नऊ वर्षांचे ग्रहण सरले, चीनमध्ये विवाहसोहळ्यांची पुन्हा धूम

0

चीनमध्ये गेल्या नऊ वर्षांमध्ये विवाह करणाऱ्यांच्या संख्येला लागलेले ग्रहण आता संपले असून विवाह करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र सरत्या वर्षात बघायला मिळाले.

जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, नवविवाहित जोडप्यांची संख्या आता 7.68 लाखांवर पोहोचली आहे. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये यात 8लाख 45 हजार इतकी वाढ झाली.

चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी आपले सरकार “मुलांना जन्म देण्यायोग्य समाजासाठी आणि दीर्घकालीन, संतुलित लोकसंख्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी” काम करेल असे जाहीर केल्यानंतर काहीच दिवसांमध्ये ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली.

2013पासून, चीनमध्ये विवाहोत्सुकांच्या संख्येत तीव्र घट होत चालली आहे. विवाहांबरोबरच जन्मदरातही लक्षणीय घट बघायला मिळाली. त्यामुळे आधी विचार केला होता त्याहीपेक्षा जास्त वेगाने 1.4 अब्ज लोकसंख्या ही केवळ वृद्धांची होते की काय अशी शंका निर्माण झाली.
2016 मध्ये चीनने घटत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आपले ’एक कुटुंब एक मूल’ धोरण बदलले. 2021 पासून जोडप्यांना मोठे कुटुंब ठेवण्यास प्रोत्साहन दिले आहे. काही प्रांतांमध्ये नववधूला 110 डॉलरचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

विवाहोत्सुकांची संख्या घटण्यामागची कारणे आहेत बेरोजगारी, कुटुंबासाठी होणारा खर्च न परवडणे आणि तरुण जोडप्यांनी लग्नच करायचे नाही असा घेतलेला निर्णय. चीनमध्ये 16 ते 24 वयोगटातील तरुणांमधील शहरी बेरोजगारीचा दर जून 2023 मध्ये 21.3 टक्के अशा विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. त्यानंतर सरकारने बेरोजगारीची कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही.

चिनी राज्यकर्ते या घटत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी विविध मार्ग आणि साधने शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या दशकांमध्ये सुमारे 30 कोटी जनता सेवानिवृत्त (जेष्ठ नागरिक) होईल असा अंदाज आहे. हा आकडा जवळपास संपूर्ण अमेरिकी लोकसंख्येइतका आहे.
2010 ते 2020 या दशकातील आकडेवारीवरून असे दिसून येते की चिनी तरुणांमध्ये लग्नाचे सरासरी वय वाढत आहे. 2010 मध्ये ते वराचे सरासरी वय 25.75 वर्ष आणि वधूचे 24 वर्ष होते. 2020 मध्ये ते अनुक्रमे 29.38 आणि 27.95 वर्षांपर्यंत वाढले.

अधिकृत आकडेवारीनुसार विवाहांच्या संख्येत झालेल्या घसरणीबरोबरच, आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे 2023 मध्ये 25.9 लाख जोडप्यांनी बिनविरोध घटस्फोटांसाठी अर्ज केला, 2022 मध्ये ती संख्या 21 लाख होती.

2023 मध्ये विवाहितांच्या संख्येत झालेली वाढ आणि चिनी राशीनुसार ड्रॅगनचे शुभ वर्ष म्हणून असणारी ओळख यामुळे 2024 मध्ये जन्मसंख्येत वाढ होईल असा सरकारी अधिकाऱ्यांना विश्वास आहे.

पिनाकी चक्रवर्ती


Spread the love
Previous articleनिवडणूक विजयानंतर पुतीन यांचा तिसऱ्या महायुद्धाचा इशारा
Next articleIndia-US Defence Ministers Discuss Security Ties Amid Military Exercise

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here