जागतिक घडामोडींना आकार देत असलेल्या वाढत्या राष्ट्रवादाची भूमिका ओळखण्याची गरज परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी अधोरेखित केली आहे.
शुक्रवारी नवी दिल्लीतील सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज येथे सातव्या जसजीत सिंग स्मृती व्याख्यानासाठी उपस्थितांना ते संबोधित करत होते.
‘सत्तेचे बदलणारे संतुलन आणि वाढत्या राष्ट्रवादाच्या दरम्यान अनिश्चित बहुध्रुवीय जगात भारताचे भव्य धोरण’ ही या व्याख्यानाची मध्यवर्ती कल्पना होती.
जगाचा लक्षणीयरीत्या राष्ट्रवादाकडे होणारा प्रवास
व्यावसायिक मुत्सद्दी म्हणून कार्यरत असलेले जयशंकर म्हणाले, “तसे असो वा नसो, नजीकच्या भविष्यात जग लक्षणीयरीत्या अधिक राष्ट्रवादी होईल.”
“याचा अर्थ अधिक व्यक्तिवाद, बाह्य बांधिलकीबद्दल अधिक सावधगिरीची भावना आणि लक्षणीयरीत्या कमी शिस्तबद्ध अशी जागतिक रचना बनणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादाचे फायदे
राष्ट्रवादामुळेच स्वातंत्र्य, वाढ, पुनर्संतुलन आणि बहुध्रुवीयता निर्माण झाली,” असे ते म्हणाले.
भारताने जागतिक घडामोडींचे शास्त्रीयदृष्ट्या मूल्यमापन करून देशाला फायदेशीर ठरेल अशीच निवड केली पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
ते पुढे म्हणाले, “अनेकदा, राष्ट्रीय हित म्हणून आपल्यासाठी जे चांगले आहे ते जगासाठीही चांगले असते.”
राष्ट्रवादाची कल्पना कशी केली जाते?
जयशंकर यांनी नमूद केले की जुन्या जागतिकीकरणाला कवटाळून बसलेल्या देशांना वाटते की राष्ट्रवाद हा एक वाईट शब्द आहे.
“जगाच्या ज्या भागांमध्ये जागतिकीकरणाचा जुना मंत्र अजूनही प्रचलित आहे, तिथे राष्ट्रवाद हा एक वाईट शब्द आहे.”
मात्र, विकसनशील देशांमध्ये चित्र अगदी वेगळे आहे, असे जयशंकर म्हणाले.
ग्लोबल साऊथबरोबर भारताचे संबंध
त्यांनी ग्लोबल साऊथबरोबर असलेल्या भारताच्या संबंधांचीही प्रशंसा केली.
“जग आता अनेक प्रकारच्या विचारसरणींमध्ये विभागले गेले आहे. शिवाय अनेक ठिकाणी संघर्ष देखील सुरू आहेत, त्यापैकी बरेच परस्पर व्याप्त आहेत.”
त्यांनी हे देखील स्पष्ट केले की जागतिक क्रमवारीमध्ये शीर्षस्थानासाठी स्पर्धा करणाऱ्या शक्तींमध्ये काही मूलभूत गोष्टी आहेत.
जयशंकर पुढे म्हणाले की, काही प्रकरणांमध्ये आपल्या हितसंबंधांवर थेट परिणाम होतो आणि आपल्याला फायदा होईल अशा निवडी करण्यास आपण घाबरू नये.
सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन
“मोठ्या प्रमाणावर, सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन बाळगणे म्हणजे आपला निर्णय आपणच घेणे आणि नंतर आपल्या दृष्टीकोनासारखा समान दृष्टीकोन असलेल्या देशाबरोबर हातमिळवणी करणे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय काही वेळा अशी परिस्थिती उद्भवू शकते जिथे देशाला स्वतःचा बचाव स्वतःच करावा लागू शकतो आणि आपली बाजू मांडावी लागते.
बहु-शाखीय परराष्ट्र धोरण
अशा परिस्थितीत, भारताने राष्ट्रीय सुरक्षा आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय शक्ती (सीएनपी) विकास केंद्रस्थानी ठेवून बहु-क्षेत्रीय परराष्ट्र धोरण अवलंबले पाहिजे.
भारताचा विकास होत राहील
ते म्हणाले की, सध्या जगातील पाचव्या क्रमांकावर असणारी भारताची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे.
ते पुढे म्हणाले, “आम्ही ज्या प्रकारची बाह्य धोरणे विकसित केली आहे, त्यात वाढच होत जाणार आहे, त्यामुळे आम्ही जबाबदाऱ्या टाळू शकत नाही.”
एक स्थिर जग हे भारताच्या हिताचे
हे अनिश्चित जग नियम, शासन आणि कायद्यांद्वारे स्थिर होणे हे भारताच्या हिताचे आहे.
एअर कमांडर जसजीत सिंग यांचे स्मरण
परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणाले की, एअर कमांडर जसजीत सिंग हे राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयावर गणवेश आणि नागरी अशा दोन्ही क्षेत्रांना जोडण्यात अग्रेसर होते. त्यांच्या या अशा प्रयत्नांमुळे राष्ट्रीय सुरक्षेबाबत अधिक समग्र दृष्टिकोनाचा उदय होण्यास हातभार लागला असे जयशंकर पुढे म्हणाले.
त्यांनी भारताच्या हितसंबंधांचा पाठपुरावा कसा केला?
“जसजीतसोबतच्या अनेक संभाषणांमधून मला मिळालेली माहिती म्हणजे ते नेहमीच ज्या पद्धतीने भारताच्या हितसंबंधांना त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी ठेवायचे ते निश्चितच प्रेरणादायी आहे.”
“सध्या ज्या जगाचा सामना आपण करत आहोत त्याच्याशी जसजीत यांनी कसा सामना केला असता?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला.
ते पुढे म्हणाले की एक भव्य रणनीती तयार करण्यासाठी जसजीत यांनी नक्कीच स्वतःला प्रयुक्त केले असते.
ग्लोबल लँडस्केप
आपल्या भाषणाचा समारोप करताना परराष्ट्रमंत्री म्हणाले की जागतिक लॅंडस्केप बदलला चालला आहे आणि तो बदलत राहील.
ते पुढे म्हणाले, “आमच्यासमोरच्या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देणे आणि संधींचा आत्मविश्वासाने फायदा घेणे हे आमचे काम आहे.”
जग आता अधिक अस्थिर
जयशंकर म्हणाले की, जग आता निःसंशयपणे अधिक अस्थिर आणि अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
“परंतु, मला यात काही शंका नाही की एअर कमांडर जसजीत सिंग यांनी आम्हाला अनिश्चित जगात आपला प्रभाव पाडण्यासाठी चांगले नियोजन करण्यास प्रोत्साहित केले असते.”
तृप्ती नाथ