्या अफवा पसरवत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
काही लोक म्हणतात की हे लोक (भारतीय सैन्य) सोडणार नाहीत, ते नागरी कपड्यांमध्ये गणवेश बदलून परतत आहेत. म्हणून मी एवढेच म्हणेन की, ज्या गोष्टी आपल्या मनात संशय निर्माण करतात आणि खोटे पसरवतात त्याकडे आपण लक्ष देऊ नये, असे चीन समर्थक नेते म्हणून ओळखले जाणारे मुइज्जू म्हणाले.
राष्ट्रपती मुइज्जू यांच्या आग्रहामुळे, भारत सरकारने भेट दिलेल्या दोन हेलिकॉप्टर्स आणि वैद्यकीय, मानवतावादी आणि पाळत ठेवण्याच्या मोहिमांसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानासाठी लष्करी वैमानिक आणि कर्मचाऱ्यांच्या जागी नागरिकांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे.
अलिकडेच मालदीव आणि चीनने दोन लष्करी करारांवर स्वाक्षऱ्या करून त्यांचे द्विपक्षीय संबंध मजबूत केले आहेत. चीन मालदीवला विनामूल्य लष्करी सहाय्य पुरवेल या व्यतिरिक्त कराराचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. राष्ट्रपती मुइज्जू यांनी आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य कार्यालयाचे उपसंचालक मेजर जनरल झांग बाओकुन यांचीही भेट घेतली. चीनच्या वतीने लष्करी करारांवर बाओकुन यांनीच स्वाक्षऱ्या केल्या आहेत
नुकत्याच झालेल्या चीन दौऱ्यात मुइज्जू यांनी दावा केला की, बीजिंगने हिंद महासागरातील मालदीव बेटाच्या सार्वभौमत्वाला पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि कोणताही देश या राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकू शकणार नाही, असे अप्रत्यक्षपणे भारतावर टीका करताना सांगितले.
लष्करी हेतूंसाठी हिंद महासागर प्रदेशातून माहिती गोळा करण्यासाठी चीन जहाजाचा वापर करू शकते अशी शक्यता असूनही अलीकडेच, मालदीवने एका चिनी संशोधन जहाजाला माले बंदरातील गोदीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली.
मुइज्जू यांचा पीएनसी पक्ष अलीकडेच राजधानी मालेच्या महापौरपदाची निवडणूक हरला. आता 21 एप्रिल रोजी मालदीवमध्ये संसदीय निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत त्यांचा पक्षाची (पी. एन. सी.-पीपल्स नॅशनल काँग्रेस) स्थिती सुधारेल आणि तो आपल्या संसदीय निवडणुकीच्या अजेंड्याचा पाठपुरावा करू शकेल, अशी मुइज्जू यांना आशा आहे. सध्या 93 सदस्यांच्या संसदेत माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह यांच्या मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे (एम. डी. पी.) वर्चस्व आहे.
रामानंद सेनगुप्ता