‘जॉइंटनेस-२.०’: सशस्त्रदलांत संयुक्त परिचालन यंत्रणा राबविण्याबाबत पुढचे पाऊल
दि. २१ मे: भारताच्या सशस्त्रदलांची वाटचाल आता संयुक्त परिचालन यंत्रणा निर्माण करण्याकडे सुरु झाली असून, सशस्त्रदलांनी आपल्यात संयुक्त संस्कृती बाणविण्याची गरज आहे. या माध्यमातून तयार होणाऱ्या ‘थिएटर कमांड’मुळे आपल्या सशस्त्रदलांमध्ये भविष्यातील युद्धासाठीची सिद्धता निर्माण होईल, असे प्रतिपादन संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केले. नवी दिल्लीतील ‘युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन’ या लष्कर आणि सामरिक विषयक विचार समूहाने आयोजित केलेल्या २२ व्या मेजर जनरल समीर सिन्हा स्मृति व्याख्यानात ते ‘जॉइंटमनशिप: द वे अहेड’ या विषयावर ते बोलत होते.
जनरल अनिल चौहान म्हणाले, की ‘जॉइंटनेस-१.०’चा पुढाकार तिन्ही सेनादलांमधील संबंध सुधारण्यासाठी आणि त्यांच्यात एकवाक्यता आणि एकमत तयार होण्यासाठी घेण्यात आला होता. हे करताना तिन्ही सैन्यदलांनी आपापली उत्तम कामगिरी नोंदविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात काही मोठे मतभेद निदर्शनास आले नाहीत. तर, ही प्रक्रिया आता पुढच्या टप्प्यावर म्हणजे ‘जॉइंटनेस-२.०’च्या स्तरावर घेऊन जाण्यावरच त्यांचा भर दिसला. जनरल चौहान यांनी या वेळी तिन्ही सैन्यदलांमध्ये असलेल्या स्वतंत्र कार्यपद्धतीबद्दलही चर्चा केली आणि त्यांचे स्वरूप पाहता अशी पद्धती असण्यात काहीच गैर नाही, असेही ते म्हणाले. मात्र, आता आपल्याला ‘चौथ्या संस्कृतीकडे जाणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ‘तिन्ही सैन्यदलांच्या समन्वयामुळे एक संयुक्त कार्यपद्धती विकसित होईल. ही कार्यपद्धती तिन्ही सैन्यदलांतील विशिष्ट कार्यपद्धतीपेक्षा वेगळी असली, तरी, संबंधित दलाच्या कार्यपद्धतीचा मान राखण्यात येईल. त्यामुळे लष्कर, नौदल आणि हवाईदलाकडील सर्वोत्तम बाबी घेऊन त्यामधून एक सर्वांना जोडणारा एक सामायिक धागा निवडावा लागेल,’ असे ते म्हणाले. ही पद्धती तयार करण्यासाठी विविध पुढाकार सैन्यदलांच्या स्तरावर घेतले जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
General Anil Chauhan, #CDS speaks on ‘𝐉𝐨𝐢𝐧𝐭𝐧𝐞𝐬𝐬 : 𝐓𝐡𝐞 𝐖𝐚𝐲 𝐀𝐡𝐞𝐚𝐝’ at the 22nd Samir Sinha Memorial Lecture at USI, New Delhi. #Jointness 2.0, a move towards developing a Joint Culture in the #IndianArmedForces, distinct from individual Service culture, is the… pic.twitter.com/3BUFIAum6Z
— HQ IDS (@HQ_IDS_India) May 21, 2024
कार्यकारी आणि एकात्मिक ‘थिएटर कमांड’च्या निर्मितीसाठी सामायिकता आणि एकात्मिक दृष्टीकोन ही पहिली पायरी आहे, असे सांगून अशा कमांडचे महत्त्वही त्यांनी विषद केले. अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे संबंधित कमांड त्याच्या परिचालन विषयक बाबी ‘उभे करा-प्रशिक्षण द्या-शाश्वत ठेवा’ (आरटीएस) या कसरतीपासून स्वतंत्र ठेवू शकेल आणि इतर प्रशासकीय बाबींचाही त्याच्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे ऑपरेशनल कमांडरच्या स्तरावर त्याला सुरक्षा विषयक बाबींवर लक्ष केंद्रित करायला अधिक वेळ मिळेल, असे जनरल चौहान यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘थिएटर कमांड’ची प्रस्तावित रचना हा सशस्त्रदलांतील बदलांचा शेवट नाही, तर सुरुवात आहे. एकात्मिक ‘थिएटर कमांड’मुळे विशिष्ट किंवा बहुक्षेत्रीय मोहिमा, अवकाश आणि सायबर स्पेस यांचा पारंपारिक युद्धपध्दतीबरोबर मिलाफ, युद्धभूमीवरील माहितीचे डीजीटायझेशन, इंटरनेटवरील विदा (डाटा) या सर्वांचा वापर असे बदल घडतील, असे त्यांनी नमूद केले.