व्हाइस ॲडमिरल गुरचरणसिंग ‘एनडीए’चे नवे कमांडंट

0
National Defence Academy-Commandant
व्हाइस ॲडमिरल अजय कोचर यांच्याकडून व्हाइस ॲडमिरल गुरचरणसिंग (उजवीकडील) यांनी शनिवारी कमांडंटपदाची सूत्रे स्वीकारली.

दि. २५ मे: पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) समादेशकपदी (कमांडंट) भारतीय नौदलातील वरिष्ठ अधिकारी व्हाइस ॲडमिरल गुरचरणसिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘एनडीए’चे मावळते कमांडंट व्हाइस ॲडमिरल अजय कोचर यांच्याकडून व्हाइस ॲडमिरल गुरचरणसिंग यांनी शनिवारी कमांडंटपदाची सूत्रे स्वीकारली.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेल्या व्हाइस ॲडमिरल गुरचरणसिंग यांना १९९० मध्ये नौदलात कमिशन मिळाले. त्यांना तोफा आणि क्षेपणास्त्र विषयातील तज्ज्ञ मानले जाते. आपल्या ३४ वर्षांच्या सेवाकाळात व्हाइस ॲडमिरल गुरचरणसिंग यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदारी पार पडल्या आहेत. त्यांनी सागरी नियुक्तीच्या कालावधीत आयएनएस रणजीत आणि आयएनएस प्रहार या युद्धनौकांवर काम केले आहे. त्यांना भारतीय बनावटीच्या तीन युद्धनौकांवर सुरुवातीच्या काळात (कमिशनिंग क्रू)  काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी आयएनएस ब्रह्मपुत्रा या युद्धनौकेवर गनरी ऑफिसर, आयएनएस शिवालिक या युद्धनौकेवर कार्यकारी अधिकारी आणि आयएनएस कोची, आयएनएस विद्युत, आयएनएस कुकरी  या युद्धनौकांवर कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केले आहे. तर, नौदलाचा प्रशिक्षण तळ (गनरी स्कूल) असलेल्या आयएनएस द्रोणाचार्य येथे प्रशिक्षक व गोव्यातील नेव्हल वॉर कॉलेज येथे उपसमादेशक (डेप्युटी कमांडंट) म्हणूनही काम केले आहे. नौदल मुख्यालयात कार्मिक विभागाचे संचालक, नौदल मुख्यालयातील नौदल गुप्तवार्ता विभागाच्या मनुष्यबळ विभागाचे सहप्रमुख आदी जबाबदाऱ्याही पार पडल्या आहेत. त्यांची २०२२मध्ये पूर्व ताफ्याच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. या काळात त्यांनी पूर्व ताफ्याच्या कार्यक्षमतेत कमालीची सुधारणा घडवून आणली होती. ‘ऑर्डनन्स ऑन टार्गेट’ या मिशनमधून त्यांनी परिचालन कुशलता तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०२४मध्ये त्यांना व्हाइस ॲडमिरल पदावर बढती मिळाली. त्यांनी कार्मिक विभागाचे नियंत्रक म्हणून महत्त्वाचे काम केले.

व्हाइस ॲडमिरल गुरचरणसिंग यांना प्रशिक्षणकाळात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल ॲडमिरल कटारी करंडक प्राप्त झाला आहे. त्यांच्या कार्यकाळात आयएनएस कुकरीला नौदलप्रमुखांचे प्रशस्तीपत्र प्राप्त झाले. त्यांचा नौसेना मेडल आणि अति विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यांनी संरक्षण आणि सामरिकशास्त्र विषयात मास्टर्स आणि एमफील पदवी प्राप्त केली आहे. तसेच, डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजमधून स्टाफ कोर्स, नेव्हल वॉर कॉलेजमधून हायर कमांड कोर्स, नॅशनल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी मधून मेरीटाईम इंटेलिजन्स कोर्स व स्वीडनमधील स्टॉकहोममधून युनायटेड नेशन्स स्टाफ ऑफिसर्स कोर्स पूर्ण केला आहे.

 विनय चाटी


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here