म्यानमारमध्ये मृतांचा आकडा वाढला; मुसळधार पावसासाठी बचावकर्ते सज्ज

0
म्यानमारमध्ये

म्यानमारमध्ये भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 3 हजाराच्या पुढे गेली असून अजूनही शेकडो नागरिक बेपत्ता आहेत. बचाव आणि मदत प्रयत्नांमध्ये अनेक अडथळे येत आहेत. अनपेक्षित पावसामुळे या देशातील बाधित भागांमध्ये प्रवेश करणे कठीण होण्याचा धोका आहे.

गेल्या शुक्रवारी झालेल्या 7.7 तीव्रतेच्या शतकातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक मानल्या गेलेल्या या भूकंपाने 2 कोटी 80 लाख लोकसंख्या असलेल्या म्यानमारला मोठा धक्का   बसला, अनेक इमारती कोसळल्या, अनेक स्थानिक बाधित झाले आणि अनेकांना अन्न, पाणी आणि निवाऱ्याशिवाय राहावे लागले आहे.

जपानमधील म्यानमारच्या दूतावासाने फेसबुकवर सांगितले की, बुधवारपर्यंत मृतांची संख्या 3 हजार 3 वर पोहोचली, जखमींची संख्या 4 हजार 515 असून 351 अद्यापही  बेपत्ता आहेत. त्यामुळे बचावकर्ते त्यांचा  शोध घेण्यासाठी धडपडत आहेत.

मात्र हवामान अधिकाऱ्यांनी रविवारपासून 11 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे मदतकार्यात आणखी अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे मंडाले, सागाइंग आणि राजधानी नायपिडॉ यासारख्या भूकंपाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांमध्ये आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

“पाऊस सुरू आहे आणि अजूनही बरेचजण दबलेले आहेत,” असे म्यानमारमधील एका मदत कर्मचाऱ्याने रॉयटर्सला सांगितले. “आणि मंडालेमध्ये, विशेषतः, जर पाऊस सुरू झाला, तर जे लोक या टप्प्यापर्यंत  दबलेले असूनही जिवंत राहिले असले तरी ते बुडून मरण्याचा धोका अधिक आहे.”

म्यानमारला 53 विमानांनी मदत पाठवण्यात आली आहे, असे जपानमधील दूतावासाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, तर आग्नेय आशियाई शेजारील देश तसेच चीन, भारत आणि रशियासह 15 देशांमधून 1 हजार 900 हून अधिक बचाव कर्मचारी आले आहेत.

राज्य दूरचित्रवाणीने सांगितले की, एवढा विध्वंस होऊनही, जुंटा प्रमुख मिन आंग ह्लाइंग गुरुवारी बँकॉकमधील प्रादेशिक शिखर परिषदेच्या दौऱ्यासाठी त्याच्या आपत्तीग्रस्त देशातून रवाना होतील.

पाश्चिमात्य निर्बंधांचा आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या तपासाचा विषय असलेल्या, अनेक देशांद्वारे एकप्रकारे वाळीत टाकल्या गेलेल्या जनरलसाठी ही एक ऐतिहासिक परदेशी भेट आहे.

अवकाळी पाऊस

अवकाळी पावसामुळे मदत आणि बचाव गटांना भेडसावणाऱ्या आव्हानांमध्ये आणखी भर पडणार आहे कारण गृहयुद्धामुळे संघर्ष असूनही सर्व प्रभावित भागात पोहोचण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

नोबेल पारितोषिक विजेती आंग सान सू की यांच्या निवडून आलेल्या नागरी सरकारला पदच्युत करणाऱ्या 2021 च्या सत्तापालटात लष्कराला देश चालवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.

देश ताब्यात घेतल्यापासून सेनापती आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडले आहेत आणि संघर्षादरम्यान म्यानमारची अर्थव्यवस्था तसेच आरोग्यसेवेसह मूलभूत सेवा कोलमडल्या आहेत.

बुधवारी सरकारी एमआरटीव्हीने सांगितले की भूकंपानंतरच्या मदतकार्यांना पाठिंबा देण्यासाठी एकतर्फी सरकारी युद्धविराम 20 दिवसांसाठी त्वरित लागू होईल, परंतु बंडखोरांनी हल्ले केल्यास अधिकारी “त्यानुसार प्रत्युत्तर देतील” असा इशारा दिला.

मानवतावादी प्रयत्नांना मदत करण्यासाठी बंडखोरांच्या एका मोठ्या आघाडीने मंगळवारी युद्धबंदी जाहीर केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.

भूकंप झाल्यानंतर जवळपास एका आठवड्याने, शेजारील थायलंडमधील तपासकर्त्यांनी राजधानी बँकॉकमधील गगनचुंबी इमारतीचे बांधकाम सुरू असताना कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली  शोधकार्य सुरू केले आहे.

बचावकर्ते यांत्रिक खोदकाम आणि बुलडोझरचा वापर करून 100 टन काँक्रीट तोडत आहेत, ज्यामुळे 15 लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आणि 72 जण अजूनही बेपत्ता असलेल्या दुर्घटनेनंतर जिवंत असलेल्यांचा शोध घेतला जाऊ शकतो.

थायलंडमध्ये मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleTikTok खरेदीच्या बोलीमध्ये Amazon, OnlyFans चे संस्थापकही सामील
Next articleIsrael To Seize Parts Of Gaza As Military Operation Expands

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here