आयएनएस दिल्ली, आयएनएस शक्ती आणि आयएनएस किल्तन या नौकांचा समावेश
दि. ०७ मे: सामरिक तैनातीचा भाग म्हणून भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस दिल्ली,’ ‘आयएनएस शक्ती’ आणि ‘आयएनएस किल्तन’ या युद्धनौकांनी दक्षिण चीन समुद्राकडे प्रस्थान ठेवले. नौदलाच्या पूर्वेकडील ताफ्याचे प्रमुख ‘फ्लॅग ऑफिसर कमांडिंग’ रियर ॲडमिरल राजेश धनखड यांच्या नेतृत्वाखाली या युद्धनौका सोमवारी सिंगापूर येथे पोहोचल्या होत्या. दिल्ली, शक्ती तसेच किल्तन या नौकांचे सिंगापूरच्या नौदलातील अधिकारी, तसेच भारताच्या सिंगापूरमधील उच्चायुक्तांनी स्वागत केले, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतीय नौदलातील पूर्वेकडील ताफ्याच्या दक्षिण चीनजवळील समुद्रात परिचालनात्मक नेमणुकीचा भाग म्हणून या युद्धनौकांनी सिंगापूरला ही भेट दिली. विविध कार्ये आणि उपक्रमांच्या मालिकांच्या माध्यमातून भारत आणि सिंगापूर या दोन सागरी देशांच्या दरम्यान दीर्घकाळ चालत आलेले मैत्री आणि सहकार्याचे नाते आणखी मजबूत करण्याच्या हेतूने ही भेट आयोजित करण्यात आली आहे. सिंगापूर येथील बंदरात या जहाजांचा मुक्काम असताना, हाती घेण्यात येणाऱ्या नियोजित कार्यक्रमांमध्ये, भारतीय उच्चायुक्तांशी संवाद, सिंगापूरच्या नौदलातील अधिकाऱ्यांची व्यावसायिक चर्चा तसेच तेथील शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक संवाद यांसह इतर उपक्रमांचा समावेश आहे. यातून दोन्ही देशांच्या नौदलांतील सामायिक मूल्यांचे दर्शन घडेल, असे संरक्षण मंत्रालयाच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नियमित भेटी, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण तसेच परस्परांसाठी प्रशिक्षण व्यवस्था यांसह भारतीय नौदल आणि सिंगापूरचे नौदल यांच्या मध्ये गेली तीन दशके सहकार्य, समन्वय तसेच सहकारी संबंधांची जपणूक होत आली आहे. भारतीय जहाजांची आता झालेली तैनात दोन्ही देशांच्या नौदलांच्या दरम्यान असलेले मजबूत बंध अधोरेखित करते, असेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
दक्षिण चीन समुद्रात चीनची वाढती दादागिरी आणि हिंदी महासागर क्षेत्रात वाढत असलेला वावर पाहता. भारताने आग्नेय आशियाई (आसियान) देशांशी संबंध मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. ॲक्ट ईस्ट आणि सागर या धोरणांच्या अनुषंगाने या देशांशी सामरिक आणि नौदल भागीदारीही भारताने सुरु केली आहे. या देशातील सागरी प्रदूषणाचा सामना करण्यासाठी भारताने त्यांना मदतही देवू केली आहे. भारतीय सागरी प्रदूषण नियंत्रक जहाजाने नुकतीच सिगापूर, व्हिएतनाम व फिलिपिन्सला भेट दिली होती. त्यामुळे आता दक्षिण चीन समुद्रातील ही सागरी तैनात महत्त्वाची मानली जात आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी