भारतीय नौदल आणि इस्रोने गेल्या आठवड्याच्या उत्तरार्धात “Well Deck” रिकव्हरी ट्रायल्स घेत गगनयान मोहिमेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. पूर्व नौदल कमांडने विशाखापट्टणमच्या किनाऱ्यालगत “Well Deck” जहाजाचा वापर करून या चाचण्या पार पाडल्या. जहाजाच्या डेकवर विहिरीसारखे पाणी भरून नौका, लँडिंग क्राफ्ट आणि पाण्यत उतरलेले अंतराळ यान जहाजामध्ये डॉक करण्यासाठी कशाप्रकारे आत नेले जाऊ शकते याच्या चाचण्या यावेळी घेण्यात आल्या.
गगनयान मोहिमेच्या शेवटी अंतराळवीर पाण्यातून प्रवास करून जमिनीवर येणार आहेत. त्यामुळे मोहीम संपल्यावर एकदा क्रू मॉड्यूल समुद्रात उतरल्यानंतर, क्रूला कमीत कमी वेळेत आणि त्यांना कमीत कमी त्रास होईल अशाप्रकारे परत आणावे लागणार आहे. त्यामुळे निवडलेल्या पर्यायांपैकी एक म्हणजे नौदलाच्या जहाजाच्या विहिरीत क्रू मॉड्यूलला क्रूसह ओढणे, जेथे क्रू मॉड्यूलमधून क्रू आरामात बाहेर येऊ शकतात.
वेल डेक रिकव्हरी करण्याच्या चाचण्या मास आणि शेप सिम्युलेटेड क्रू मॉड्यूल मॉक-अप वापरून केल्या गेल्या. चाचणी दरम्यान भारतीय नौदल आणि इस्रोने क्रू मॉड्यूलच्या वेल डेक चाचणीसाठी कामाची क्रमवारी केली. या क्रमामध्ये रिकव्हरी बॉय जोडणे, क्रू मॉड्यूलला ओढणे, वेल डेक जहाजात प्रवेश करणे, क्रू मॉड्यूलची स्थिरता निश्चित करणे आणि वेल डेकमधून पाण्याचा निचरा करणे या कामांच्या क्रमवारीचा समावेश आहे.
या सरावामुळे कामगिरीचा एकूण क्रम आणि ग्राउंड फिक्स्चर नक्की करणे आणि Standard Operating Procedures उत्तम प्रकारे समजून घ्यायला मदत होईल. या गुंतागुंतीच्या कामगिरीचा सराव करून, इस्रो आणि भारतीय नौदल सामान्य आणि अनपेक्षित अशा दोन्ही परिस्थितींसाठी त्यांच्या Standard Operating Procedures चा (SOP) उत्तम प्रकारे ताळमेळ बसावा असे उद्दिष्ट बाळगून आहेत.
ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांना गगनयान या देशाच्या पहिल्या क्रू स्पेस मिशनसाठी भारताचे क्रू मेंबर्स म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. टेस्ट पायलट्स म्हणून अफाट अनुभव गाठीशी असलेले हे चार कुशल भारतीय हवाई दलाचे अधिकारी सध्या गगनयान मोहिमेच्या तयारीसाठी कठोर प्रशिक्षण घेत आहेत.
इस्रोच्या म्हणण्यानुसार, मानवाचा सहभाग असणाऱ्या या गगनयान मोहीमेसाठी तीन दिवसांच्या चाचणीत तीन सदस्यांच्या चमूला 400 किमीच्या कक्षेत प्रक्षेपित करून नंतर भारतीय सागरीक्षेत्रात उतरवले जाईल. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर परत आणून मानवाची अंतराळ उड्डाण क्षमता तपासली जाईल.
टीम भारतशक्ती