प्रादेशिक सहकार्याला चालना देण्यासाठी चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा (BRI) विस्तार होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी इस्लामाबादमध्ये सुरू असणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीत केले. एससीओ हा एक युरेशियन राजकीय आणि सुरक्षा गट असून 2001 मध्ये त्याची स्थापन झाली. या गटात चीन, रशिया, भारत आणि पाकिस्तान या प्रमुख राष्ट्रांचा समावेश आहे.
बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा विस्तार
शरीफ यांनी चीनच्या बीआरआय या 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा नेटवर्क प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. याचे उद्दिष्ट आशिया, आफ्रिका आणि युरोपला जोडण्याचे आहे. एका दशकापूर्वी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सुरू केलेला हा बीआरआय प्रकल्प प्रादेशिक एकात्मता सुधारण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो. शरीफ यांनी एससीओ देशांमधील अधिक सहकार्याच्या गरजेवर भर देत या प्रकल्पाचा विस्तार करण्याचे आवाहन केले.
“अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह सारख्या प्रमुख प्रकल्पांचा विस्तार केला जावा…रस्ते, रेल्वे आणि डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्यामुळे आपल्या प्रदेशात एकात्मता आणि सहकार्य वाढेल,” असे शरीफ यांनी या बैठकीचे अध्यक्ष म्हणून संबोधित करताना सांगितले.
चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) हा बीआरआयचा एक महत्त्वाचा घटक असून, चीनने पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, ज्यामध्ये रस्त्यांचे जाळे, धोरणात्मकदृष्ट्या आवश्यक एक बंदर आणि विमानतळ यांचा समावेश आहे. शरीफ यांनी प्रादेशिक सहकार्याचा प्रमुख घटक म्हणून सीपीईसीचे कौतुक केले.
बीआरआयसमोरील आव्हाने आणि टीका
बीआरआय सुरू झाल्यापासून रशियासह 150 हून अधिक देश त्यात सामील झाले असले तरी या उपक्रमाला प्रतिस्पर्धी राष्ट्रे आणि पाश्चात्य शक्तींकडून करण्यात आलेल्या टीकेचा सामना करावा लागला आहे. काहीजण बीआरआयकडे चीनचे भू-राजकीय आणि आर्थिक प्रभाव वाढवण्याचे एक साधन म्हणून पाहतात. गेल्या वर्षी, जी7 राष्ट्रांनी चीनच्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना टक्कर देण्यासाठी 600 अब्ज डॉलरच्या प्रकल्पांची घोषणा केली.
याशिवाय, टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की बीआरआयमुळे विकसनशील देश मोठ्या प्रमाणात कर्जात बुडाले आहेत. असे असूनही, शरीफ हे प्रादेशिक एकात्मता आणि वाढीस चालना देण्यासाठी बीआरआयचे खंदे पुरस्कर्ते आहेत.
अफगाणिस्तानमधील स्थिरता आणि प्रादेशिक सहकार्य
दक्षिण आणि मध्य आशियामध्ये असलेल्या अफगाणिस्तानमधील स्थिरतेच्या महत्त्वावरही शरीफ यांनी जोर दिला. एससीओ सदस्य राष्ट्रांसाठी व्यापार क्षमता वाढविण्यासाठी अफगाणिस्तान महत्त्वपूर्ण आहे. प्रादेशिक सहकार्याला अधिक बळकट करण्यासाठी एससीओअंतर्गत विशेष विकास निधी यंत्रणा निर्माण करण्याचा प्रस्तावही शरीफ यांनी मांडला.
एससीओमधील भारत-पाकिस्तान संबंध
भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री, सुब्रह्मण्यम जयशंकर हे देखील एससीओ बैठकीत सहभागी झाले होते. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांची गेल्या दशकभरातील ही पहिलीच पाकिस्तान भेट होती. अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील संबंध तणावपूर्ण असूनही, जयशंकर यांनी पाकिस्तानचे एससीओ हेड ऑफ गव्हर्नमेंट कौन्सिलच्या अध्यक्षतेबद्दल अभिनंदन केले आणि प्रादेशिक सहकार्यासाठी भारताचा पाठिंबा व्यक्त केला.
जयशंकर यांनी आपल्या भाषणात भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा अप्रत्यक्षपणे संदर्भ देत प्रादेशिक सहकार्यामध्ये परस्पर आदर, प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या महत्त्वावर भर दिला. “जर सीमेपलीकडील कारवाया या दहशतवाद, अतिरेकी आणि फुटीरतावाद यांना प्रोत्साहन देणाऱ्या असतील तर ते व्यापार, ऊर्जा प्रवाह, कनेक्टिव्हिटी आणि नागरिकांमध्ये होणारी देवाणघेवाण यांना प्रोत्साहन देतील याची शक्यता नाही,” असे ते कोणत्याही विशिष्ट देशाचे नाव न घेता म्हणाले.
पाकिस्तान काश्मीरमधील बंडखोरीला पाठिंबा देत असल्याचा आरोप भारत दीर्घकाळापासून करत आला आहे. हा दावा पाकिस्तानने अर्थातच नाकारला आहे. आपण काश्मिरी गटांना केवळ राजनैतिक समर्थन पुरवतो असे पाकिस्तानने प्रतिपादन केले आहे. उलट भारतच आपल्या सीमेत अतिरेक्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे, ज्याचा भारताने इन्कार केला आहे.
हे दोन्ही देश चीनसोबत सीमा विवादांना तोंड देत आहेत, ज्यामुळे त्यांचे संबंध एससीओच्या चौकटीत अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)