गाझा युद्धाला ‘नरसंहार’ म्हटल्यामुळे न्यूयॉर्कमधील एका रुग्णालयाने पॅलेस्टिनी अमेरिकन मुस्लिम नर्सला कामावरून काढून टाकले आहे.
हेसेन जब्र असे नाव असलेली ही नर्स गर्भधारणा आणि प्रसूतीदरम्यान आपले बाळ गमावलेल्या शोकाकुल मातांसाठी ती काम करत होती. या कामासाठी तिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात केलेल्या भाषणात तिने गाझा युद्धाचा उल्लेख नरसंहार असा केला.
एनवाययू लॅंगोन हेल्थ रुग्णालयाच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, या विषयावरील आपली मते कामाच्या ठिकाणी मांडू नये असा इशारा नर्सला देण्यात आला होता.
जब्रने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले की तिला 7 मे रोजी हा पुरस्कार देण्यात आला. मात्र या महिन्याच्या उत्तरार्धात तिला सेवासमाप्तीचे पत्र देण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात, जब्रने गाझामधील युद्धादरम्यान मुले गमावलेल्या मातांबद्दल सांगितले. हा पुरस्कार तिच्यासाठी अत्यंत वैयक्तिक असल्याचेही तिने स्पष्ट केले.
जब्रने तिच्या देशातील महिलांना होत असलेल्या वेदनांचाही भाषणात उल्लेख केला. ती म्हणाली की त्या महिलांचे “गाझामधील सध्याच्या नरसंहाराने अकल्पनीय नुकसान केले आहे.”
रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की जब्रला डिसेंबरमध्येच तिची मते कामाच्या ठिकाणी व्यक्त न करण्याचा इशारा देण्यात आला होता.
मात्र त्याकडे दुर्लक्ष करत तिने या पुरस्कार सोहळ्यात आपली मते मांडली असे या प्रवक्त्याने सांगितले.
“या कार्यक्रमाला तिचे सहकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मात्र तिच्या या उद्गारांमुळे त्यापैकी काही नाराज झाले होते.”
परिणामी, जब्र आता एनवाययू लॅंगोनची कर्मचारी म्हणून कार्यरत राहिलेली नाही.
7 ऑक्टोबर रोजी हमास कडून करण्यात आलेल्या अभूतपूर्व हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हमासला “नष्ट” करण्याच्या प्रतिज्ञेवर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ठाम राहिले आहेत. इस्रायलकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीवर आधारित एएफपीच्या आकडेवारीनुसार, यात जवळपास 1हजार 189 लोक ठार झाले, ज्यात बहुसंख्य नागरिक होते.
हमासने देखील 252 लोकांना ओलिस ठेवले, त्यापैकी 121जण गाझामध्ये आहेत. मात्र त्यातील 37जण ठार झाल्याचे लष्कराचे म्हणणे आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात गाझामध्ये किमान 36 हजार 171 लोक ठार झाले आहेत, ज्यात बहुतांश नागरिक आहेत.
अश्विन अहमद
(रॉयटर्स)