भारताची 68 अपाचे हेलिकॉप्टर खरेदी आणि ट्रम्प यांच्या दाव्यातील फोलपणा

0
अपाचे
लष्करी विमान वाहतूक दलात AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा समावेश. 

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारताने अमेरिकेला 68 AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टरची ऑर्डर दिली होती. मात्र त्याच्या वितरणात इतका गंभीर विलंब झाला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या  मुद्द्यावर बोलण्यासाठी आपली वैयक्तिक भेट घेतली, असेही ट्रम्प पुढे म्हणाले.

अधिकृत करार, वितरण नोंदी आणि तैनाती यांच्या माहितीची पडताळणी केली असता असे दिसून येते की, हा दावा वस्तुस्थितीशी जुळणारा नाही. भारताने एकूण 28 बोइंग अपाचे हेलिकॉप्टरची ऑर्डर दिली होती, 68 नव्हे, आणि त्या सर्वांचे वितरण आता झाले आहे.

ट्रम्प यांना आपला वैयक्तिक प्रभाव वापरण्यासाठी आकडे आणि वेळापत्रक फुगवून सांगण्याची सवय आहे, विशेषतः 2025 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून आणि त्यांनी टॅरिफचा शस्त्र म्हणून वापर केल्यापासून त्यांच्या सार्वजनिक बोलण्यात  हीच पद्धत दिसून आली आहे. अर्थात वितरणात झालेल्या विलंबामुळे नवी दिल्ली नाराज झाली होती ही वस्तुस्थिती असली तरी ट्रम्प यांनी आकडे खूपच वाढवून सांगितले होते. याव्यतिरिक्त, ट्रम्प यांनी वर्णन केल्याप्रमाणे पंतप्रधान मोदींनी वैयक्तिक पातळीवर त्यांना विनंत्या केल्या होत्या, याला कोणताही स्वतंत्र दुजोरा मिळालेला  नाही.

दोन वेगवेगळे सौदे, एकच मोठी खरेदी नाही

भारताने अपाचे हेलिकॉप्टरची खरेदी दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केली:

  • सप्टेंबर 2015: भारताने भारतीय हवाई दलासाठी 22 अपाचे हेलिकॉप्टरसाठी सुमारे 14 हजार कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली.
  • यांची डिलिव्हरी 2019 मध्ये सुरू झाली आणि 2020 पर्यंत, म्हणजे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात ती पूर्ण झाली.
  • फेब्रुवारी 2020: भारतीय लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्ससाठी सहा अपाचे हेलिकॉप्टरसाठी सुमारे 6 हजार कोटी रुपयांच्या पुढील करारावर स्वाक्षरी करण्यात आली, जी 2025 मध्ये सेवेत दाखल झाली.
  • याच ऑर्डरला विलंब झाला.

एकत्रितपणे, यामध्ये 28 हेलिकॉप्टरचा समावेश आहे, जी ट्रम्प यांनी दावा केलेल्या संख्येपेक्षा खूपच कमी आहे.

वास्तविक विलंब आणि त्याची कारणे

भारतीय हवाई दलाची अपाचे हेलिकॉप्टर साधारणपणे नियोजित वेळेनुसार पोहोचली.

मात्र, लष्कराच्या सहा अपाचे हेलिकॉप्टरना अंदाजे 15 ते 24 महिन्यांचा विलंब झाला. अगदी पहिल्यांदा यांची डिलिव्हरी 2024 च्या सुरुवातीपासून सुरू होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण झाली नाही.

या परिस्थितीला अनेक घटक कारणीभूत होते:

  • कोविड-19: महामारीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली, ज्यामुळे इंजिन आणि महत्त्वाच्या एव्हियोनिक्सच्या उपलब्धतेवर परिणाम झाला.
  • उत्पादन प्राधान्यक्रम: अमेरिकेचे संरक्षण प्राधान्यक्रम आणि वाटप प्रणालीने निर्यातीपेक्षा लष्करी गरजांना प्राधान्य दिले.
  • तांत्रिक पुनरावलोकन: अतिरिक्त इलेक्ट्रिकल आणि पॉवर-सिस्टम सुरक्षा तपासण्या सुरू करण्यात आल्या.
  • लॉजिस्टिकमधील व्यत्यय: तुर्कीने उड्डाणाची परवानगी नाकारल्यामुळे अँटोनोव्ह-124 विमानाला परत फिरावे लागल्याने मोठा विलंब झाला, ज्यामुळे पुढचे वेळापत्रक बिघडले.

या गोष्टी भारतासाठी खऱ्याच त्रासदायक होत्या, पण त्यांचा परिणाम केवळ 6 हेलिकॉप्टरवर झाला होता, 68 वर नाही.

ट्रम्प यांनी हेलिकॉप्टरच्या करारांमध्ये गोंधळ का घातला?

ट्रम्प यांनी अपाचे कराराचा संबंध, त्याच सुमारास बोइंगकडूनच खरेदी केलेल्या 15 CH-47F चिनूक हेवी-लिफ्ट हेलिकॉप्टरच्या खरेदीशी जोडला असावा.

या दोघांचा एकत्रितपणे विचार केला तरी, अपाचे आणि चिनूक यांची एकूण संख्या 43 हेलिकॉप्टर्स एवढीच होते, जी अजूनही 68 पेक्षा खूपच कमी आहे.

भारतीय लष्कराला पूर्वीपासून अंदाजे  39 हेलिकॉप्टरची गरज असूनही, संरक्षण मंत्रालयाच्या नोंदींमध्ये किंवा अमेरिकेच्या परदेशी लष्करी विक्रीच्या अधिसूचनेमध्ये कोणत्याही अतिरिक्त अपाचे ऑर्डरची नोंद नाही.

अमेरिकेच्या धोरणातील राजकीय अस्थिरता, पुरवठ्यातील व्यत्यय आणि चीनसोबत वाढलेल्या सामरिक स्पर्धेमुळे परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या नवी दिल्लीच्या प्रयत्नांना अधिक गती मिळाली आहे.

थोडक्यात सांगायचे तर, ट्रम्प यांनी वर्णन केल्याप्रमाणे  डिलिव्हरीतील विलंबाबद्दल मोदींनी वैयक्तिकरित्या त्यांना विनवणी केली होती, याचा कोणताही पुरावा नाही. अर्थात, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या भेटीदरम्यान त्यांनी ट्रम्प यांच्याकडे या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र यातून ट्रम्प यांनी केलेली अतिशयोक्ती राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, तरी ती मूळ सत्य दडवून ठेवते: भारताची भविष्यातील लढाऊ विमान योजना बाह्य राजकीय आणि औद्योगिक अस्थिरतेपासून कमीत कमी प्रभावित व्हावी, यासाठी भारत अधिकाधिक दृढनिश्चय करत आहे. म्हणूनच भारत स्वदेशी HAL प्रचंड या लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचे उत्पादन वाढवत आहे, जे 20 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीसह उच्च-उंचीवरील ऑपरेशन्ससाठी अनुकूल आहे. उलट एवढ्या उंचीवर अपाचे हेलिकॉप्टरच्या क्षमतेवर मर्यादा येतात.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIAF Issues RFIs for Two New Counter-Drone Systems After Operation Sindoor
Next articleऑपरेशन सिंदूरनंतर दोन नवीन प्रति-ड्रोन प्रणालींसाठी IAF ने जारी केले RFI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here