पाकिस्तानातील चिनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवरून दोन्ही मित्र देशांमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी मंगळवारीपासून चीनच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. पाकिस्तानचा एक प्रमुख सहयोगी आणि गुंतवणूकदार असलेल्या चीनने त्याच्या महत्त्वाकांक्षी जागतिक पायाभूत सुविधा प्रकल्प, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा (बीआरआय) एक महत्त्वाचा घटक असलेल्या चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी (सीपीईसी) 65 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाईल असे वचन दिले आहे. वाढत्या सुरक्षा आव्हानांमुळे इस्लामाबादचे बीजिंगशी असलेले संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर झरदारी यांचा हा दौरा पार पडत आहे. अलिकडच्या वर्षांत फुटीरतावादी आणि धार्मिक प्रेरित दहशतवाद्यांनी वारंवार चिनी नागरिकांना आणि पाकिस्तानमधील चिनी प्रकल्पांना लक्ष्य केले आहे. ऑक्टोबरमध्ये कराची येथे झालेल्या आत्मघाती स्फोटात दोन चिनी नागरिकांचा मृत्यू झाला, तर वायव्य पाकिस्तानात मार्चमध्ये झालेल्या आणखी एका हल्ल्यात पाच चिनी कामगार ठार झाले.
4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान नियोजित असलेला हा दौरा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून होत आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, झरदारी बीजिंगमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, पंतप्रधान ली कियांग आणि इतर वरिष्ठ चिनी अधिकाऱ्यांना भेटतील. आर्थिक आणि व्यापारी सहकार्य, दहशतवादाला विरोध आणि सुरक्षाविषयक उपाय तसेच चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेचे (सीपीईसी) भवितव्य यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
परराष्ट्र कार्यालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, “हा दौरा आर्थिक आणि व्यापारी सहकार्य बळकट करणे, दहशतवादविरोधी सुरक्षेचे उपाय आणि सीपीईसीच्या चौकटीअंतर्गत संपर्क वाढवण्यावर लक्ष केंद्रित करेल.”
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या चीन दौऱ्यानंतर सुमारे आठ महिन्यांनी हा दौरा होत असून दोन्ही बाजूंनी पाकिस्तानच्या अस्थिर प्रदेशांमध्ये चिनी हितसंबंधांचे रक्षण करण्यावर आणि बीआरआयअंतर्गत सहकार्य वाढवण्यावर भर दिला.
बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वासह पाकिस्तानमध्ये चीनची लक्षणीय गुंतवणूक असूनही, त्याचे प्रकल्प सतत धोक्यात येत आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) सारख्या फुटीरतावादी गटांनी चिनी पायाभूत सुविधा आणि कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले आहे. ऑक्टोबरमध्ये, बीएलएने कराची विमानतळाजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली, ज्यात चिनी नागरिक ठार झाले. या गटाने चीनवर पाकिस्तानच्या मदतीने बलुचिस्तानच्या खनिज साधनांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. इस्लामाबाद आणि बीजिंग दोघांनीही हे आरोप नाकारले आहेत. या प्रकल्पांचा उद्देश या प्रदेशाची प्रगती करणे आहे असा दावा दोन्ही देशांनी केला आहे.
अलिकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानच्या संदर्भात चीनची निराशा वाढली आहे, त्यांच्या नागरिकांवर आणि गुंतवणूक प्रकल्पांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबद्दल सार्वजनिक टीका झाली आहे. बीजिंगने आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तानमध्ये स्वतःचे सुरक्षा दल तैनात करण्याची परवानगी मागितली आहे. मात्र या प्रस्तावाला इस्लामाबादने विरोध केला आहे.
टीम भारतशक्ती