रशिया युक्रेनवरील आक्रमण यानंतरही सुरूच ठेवेल असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ठामपणे सांगितले आहे. युक्रेनचे हल्ले आणि सीमेपलीकडून होणारे हल्ले यांपासून संरक्षण करण्यासाठी बफर झोन स्थापन करण्याचा मानस पुतीन यांनी व्यक्त केला आहे. पूर्व आणि दक्षिण युक्रेनमध्ये 1,000 किलोमीटरहून अधिक अंतरावर पसरलेल्या सीमारेषेवर युक्रेनच्या सैन्याचा कमी होत असलेला शस्त्रास्त्र पुरवठा आणि थकलेले सैन्य यांच्याशी गाठ पडल्याने रशियाचे सैन्य बळकट होताना दिसत आहे.
सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पुतीन यांनी युक्रेन सरकारच्या नियंत्रणाखालील प्रदेशांमध्ये ” सुरक्षा क्षेत्र ” तयार करण्याच्या योजनांचे अनावरण केले. हे सुरक्षा क्षेत्र शत्रू वापरत असलेल्या परदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांसमोर मोठी आव्हाने निर्माण करेल असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.
मात्र 2022 मध्ये पूर्ण तयारीनिशी केल्या गेलेल्या आक्रमणानंतरही युक्रेनसंदर्भात रशियाच्या उद्दिष्टांबाबत अजूनही असणाऱ्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांची टिप्पणी आली आहे. या युद्धात होणाऱ्या संभाव्य पाश्चात्य लष्करी हस्तक्षेपाविरूद्ध नाराजी व्यक्त करत असतानाच, यामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वाढू शकते असा इशाराही पुतीन यांनी याआधीच दिला आहे.
रशियाने आपण वाटाघाटी करायला तयार असल्याचे जाहीर केले असले तरी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी कोणत्याही वाटाघाटी करायचे नाकारले आहे. याच दरम्यान, युक्रेनला दिल्या जाणाऱ्या अमेरिकी मदतीला अद्याप मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळे सेनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी व्याजमुक्त कर्ज देता येऊ शकेल का याची चाचपणी करण्याबरोबरच आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी नुकताच कीव्हचा दौरा केला.
विविध प्रदेशांमध्ये रशियन ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे युक्रेनने आपला निषेध नोंदवल्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. विशेषतः सुमी प्रदेशातील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे सीमावर्ती गावांमधून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे.
वाढत्या युद्धाचे परिणाम लक्षात घेऊन, युक्रेनच्या गोळीबारामुळे लक्ष्यित झालेल्या सीमावर्ती भागातून सुमारे 9 हजार मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची रशियाची योजना आहे. म्हणजेच रशियावर राजकीय दबाव आणण्यासाठी सीमावर्ती भागांवर हल्ले करण्याची युक्रेनची रणनीती असल्याचे लक्षात येते.
पुतीन यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केल्याचे समजते. सीमेपलीकडील होत असलेल्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली आव्हाने आणि सध्या सुरू असलेला संघर्ष अधिकाधिक गुंतागुंतीचा होत आहे. जी कमी होण्याची किंवा त्यावर तोडगा निघण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
रामानंद सेनगुप्ता