मंगळवारी (स्थानिक वेळेनुसार) उत्तर कोरियाने संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर जपानने आपत्कालीन इशारा जारी केला.
जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली.
काही मिनिटांनंतर, जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, उत्तर कोरियाकडून येणारे ‘संशयित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र’ जपानपर्यंत पोहोचण्याची शक्यता नसल्याने आपत्कालीन इशारा मागे घेतला जात आहे.
मात्र माहिती गोळा करून, तिचे विश्लेषण करण्यासाठी तसेच लोकांना लवकरात लवकर आणि योग्य माहिती पुरवण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्या आहेत
विमान आणि जहाजांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी तसेच आकस्मिक परिस्थितीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
उत्तर कोरियाकडून वारंवार होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाच्या चिंता आधीच वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने एका संयुक्त निवेदनात, इंडो-पॅसिफिक जलक्षेत्रातील स्थिती बदलण्याच्या कोणत्याही एकतर्फी प्रयत्नांना “तीव्र विरोध” केला आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तर कोरियाने नुकत्याच केलेल्या प्रक्षेपणांचा “तीव्र निषेध” केला.
उत्तर कोरिया आणि प्रादेशिक तसेच जागतिक स्थिरतेसाठी इतर आव्हानांबाबत कायमस्वरूपी समन्वय ठेवण्यावर अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली. त्यांची धोरणे अधिक सुसंगत करण्यासाठी एक नवीन समन्वय संस्था स्थापन करण्याच्या योजनेवरही त्यांनी सहमती दाखवली आहे.
दरम्यान, अमेरिका आणि जपानने वॉशिंग्टन आणि टोकियो यांच्यातील धोरणात्मक जागतिक सहकार्याच्या नव्या युगाच्या महत्त्वावर भर दिला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, अमेरिका, जपान आणि कोरियाने इंडो-पॅसिफिक प्रदेशातील क्षमता बांधणीला पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित करून आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्रिपक्षीय सागरी सुरक्षेसाठी सुरू असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
अमेरिका-जपान-कोरिया प्रजासत्ताक यांच्यातील त्रिपक्षीय इंडो-पॅसिफिक संवाद 5 जानेवारी रोजी वॉशिंग्टन डी. सी. येथे आयोजित करण्यात आला होता. हा संवाद तिन्ही देशांच्या भागीदारीतील एक नवीन अध्याय असून जागतिक स्तरावर धोरणे बळकट करण्यासाठी आणि अधिक जवळून त्यासाठी काम करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्सह)