कतारने भारतातील विविध क्षेत्रांमध्ये 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आखाती देशाचे अमिर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांच्या नवी दिल्ली येथील भेटीदरम्यान, मंगळवारी दोन्ही राष्ट्रांनी एक संयुक्त निवेदन जारी केले, ज्यामध्ये ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली.
निवेदनानुसार, कतारने थेट परदेशी गुंतवणूक (FDI) आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीसाठी (FII) अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी, भारताने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले आणि पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, उत्पादन, अन्न सुरक्षा, लॉजिस्टिक, आदरातिथ्य आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह, विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीच्या संधी शोधण्यामध्ये स्वारस्य व्यक्त केले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, “भारताच्या बाजूने कतारच्या गुंतवणुकीचे वातावरण सुधारण्यासाठी आणि थेट परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी,टाकण्यात आलेली पावले खरंच कौतुकास्पद आहेत.”
भारत आणि कतार यांनी 2030 पर्यंत, द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“दोन्ही देशांकडून, कतारमधील QNB च्या पॉइंट्स ऑफ सेल्समध्ये, भारताच्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या कार्यान्वित होण्याचे स्वागत करण्यात आले. तसेच कतार UPI स्वीकृतीचे देशव्यापी रोल-आउट लागू करण्यास उत्सुक आहेत,” असे या निवेदनात म्हटले आहे.
दोन्ही देशांनी आपापल्या चलनांमध्ये द्विपक्षीय व्यापारावर तोडगा काढण्यासही मान्यता दिली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी मंगळवारी नवी दिल्लीत कतारच्या अमिर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांची भेट घेतली. मोदी यांच्या निमंत्रणावरून अमिर यांनी भारताला भेट दिली.
लाभदायक बैठक – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कतारच्या अमीर यांच्यासोबत झालेली बैठक, ‘लाभदायक’ असल्याचे म्हटले आहे.
“आज माझे बंधू, कतराचे अमीर शेख तामिम बिन हमद अल-थानी यांच्यासोबत खूप लाभदायक बैठक झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली कतारने प्रगतीची नवी उंची गाठली आहे. ते भारत-कतार मैत्रीला मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहेत. ही भेट अधिक विशेष आहे कारण, आम्ही आमच्या संबंधांना एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या स्तरावर नेले आहे,” असे मत मोदी यांनी X द्वारे व्यक्त केले आहे.
मोदी यांनी सांगितले की, ‘भारत आणि कतार यांनी व्यापार संबंधांमध्ये वैविध्य आणण्याचा निर्णय घेतला आहे.’
ते म्हणाले की, “आमच्या चर्चेत व्यापार हा विषय केंद्रस्थानी होती. आम्हाला भारत-कतार व्यापार संबंध वाढवायचे आहेत आणि त्यात विविधता आणायची आहे. आमच्या देशांना ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, अन्न प्रक्रिया, फार्मा आणि ग्रीन हायड्रोजन सारख्या क्षेत्रांमध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळते आहे.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)