संरक्षण अंदाजपत्रकात चालू वर्षासाठी दोन लाख कोटींची तरतूद
दि. १३ जून: राजकारण्यांचा भ्रष्टाचार आणि त्यामुळे आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या ठाकलेल्या पाकिस्तानने आपल्या चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात संरक्षण खर्चात विक्रमी दोन लाख कोटींची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या, २०२३, तुलनेत ही वाढ १९ टक्यांनी अधिक आहे. एकीकडे देश भुकेकंगाल अवस्थेत पोहोचला असताना पाकिस्तानने संरक्षण खर्चासाठी केलेल्या या विक्रमी तरतुदीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांपासून पार रसातळाला गेली आहे. देशांतर्गत राजकीय अस्थिरता, कट्टरवाद्यांचा सरकारवर असलेला प्रभाव, राजकीय नेत्यांचा अनिर्बंध भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवस्थापन या मुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या दिवाळखोरीतून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दारात मदतीची याचना करण्यासाठी सातत्याने जात आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला मदतीसाठी हंगामी आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. मात्र, आर्थिक व्यवस्थापनाबाबत पाकिस्तानला काही अटीही घातल्या आहेत. या अटींमध्ये करसंरचनेत बदल करणे, आर्थिक शिस्त, सरकारी खर्चावर अंकुश आदी बाबी पाकिस्त्नाला सुचविण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाहबाज शरीफ यांनी देशाचे चालू आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक पाकिस्तानची संसद असलेल्या ‘नॅशनल असेंब्ली’मध्ये सादर केले. या अंदाजपत्रकात संरक्षणासाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्के जास्त आहे. नाणेनिधीने दिलेल्या इशाऱ्यानंतरही पाकिस्तानकडून संरक्षण खर्चात वाढच करण्यात येत आहे, ही बाब चिंताजनक मानली जात आहे.
चीनकडून शस्त्रखरेदी
पाकिस्तानच्या कर्जबाजारी अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा कर्जावरील व्याज चुकविण्यासाठीच वापरण्यात येतो. त्यानंतर संरक्षण क्षेत्राचा क्रमांक येतो. शस्त्र खरेदीवरील खर्च ही पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची दुसरी मोठी दुखरी नस आहे. शस्त्र खरेदीवर होणाऱ्या मोठ्या खर्चामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येतो, तरीही पाकिस्तानकडून या खर्चात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. त्यामागे चीनकडून असणारा पाठींबा हे एक महत्त्वाचे कारण मानण्यात येत आहे. मात्र, चीनकडून मिळणारा पाठिंब्याची किंमत पाकिस्तानला चीनकडूनच शस्त्रे खरेदी करून चुकवावी लागत आहे. म्हणजे शस्त्र खरेदीसाठी चीनकडून कर्ज घ्यायचे आणि त्याच पैश्याच्या माध्यमातून चीनकडूनच शस्त्र खरेदी करायची, अशा परिस्थितीत पाकिस्तान सापडला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडे असणारी बहुतांश शस्त्र, शस्त्रप्रणाली, विमाने, युद्धनौका चिनी बनावटीच्याच आहेत. सिप्रीच्या अहवालानुसार चीनकडून २०१९ ते २०२३ या पाच वर्षांत करण्यात आलेल्या एकूण शस्त्र निर्यातीपैकी ६१ टक्के निर्यात केवळ पाकिस्तानला करण्यात आली आहे, या वरूनच चिनी शास्त्रांवर असलेले पाकिस्तानचे अवलंबित्व सिद्ध होते.
विनय चाटी