दुबईत पाकिस्तानी राजकारणी, लष्करी अधिकाऱ्यांची साडेबारा अब्ज डॉलरची ‘माया’
दि. १६ मे: महागाई आणि कर्जबाजारीपणामुळे एकीकडे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असतानाच पाकिस्तानच्या उच्चभ्रू वर्गाला मात्र याची काहीच झळ पोहोचत नसल्याचे एका ‘लिक’ झालेल्या चौकशी अहवालातून समोर आले आहे. पाकिस्तानी राजकारणी, लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी, राजदूत अशा सातत्याने सत्तेच्या वर्तुळात वावरणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींनी दुबईत साडेबारा अब्ज अमेरिकी डॉलरची ‘माया’ जमविल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजे ‘मुल्क कंगाल-आर्मी मालामाल’ अशीच पाकिस्तानची अवस्था झाली आहे.
हवाला व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी नंदनवन मानल्या जाणाऱ्या आखाती देशांतील दुबईमध्ये जगभरातील प्रभावशाली व्यक्तींच्या बेनामी, नातेवाईकांच्या नवे खरेदी केलेल्या मालमत्ता असल्याची चर्चा सातत्याने होत असते. त्यामुळे जगभरातील ७० माध्यम समूहांनी एकत्र येऊन, या बाबत एक गोपनीय सर्वेक्षण केले होते. दुबईत २०२० ते २०२२ या कालावधीत झालेल्या मालमत्तांच्या व्यवहाराची आकडेवारी या सर्व्हेक्षणासाठी विचारात घेण्यात आली होती. या सर्वेक्षणात दुबईत मालमत्ता असलेल्या अनेक ‘मोठ्या’ लोकांची नवे समोर आली होती. ‘दुबई अनलॉक’ या नावाने झालेल्या सर्वेक्षणातील काही माहिती ‘लिक’ झाल्याने अनेक नावे माध्यमांत येत आहेत. दुबईतील सुटसुटीत आर्थिक कायदे आणि कर संरचनेमुळे दुबई हे जगभरातील अतिश्रीमंतांसाठी एक आकर्षक गुंतवणूक केंद्र म्हणून पुढे आल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानातील प्रमुख माध्यम समूह ‘डॉन’ या सर्व्हेक्षणात सहभागी झाला होता. ‘डॉन’ने या अहवालात दुबईत मालमत्ता असलेल्या पाकिस्तानातील प्रभावशाली लोकांची नावे जाहीर केली आहेत. त्यात पाकिस्तानातील लष्करी अधिकारी, राजकारणी, राजदूत, हवाला ऑपरेटर, राजकारणी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे नातेवाईक, नोकरशहा, व्यावसायिक, बँक व्यावसायिक अशा १७ हजार जणांच्या एकूण २३ हजार मालमत्ता दुबईत असल्याचे सिद्ध झाले आहे. या मालमत्तांचे एकूण मूल्य साडेबारा अब्ज अमेरिकी डॉलर इतके आहे. दुबईत मालमत्ता असलेल्या पाकिस्तानींच्या यादीत माजी अध्यक्ष असिफ आली झरदारी यांची तीन मुले, या पैकी दोन पाकिस्तानी संसदेचे सदस्य आहेत, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची चिरंजीव हुसेन नवाझ, माजी पंतप्रधान शौकत अझीज, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांची पत्नी, पाकिस्तानी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ, माजी लष्करप्रमुख क़मर जावेद बाजवा यांचे चिरंजीव, पोलिसप्रमुख त्याचबरोबर अनेक खासदार, आमदार, लष्करी अधिकारी आदींचा समावेश आहे. या लोकांनी छोट्या स्टुडीओ अपार्टमेंटपासुन ते मोठ्या इमारतींपर्यंत मालमत्ता दुबईत खरेदी केल्या आहेत.
‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या हेरगिरी विरोधी विभागाचे माजी महासंचालक मेजर जनरल एहताषम झमीर आणि त्यांच्या मुलाच्या नवे दुबईत मालमत्ता आहे. झमीर हे जनरल मुशर्रफ यांच्या काळात हेरगीरीविरोधी विभागाचे प्रमुख होते. पाकिस्तानी लष्कराच्या मालमत्ता विभागाचे माजी प्रमुख मेजर जनरल नजमुल हसन शाह, माजी एअर व्हाइस मार्शल सलीम तारिक, माजी एअर व्हाइस मार्शल खालिद मसूद राजपूत आदी लष्करी अधिकाऱ्यांच्या दुबईमधील दुबई मरीना, एमिरात हिल्स, बिसनेस बे, पाम जुम्हेरिया आणि अल बारशा अशा महागड्या परिसरात मालमत्ता आहेत. ‘डॉन’च्या अहवालावर पाकिस्तानी राजकारण्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या अहवालात नमूद केलेल्या मालमत्ता त्यांच्या नावावरच नोंद केलेल्या असून, त्या आधीच कायद्यानुसार उघड केल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो-झरदारी आणि त्यांची पत्नी असिफा यांनी या पूर्वीच पाकिस्तान निवडणूक आयोग आणि केंद्रीय महसूल मंडळाला आपल्या देश आणि विदेशातील मालमत्तांची माहिती दिली आहे, असे भुट्टो यांचे प्रवक्ते झुल्फिकार आली बदर यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या मरणासन्न अवस्थेत आहे. आर्थिक दिवाळखोरी टाळण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी समोर भिकेचा कटोरा घेऊन उभा आहे. महागाई आकाशाला भिडली असून, लोकांचे दोन वेळच्या खाण्याचेही वांधे झाले आहेत. पाकिस्तान सरकारने आर्थिक विवंचना टाळण्यासाठी सरकारी उद्योग विकण्याचे जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत हा अहवाल बाहेर आल्याने पाकिस्तानात संतापाची लाट उसळली आहे. दुबईत मालमत्ता खरेदी करणे बेकायदा नसले, तरी यातून पाकिस्तानी उच्चभ्रू वर्गाची मानसिकता आणि सामान्य जनतेप्रती असलेली भावना स्पष्ट होते, असे म्हटले जात आहे.
विनय चाटी