ब्रिक्स परिषदेत द्विपक्षीय बैठकीचे पंतप्रधान मोदींचे संकेत

0
ब्रिक्स
दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियातील कझान येथे रवाना होत असताना पंतप्रधान मोदी

रशियातील कझान येथे दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण तिथे येणाऱ्या सर्व नेत्यांना भेटण्यास उत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान 16 व्या ब्रिक्स परिषदेसाठी कझानला भेट देत आहेत.
आज प्रस्थानापूर्वी जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान म्हणाले, “मॉस्को येथे जुलै 2024 मध्ये झालेल्या वार्षिक शिखर परिषदेच्या आधारे, माझा कझान दौरा भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकारित धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकटी देईल.”
ब्रिक्ससाठी उपस्थित असलेल्या इतर नेत्यांनाही भेटण्यास आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
शिखर परिषदेच्या निमित्ताने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी पंतप्रधान मोदी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह  इतर जागतिक नेत्यांनाही रशियात भेटण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांचे निवेदन हे परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांच्या एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) पोस्टसह आले.
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत प्रवक्त्याने केलेल्या पोस्टनुसार “मजबूत ब्रिक्सच्या दिशेने! PM @narendramodi 16 व्या #BRICS2024 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी 2 दिवसीय रशियाच्या कझान दौऱ्यावर रवाना झाले.”
रशियाला जाण्यापूर्वी पंतप्रधान म्हणाले की, भारत ब्रिक्समधील घनिष्ठ सहकार्याला महत्त्व देतो.
सुधारित बहुपक्षीयता, हवामान बदल, आर्थिक सहकार्य, लवचिक पुरवठा साखळी निर्माण करणे, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि व्यक्तींशी व्यक्ती जोडणे यासारख्या जागतिक विकासाच्या अजेंडावरील अनेक मुद्द्यांवर संवाद आणि चर्चेसाठी ब्रिक्स हे महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे, असे मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी ब्रिक्समध्ये नवीन सदस्यांची भर पडल्याने सर्वसमावेशकता आणि जागतिक हितासाठी काम करण्याचा अजेंडा वाढला आहे.
यावेळी, पाच नवीन सदस्य राष्ट्रांच्या समावेशानंतर ब्रिक्स परिषदेत सहभागी होणाऱ्यांची संख्या दुप्पट असेल.
इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती याशिवाय इजिप्त आणि इथिओपिया या दोन नवीन आफ्रिकन देशांच्या समावेशामुळे आघाडीच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या ब्रिक्स गटाची ताकद आता दुप्पट होऊन दहा झाली आहे.
ब्रिक्समध्ये आकाराने मोठ्या आकाराच्या देशांनी सहभागी होणं याचा अर्थ असा की हे व्यासपीठ जगातील एकूण लोकसंख्येच्या मोठ्या टक्केवारीचे प्रतिनिधित्व करेल.
‘न्याय्य जागतिक विकास आणि सुरक्षेसाठी बहुपक्षीयता बळकट करणे’ या संकल्पनेवर आधारित ही शिखर परिषद उपस्थित नेत्यांना प्रमुख जागतिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारत हा ब्रिक्सचा संस्थापक सदस्य आहे आणि ब्रिक्सच्या चौकटीत राहून आर्थिक सहकार्यासाठी वचनबद्ध आहे, असे रशियातील भारताचे राजदूत विनय कुमार यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.
परराष्ट्र धोरणतज्ज्ञांच्या मते, सुमारे 34 देशांना ‘ब्रिक्स’ गटामध्ये सामील व्हायचे आहे कारण त्यांना वाटते की ‘ब्रिक्स’ हे खरोखरच ‘ग्लोबल साउथ’ चे प्रतिनिधी आहे.
जागतिक जीडीपीच्या 24 टक्के आणि जागतिक व्यापारात 16 टक्क्यांहून अधिक वाटा असलेल्या, जागतिक लोकसंख्येच्या 41 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व ‘ब्रिक्स’ करते.
जुलै 2006 मध्ये जी8 आउटरीच शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, ब्रिक (ब्राझील, रशिया, भारत आणि चीन) देशांचे नेते रशियामध्ये प्रथमच भेटले होते.
सप्टेंबर 2006 मध्ये, न्यू यॉर्कमध्ये यूएन जनरल असेंब्लीच्या सत्राच्या बरोबरीने झालेल्या पहिल्या ब्रिक परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत या गटाला ब्रिक असे औपचारिक रूप देण्यात आले.
2009 मध्ये रशियामध्ये पहिली ब्रिक शिखर परिषद झाली. सप्टेंबर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेला पूर्ण सदस्य म्हणून स्वीकारल्यानंतर ब्रिक गटाचे नाव ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) असे ठेवण्यात आले.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleIndia-China Border Agreement: Pre-2020 Stability Remains Ambitious Target
Next articleChina Confirms Military De-escalation Deal with India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here