नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी 15 महिन्यांत तिसऱ्यांदा जिंकला विश्वासदर्शक ठराव

0

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी बुधवारी संसदेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून प्रचंड यांनी सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. 275 सदस्यांच्या प्रतिनिधिगृहात दहल यांच्या बाजूने 157 मते पडली. 110 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले तर एक आमदार गैरहजर राहिला.

माओवादी नेत्याने नेपाळी काँग्रेस सोडून कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) पार्टीसोबत नवीन युती केल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान दहल यांनी बुधवारी विश्वासदर्शक ठराव जिंकला.

नेपाळच्या घटनेनुसार, जर मित्र पक्ष सरकारपासून वेगळा झाला तर पंतप्रधानांना 30 दिवसांच्या आत सभागृहात विश्वासदर्शक ठराव घ्यावा लागतो.

275 सदस्यांच्या प्रतिनिधीगृहात सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 138 मतांची आवश्यकता असते. नेपाळ संसदेत दुसरा सर्वात मोठा पक्ष केपी ओली यांचा सीपीएन-यूएमएल असून त्याचे 76 खासदार आहेत. तर तिसरा सर्वात मोठा पक्ष प्रचंड यांचा सीपीएन-माओवादी केंद्र आहे. याचे 32 खासदार आहेत. याशिवाय राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला 20, जनता समाजवादी पक्षाला 12 जागा आणि सीपीएन-युनिफाइड सोशलिस्टला 10 जागा आहेत. तर सर्वाधिक म्हणजे 88 जागा नेपाळी काँग्रेसकडे आहेत. मात्र, नेपाळ काँग्रेस आता सरकारमधून बाहेर पडली आहे.

याआधी शनिवारी झालेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी सेंटर) यांच्या संसदीय गटाच्या बैठकीमध्ये प्रचंड यांनी नव्या आघाडीबाबत चर्चा केली. शिवाय विश्वासदर्शक ठरावाच्या दिवसापर्यंत पक्षाच्या सदस्यांनी काठमांडू सोडून जावू नये अशी सूचनाही केली होती.

2017च्या निवडणुकीत प्रचंड आणि ओली यांनी त्यांच्या पक्षांचे विलीनीकरण केले आणि आरामात बहुमत मिळवले. त्यावेळी ओली पंतप्रधान झाले. मात्र दोनही पक्षांतील मतभेदांमुळे ही युती अर्ध्यातच तुटली.

गेल्या वर्षी सीपीएन – यूएमएलने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रमुख विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावरून झालेल्या मतभेदांनंतर प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्यात आला होता. त्यावेळी प्रचंड यांना दुसऱ्यांदा विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले होते. आता ओली आणि प्रचंड पुन्हा एकत्र आले आहेत.


Spread the love
Previous articleHAL Bags Big Govt Contract: 34 Dhruv Helicopters for Army, Coast Guard
Next articleArmy Infantry Combat Vehicle Upgrades BMP2 To BMP2M: Govt Signs Deal With AVNL

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here