तुर्कीतल्या मुख्य विरोधी पक्षाने प्रमुख शहरांवर आपले नियंत्रण कायम राखत रविवारी झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात विजय मिळवला. मात्र त्यामुळे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांना मोठा धक्का बसला आहे. या शहरी भागांवर आपले वर्चस्व असावे यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते.
90 टक्क्यांहून अधिक मतपेट्यांमधील मतमोजणी झाल्यानंतर, इस्तंबूलचे विद्यमान महापौर, रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे (सीएचपी) इकराम इमामोग्लू, तुर्कीच्या सर्वात मोठ्या शहर आणि आर्थिक केंद्रामध्ये मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत, असे सरकारी एजन्सी अनादोलूने म्हटले आहे. राजधानी अंकाराचे महापौर मन्सूर यावास यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 25 गुणांच्या आश्चर्यकारक फरकाने आपली जागा कायम राखली, असेच या निकालाने जाहीर झाले आहे. अनादोलूच्या वृत्तानुसार, सीएचपीने तुर्कीच्या 81पैकी 36 नगरपालिकांमध्ये विजय मिळवला असून एर्दोगन यांच्या पक्षाच्या अनेक बालेकिल्ल्यांमध्ये त्यांना जोरदार झटका दिला आहे. दोन दशकांपूर्वी एर्दोगन सत्तेवर आल्यापासून सीएचपीचा हा सर्वात मोठा निवडणूक विजय असून सत्ताधारी पक्षाच्या 36 टक्क्यांच्या तुलनेत, विरोधी पक्षाला देशभरात 37 टक्के मते मिळाली आहेत.
एर्दोगन यांनी राष्ट्रपती भवनाच्या बाल्कनीतून केलेल्या भाषणात निवडणुकीतील पराभव मान्य केला असून आपल्या पक्षाला संपूर्ण तुर्कीमध्ये “मोठ्या पराभवाला सामोरे” जावे लागल्याचे म्हटले आहे. जनतेने यातून दिलेल्या ‘संदेशावर’ आपला पक्ष ‘कठोर’ आत्मपरीक्षण करून ‘विश्लेषण’ करेल, असे ते म्हणाले.
“दुर्दैवाने, 28 मे 2023च्या निवडणुकीत आम्हाला मिळालेल्या विजयानंतर अवघ्या नऊ महिन्यांत, आम्हाला स्थानिक निवडणुकीच्या हवा तसा निकाल मिळू शकला नाही,” असे एर्दोगन म्हणाले. “आम्ही आमच्या चुका सुधारू आणि आमच्यातील कमतरता दूर करू,” असेही ते पुढे म्हणाले.
महागाईचा सामना करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी सादर केलेला आर्थिक कार्यक्रम यानंतरही सुरू राहिल असे वचन त्यांनी यावेळी दिले.
या मतदानाकडे एर्दोगन यांच्या लोकप्रियतेचे मोजमाप म्हणून पाहिले गेले कारण त्यांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून पराभूत झालेल्या प्रमुख शहरी भागांवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. 2019 मध्ये अंकारा आणि इस्तंबूलमधील सीएचपीच्या विजयाने एर्दोगन यांच्या अजेयतेचा रथ डळमळीत केला होता.
70 वर्षीय तुर्की राष्ट्राध्यक्षांसाठी इस्तंबूलची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती, कारण 1 कोटी 60 लाख लोकसंख्या असलेल्या याच शहरात त्यांचा जन्म आणि संगोपन झाले आणि इथूनच त्यांनी 1994 मध्ये महापौर म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
गेल्या वर्षीच्या अध्यक्षीय आणि संसदीय निवडणुकांमध्ये एर्दोगन आणि त्यांचा सत्ताधारी इस्लामिक-केंद्रित न्याय आणि विकास पक्ष किंवा एकेपी याच्याकडून झालेल्या पराभवानंतर विभाजित आणि निराश झालेल्या विरोधी पक्षासाठी हा निकाल संजीवनी ठरला आहे.
“मतदारांनी तुर्कीमध्ये एक नवीन राजकीय व्यवस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला,” असे सीएचपीचे नेते ओझगुर ओझेल यांनी या निकालाने आनंदित झालेल्या समर्थकांना सांगितले. “आज मतदारांनी तुर्कीमधील 22 वर्षे जुने चित्र बदलण्याचा आणि आपल्या देशात नवीन राजकीय वातावरण तयार व्हावे यासाठी योग्य निर्णय घेतला आहे”.
दरम्यान, यवास यांचा विजय साजरा करण्यासाठी अंकारा सिटी हॉलच्या बाहेर समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. “अंकाराला तुझा अभिमान आहे!” अशी घोषणाबाजी समर्थकांनी यावेळी केली.
इस्तंबूल येथील एडम थिंक टँकचे संचालक सिनान उल्गेन म्हणाले की, “हे आश्चर्यकारक निकाल आहेत” “आर्थिक अस्वस्थतेला कारणीभूत ठरल्याबद्दल” मतदारांच्या मनात सत्ताधारी पक्षासाठी प्रचंड राग आहे. गगनाला भिडलेल्या महागाईमुळे अनेक तुर्की कुटुंबांना मूलभूत वस्तू विकत घेण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.
एकेपीच्या समर्थकांनी मतदानापासून दूर राहणे किंवा इतर पक्षांना मतदान करणे पसंत केल्याचे उल्गेन यांनी सांगितले.
मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी तुलनेने कमी होती, असे ते म्हणाले. ” विविध पक्षांच्या उमेदवारांनी पक्षबदल केले, जे मजबूत वैचारिक बांधिलकीमुळे राष्ट्रीय निवडणुकांमध्ये झाले नव्हते. यावेळी अस्मितेपेक्षा अर्थव्यवस्था महत्त्वाची ठरली.”
सर्व महानगर पालिका, शहर आणि जिल्हा महापौरपद तसेच स्थानिक प्रशासनासाठी यावेळी सुमारे 61 दशलक्ष- यामध्ये एक दशलक्षाहून अधिक पहिल्यांदाच मतदान करणारे – मतदानासाठी पात्र होते.
सरकारी एजन्सी अनादोलूनुसार, गेल्या वर्षीच्या 87 टक्क्यांच्या तुलनेत यावेळी सुमारे 76 टक्के मतदान झाले.
मतदान सुरळीत पार पडावे यासाठी देशभरात सुमारे 5लाख 94 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तरीही, दियारबाकीर शहरात प्रशासकाच्या निवडीवरून सुरू झालेल्या वादाला हिंसक वळण लागले आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि इतर 11 जण जखमी झाले, असे सरकारी एजन्सी अनादोलूने सांगितले. याशिवाय सॅनलिउर्फा प्रांतात सुरू झालेल्या लढाईत किमान सहा जण जखमी झाले.
इमामोग्लू म्हणाले, “आम्हाला मिळालेल्या आकडेवारीनुसार, असे दिसते की आमच्या नागरिकांचा आमच्यावर असलेला विश्वास त्यांचा विश्वास फलद्रुप झाला आहे.”
अनादोलूच्या म्हणण्यानुसार, इमामोग्लू यांना इस्तंबूलमध्ये 50.6 टक्के, तर माजी शहरीकरण आणि पर्यावरण मंत्री एकेपीचे उमेदवार मूरत कुरुम यांना 40.5 टक्के मते मिळाली. जनमत चाचण्यांमध्ये या दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा असल्याचे सांगण्यात आले होते.
एर्दोगन यांना भविष्यात संभाव्य आव्हान देऊ शकणारे उमेदवार म्हणून ओळखले जाणारे इमामोग्लू यांनी यंदा, 2019 मध्ये त्यांना विजय मिळवून देण्यात मदत करणाऱ्या काही पक्षांच्या पाठिंब्याशिवाय निवडणूक लढवली. कुर्द समर्थक पीपल्स इक्वॅलिटी अँड डेमोक्रसी पार्टी आणि राष्ट्रवादी आयवायआय पार्टी या दोघांनीही या निवडणुकीत स्वतःचे उमेदवार उभे केले होते.
गेल्या वर्षीच्या निवडणुकीत एर्दोगन यांना हटवण्यात अपयशी ठरल्यानंतर सीएचपीच्या नेतृत्वाखालील सहा पक्षीय विरोधी आघाडीत फाटाफूट झाली, ज्यामुळे आर्थिक संकटाचा आणि गेल्या वर्षीच्या विनाशकारी भूकंपात – ज्यामध्ये 53,000 हून अधिक लोक मारले गेले – करण्यात आलेल्या मदतीमध्ये सुरूवातीला सरकारकडून झालेल्या चुकांचा फायदा विरोधकांना फारसा घेता आला नव्हता.
उलगेन म्हणाले की, या निकालाने 2028 मध्ये अध्यक्षपदासाठी एर्दोगान यांना आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षाकडून उभा राहणारा संभाव्य नेता म्हणून इमामोग्लू यांच्याकडे बघितले जात आहे.
“हा निकाल निश्चितच इमामोग्लू यांच्यासाठी निर्णायक ठरला आहे”, असे ते म्हणाले. “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांच्या पुढील फेरीसाठी ते विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून स्वाभाविकच त्यांच्या नावाचा विचार होईल.
न्यू वेल्फेअर पार्टी किंवा वायआरपी या नव्या धार्मिक-पुराणमतवादी पक्षाला एकेपीच्या समर्थकांची मते मिळाल्याचे दिसून आले. सरकारने ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था हाताळली आहे त्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे.
तुर्कीमध्मे प्रामुख्याने कुर्दिश लोकसंख्या असलेल्या आग्नेय भागात, डीईएम पक्ष अनेक नगरपालिकेच्या जागा जिंकण्याच्या मार्गावर होता, परंतु त्यांना सरकार स्थापनेची परवानगी दिली जाईल की नाही हे अस्पष्ट आहे. मागील वर्षांमध्ये, एर्दोगनच्या सरकारने कुर्दिश दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून तिथे निवडून आलेल्या कुर्दिश समर्थक महापौरांना पदावरून हटवले आणि त्यांच्या जागी राज्य-नियुक्त निरीक्षकाची नियुक्ती केली.
विश्लेषकांच्या मते एर्दोगन यांच्या पक्षाला या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने नवीन राज्यघटना आणण्याचा त्यांचा विचार अधिक मजबूत झाला आहे-ज्यामध्ये त्यांची पुराणमतवादी मूल्ये प्रतिबिंबित होतील आणि त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर 2028 च्या पुढेही तेच सत्तेत कायम राहतील.
दोन दशकांहून अधिक काळ तुर्कीचे अध्यक्षपद भूषवणारे एर्दोगन-2003 पासून पंतप्रधान आणि 2014 पासून अध्यक्ष म्हणून कार्यरत असून कौटुंबिक मूल्यांना अग्रस्थानी ठेवणाऱ्या नवीन राज्यघटनेचे समर्थन करत आहेत.
पिनाकी चक्रवर्ती
(स्रोत : एपी)