नौदल कमांडर्स कॉन्फरन्स: संरक्षणमंत्र्यांनी सागरी सुरक्षेचा घेतला आढावा

0
नौदल कमांडर्स

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, यांनी 5 एप्रिल 2025 रोजी कर्नाटकातील कारवार येथे झालेल्या, 2025 च्या पहिल्या ‘नौदल कमांडर्स कॉन्फरन्स‘मध्ये सहभाग घेतला. कॉन्फरन्सच्या उद्घाटन सत्रादरम्यान, सिंह यांनी सागरी सुरक्षा परिस्थिती, भारतीय नौदलाची ऑपरेशनल तयारी आणि भविष्यातील नौदलाच्या सर्वसमावेशक दृषटिकोनाचा आढावा घेतला.

सिंह यांनी यावेळी नौदल कमांडर्सशी संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी समकालीन सुरक्षा संदर्भावर मार्गदर्शन केले तसेच नौदलाच्या युद्ध क्षमता वाढवण्यासाठी भविष्यातील योजनांवर चर्चा केली. सोबतच राजकीय, ऑपरेशनल आणि प्रशासकीय बाबींवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्यासोबत संरक्षण कर्मचारी प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख एडमिरल दिनेश के त्रिपाठी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘सध्याच्या अप्रत्याशित भूराजकीय परिस्थितीत सशस्त्र दलांच्या भविष्यातील भूमिकांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. 21 वे शतक हे आशियायी शतक आहे आणि भारताची भूमिका यात महत्त्वाची असेल असा उल्लेख करत’, राजनाथ सिंह यांनी म्हटले की, “इंडो-पॅसिफिक क्षेत्राक शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करणे ही आपली जबाबदारी आहे, कारण हा प्रदेश जगासाठी एक केंद्रबिंदू बनला आहे.”

आधुनिकीकरणावर बोलताना ते म्हणाले, “गेल्या 10-11 वर्षांपासून नौदलाच्या आधुनिकीकरणाचे काम ज्या वेगाने केले जात आहे ते अभूतपूर्व आहे. नवीन प्लॅटफॉर्म आणि अत्याधुनिक उपकरणांच्या समावेशामुळे आपले नौदल कौशल्य आणि आपल्या शूर खलाशांचे मनोबल लक्षणीयरित्या वाढले आहे. तुमच्या तयारीत आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत याची ही साक्ष आहे”.

संरक्षण मंत्रालयाने 2025 हे वर्ष ‘सुधारणांचे वर्ष’ म्हणून घोषित केल्यावर, सिंह यांनी सुधारणांबद्दलची त्यांची वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी सर्व भागधारकांकडून एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. “दोन प्रकारच्या सुधारणा आहेत. एक म्हणजे धोरणात्मक सुधारणा, ज्या मंत्रालयांच्या पातळीवर केल्या जातात. बरेच अधिकारी धोरणाशी संबंधित मुद्दे पाहतात, सर्वांकडून अभिप्राय घेतात आणि त्यानुसार धोरणे तयार करतात. दुसरा प्रकार म्हणजे जमिनीवरील सुधारणा. प्रशिक्षण, संशोधन आणि विकास, आर्थिक किंवा मनुष्यबळ सुधारणांशी संबंधित असो, या सर्वांमध्ये तुमची भूमिका सर्वात महत्वाची आहे. जोपर्यंत वरपासून खालपर्यंतचा दृष्टिकोन आणि खालपासून वरपर्यंतचा दृष्टिकोन यांचे एकत्रीकरण होत नाही तोपर्यंत आपण आपल्या सुधारणांचे ध्येय योग्य पद्धतीने साध्य करू शकणार नाही,” असे त्यांनी कमांडर्सना सांगितले.

ही परिषद सर्वोच्च पातळीवरील द्विवार्षिक घटना आहे, जी उच्चतम नौदल कमांडर्स दरम्यान महत्त्वपूर्ण रणनीतिक, ऑपरेशनल आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी देते. ती भारतीय महासागर प्रदेशात भारताच्या ‘प्राधान्य सुरक्षा भागीदार’ म्हणून भूमिकेला महत्त्व देण्यासाठी, तसेच नौदलच्या योगदानाने क्षेत्रीय शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

कॉन्फरन्सच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन 7 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान, नवी दिल्लीमध्ये केले जाणार असून, त्यामध्ये महत्त्वपूर्ण ऑपरेशनल स्टॅटर्जी, युद्ध सामग्री, लॉजिस्टिक्स, मानव संसाधन विकास, प्रशिक्षण आणि प्रशासकीय बाबींवर सखोल पुनरावलोकन केले जाईल. संरक्षण कर्मचारी प्रमुख, लष्कर प्रमुख आणि वायुसेना प्रमुख देखील कॉन्फरन्स दरम्यान नौदल कमांडर्सशी संवाद साधतील, ज्यामुळे तिन्ही सेवा दलांमधील सहयोग वाढवण्यासाठी आणि समन्वयाचे प्रयत्न अधिक मजबूत होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

कमांडर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अमिताभ कांत, यांच्याशी देखील परदेशी धोरण आणि आंतरराष्ट्रीय संवादाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. कॉन्फरन्सच्या या टप्प्यात भारतीय नौदलाचे आधुनिकीकरण, स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ ध्येयाशी सुसंगतपणे कार्य करणे, या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

– Ravi Shankar


Spread the love
Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
Next articleकारवार येथे IOS Sagar ला हिरवा झेंडा, Sea Bird प्रकल्पाचेही उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here