पाकिस्तानात नैऋत्य भागातील बलुचिस्तान प्रांतातील एका छोट्या खाजगी कोळसा खाणीत शुक्रवारी सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात किमान 20 खाण कामगार ठार तर सातजण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
क्वेटा शहराच्या पूर्वेकडील पोलीस स्टेशनचे हाऊस ऑफिसर हुमायून खान यांनी सांगितले की, “जड शस्त्रांचा वापर करत हल्लेखोरांच्या एका गटाने पहाटेच्या वेळी डुकी परिसरातील जुनैद कोळसा कंपनीच्या खाणींवर हल्ला केला.” त्यांनी खाणींवरही रॉकेट आणि ग्रेनेडही फेकल्याचे ते म्हणाले.
“आम्हाला जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत 20 मृतदेह आणि सहा जखमी आणण्यात आले आहेत,” असे डुकी येथील डॉक्टर जोहर खान शादीझाई यांनी सांगितले.
या हल्ल्यात आणखी सात खाण कामगारही जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा अधिकाऱ्यांकडून निषेध करण्यात आला असून या हल्ल्यामागे असलेल्यांचा शोध घेण्याचे आणि त्यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
अलीकडील हल्ले
राजधानीतील मोठ्या सुरक्षा शिखर परिषदेच्या काही दिवस आधी अशांत बलुचिस्तान प्रांतातील अलीकडचा हल्ला झाला. पोलीस अधिकारी हमायुन खान नासिर यांच्या मते हल्लेखोरांनी गुरुवारी रात्री उशिरा डुकी जिल्ह्यातील कोळसा खाणीतल्या निवासस्थानांवर हल्ला केला, कामगारांना घेरले आणि गोळीबार केला.
बहुतेक कामगार बलुचिस्तानच्या पश्तून भाषिक भागातील होते, मृतांपैकी तीन आणि जखमींपैकी चार अफगाण नागरिक आहेत.
बीएलएचा सहभाग?
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारली नसली तरी, संशयाची सुई बंदी घालण्यात आलेल्या बलुच लिबरेशन आर्मीकडे (बीएलए) वळली आहे.
बीएलएकडून अनेकदा नागरिक आणि सुरक्षा दलांतील कर्मचारी लक्ष्य केले जातात.
ऑगस्टमध्ये बीएलएने सर्वाधिक हल्ले केले ज्यात 50 हून अधिक लोक मारले गेले. याला देण्यात आलेल्या प्रत्युत्तरात अधिकाऱ्यांनी 21 बंडखोरांना ठार केले. मृतांमध्ये 23 प्रवाशांचा समावेश होता, ज्यातील बहुतांश पंजाब प्रांतातील होते, त्यांना मुसाखैल जिल्ह्यात बस आणि वाहनांमधून नेण्यात आले आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
खाण कामगारांवर झालेल्या हल्ल्याचा बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी निषेध केला आहे. पाकिस्तानला अस्थिर करण्याच्या या क्रूर गुन्हेगारांचा अजेंडा असल्याचे त्यांनी म्हटले. निष्पाप मजुरांच्या हत्येचा सूड घेतला जाईल असे वचन त्यांनी यावेळी दिले.
बीएलएने आतापर्यंत केलेले हल्ले
बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याची मागणी करणारे अनेक फुटीरतावादी गट आहेत. स्थानिक रहिवाशांच्या मोबदल्यात या प्रदेशातील तेल आणि खनिज संसाधनांचा इस्लामाबाद गैरवापर करत असल्याचा आरोप हे फुटीरतावादी करत असतात.
या आठवड्याच्या सुरुवातीला, बीएलएने पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या विमानतळाजवळ चिनी नागरिकांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. सध्या हजारो चिनी कामगार या देशात आहेत, जे बहुतांश चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हअंतर्गत सुरू असणाऱ्या कामांसाठी आले आहेत. आत्मघाती बॉम्बस्फोटामुळे पाकिस्तानी सैन्याच्या परदेशी आणि उच्चभ्रू नागरिकांचे संरक्षण करण्याच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाश्चिमात्य युतीला टक्कर देण्यासाठी चीन आणि रशियाने स्थापन केलेल्या शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद पुढच्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये होणार आहे.
हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी दहशतवाद रोखण्यासाठी सैन्य तैनात करून राजधानीत सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. फुटीरतावादी गट आणि पाकिस्तानी तालिबान सार्वजनिक ठिकाणे आणि सरकारी आस्थापनांना लक्ष्य करू शकतात हे लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने देशाच्या चार प्रांतांना त्यांच्याकडील सुरक्षाव्यवस्था बळकट करण्याचे आदेश जारी केले आहे.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)