पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) एका स्थानिक व्यक्तीवर खोटी माहिती ऑनलाइन पसरवल्याबद्दल सायबर गुन्ह्यांचा आरोप दाखल केला आहे. या खोट्या माहितीमुळेच ब्रिटनमध्ये दंगली उसळल्या, असे बुधवारी जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
जुलैच्या उत्तरार्धात उत्तरेकडील ब्रिटन शहर साऊथपोर्टमध्ये चाकू हल्ल्यात तीन तरुण मुलींच्या हत्येसाठी एका इस्लामी स्थलांतरिताला चुकीच्या पद्धतीने दोषी ठरवत खोटी माहिती ऑनलाइन प्रसारित झाल्यानंतर दंगली सुरू झाल्या.
एफआयएने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेब प्रकाशन चालवणाऱ्या फरहान आसिफला पूर्व पाकिस्तानातील लाहोर शहरात अटक करण्यात आली.
आसिफने त्याच्या एक्स सोशल मीडिया खात्यावर एक लेख पोस्ट केला ज्यामध्ये हल्लेखोर मुस्लिम स्थलांतरित असल्याचे म्हटले होते आणि हत्यांची छायाचित्रेही त्याने शेअर केली होती.
एफआयएने म्हटले आहे की, दुसऱ्या एक्स खात्यातून बनावट मजकूर उचलल्यानंतर, “ब्रिटनमधील साउथपोर्ट येथे चाकू हल्ल्याच्या घटनेत पोलिसांनी एका मुस्लिम निर्वासिताला अटक केल्याच्या घटनेचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने त्याच्या स्वतःच्या ट्विटर (एक्स) खात्याचा वापर करून माहिती प्रसारित केली आणि त्यामुळे भीती, दहशत, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.”
एफआयएने असेही सांगितले की, खोट्या बातम्या पसरवणारे ते खाते आसिफचे असल्याचे सिद्ध झाले आहे. याशिवाय त्याने ही खोटी माहिती परदेशी प्रकाशनालादेखील दिल्याची कबुली दिली आहे.
आसिफकडून अद्याप वकिलाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तो आणि त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्ती प्रतिक्रियेसाठी त्वरित उपलब्ध झाले नाहीत. तसेच रॉयटर्सने संदेश पाठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे एक्स खाते देखील उपलब्ध नव्हते.
न्यायालयाने आरोपीला पुढील तपासासाठी बुधवारी एका दिवसासाठी एफआयए कोठडीत पाठवल्याचे निवेदनात म्हटले आहे.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)