उत्तर कोरियाचा गुप्तहेर उपग्रह अद्यापही ‘कार्यान्वित’, पण ‘नियंत्रित’

0

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या नोव्हेंबरमध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला उत्तर कोरियाचा पहिला गुप्तहेर उपग्रह ‘कार्यरत’ असून वरवर पाहता बऱ्या स्थितीत आहे.

उपग्रहाच्या कक्षेतील बदल शोधण्यात आपल्याला यश मिळाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. म्हणजेच उत्तर कोरियाचे अजूनही त्यावर नियंत्रण आहे. मागील सहा महिन्यांत झालेल्या दोन अयशस्वी प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर मलिग्योंग-1 या उपग्रहाचे यश उल्लेखनीय म्हणावे लागेल.

हा उपग्रह इतर कामे करत असल्याची किंवा हेरगिरी करत असल्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री शिन वॉन-सिक यांनी स्पष्ट केल्यानंतर दोन दिवसांनी रॉयटर्सचा हा अहवाल प्रसिद्ध झाला.

नेदरलँड्समधील डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे उपग्रह तज्ज्ञ मार्को लॅंगब्रोक यांनी मंगळवारी एका ब्लॉगमध्ये लिहिले आहे, “आता आपण निश्चितपणे म्हणू शकतो की, उपग्रह जिवंत (कार्यान्वित) आहे. या युक्तीवादामुळे हे सिद्ध होते की मलिग्योंग-1चे कार्य संपलेले नाही आणि उपग्रहावर उत्तर कोरियाचे नियंत्रण आहे-जे वादग्रस्त होते.”

प्रक्षेपण झाल्यानंतर, उत्तर कोरियाच्या सत्तानियंत्रित माध्यमांनी दावा केला होता की, या उपग्रहाने दक्षिण कोरिया, अमेरिका आणि इतर काही संवेदनशील लष्करी आणि राजकीय स्थळांची छायाचित्रे काढली होती. दोन महिन्यांनंतर, प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियाने एलन मस्कच्या स्पेसएक्सद्वारे संचालित रॉकेटचा वापर करून आपला पहिला हेरगिरी करणारा उपग्रह प्रक्षेपित केला. या उपग्रहानेमुळे अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाचे निरीक्षण करण्याची ताकद दक्षिण कोरियाला मिळाली.

अमेरिका, रशिया आणि चीन या जगातील सर्वोच्च अंतराळविषयक महासत्तांनी अलिकडच्या वर्षांत प्रक्षेपित केलेले उपग्रह इतर कक्षांमधील वस्तूंची हालचाल आणि तपासणी करण्यास अधिक सक्षम आहेत. रशिया आणि उत्तर कोरियाने गेल्या वर्षभरात परस्पर सहकार्य वाढवले आहे. युक्रेन युद्धामुळे रशियन सैन्याला तोफगोळ्यांची आणि इतर शस्त्रास्त्रांची गरज असल्यामुळे रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध वाढीला लागले आहेत.

सप्टेंबर 2023 मध्ये, शिखर परिषदेसाठी उत्तर कोरियाचा नेता किम जोंग-उन, पुतीन यांच्याबरोबर मॉस्कोला गेला होता. या दौऱ्यादरम्यान, किम जोंग-उन आणि पुतीन यांच्यातील एक बैठक देशाच्या पूर्वेकडील भागात अतिदूर असणाऱ्या रशियन स्पेसपोर्ट वोस्तोचनी कॉस्मोड्रोम येथे झाली होती. त्यामुळे या गुप्तहेर उपग्रहाला रशियाने मदत केली असा अंदाज व्यक्त होतोय.

रामानंद सेनगुप्ता

(अनुवाद : आराधना जोशी)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here