लाओसमध्ये चीनच्या संरक्षणमंत्र्यांशी राजनाथ सिंह यांची चर्चा

0
राजनाथ
लाओस येथे चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून यांच्याशी संरक्षणमंत्री सिंह यांची चर्चा

लाओसमधील व्हिएंटियान येथे 11 व्या आसियन संरक्षण मंत्र्यांच्या बैठक-प्लसच्या (ADMM-Plus) निमित्ताने भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून यांच्याशी चर्चा झाली. पूर्व लडाखमधील उरलेल्या फ्रिक्शन पॉइंट्सवरील भारत आणि चीन यांच्या सैन्य माघारीच्या करारानंतर पहिल्यांदाच संरक्षणमंत्र्यांची ही बैठक पार पडली.
भारत आणि चीनमधील सौहार्दपूर्ण संबंध जागतिक शांतता आणि समृद्धीमध्ये लक्षणीय योगदान देतील यावर या बैठकीदरम्यान, संरक्षणमंत्री सिंह यांनी भर दिला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) सद्य परिस्थिती आणि भारत-चीन यांच्यात भविष्यातील संबंध अशा मुद्द्यांवर या चर्चेचा भर असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात अधोरेखित करण्यात आले.
रचनात्मक सहभागाप्रती भारताची बांधिलकी अधोरेखित करत सिंह म्हणाले, “आपल्याला संघर्षापेक्षा सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.” 2020 च्या सीमा संघर्षातून मिळालेले धडे दोन्ही बाजूंना भविष्यात अशा घटना रोखणे तसेच सीमेवर शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करणे यादृष्टीने उपाययोजना आखण्यासाठी मार्गदर्शन करतील यावर त्यांनी भर दिला.

दोन्ही देशांमधील लष्करात आत्मविश्वास वाढावा यासाठी उपाययोजना आखण्याचे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी केले. याशिवाय दोन्ही देशांनी निरंतर संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून विश्वास वाढावा यासाठी काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दोन्ही बाजूंनी स्थिर आणि सौहार्दपूर्ण संबंधांचे उद्दिष्ट ठेवून परस्पर विश्वास आणि समजूतदारपणा यांच्या पुनर्बांधणीसाठी एक आराखडा तयार करण्यावरही त्यांनी सहमती दर्शवली.

मलेशिया आणि लाओच्या संरक्षणमंत्र्यांसमवेत द्विपक्षीय चर्चा

चीनचे संरक्षणमंत्री एडमिरल डोंग जून यांच्याशी झालेल्या बैठकीव्यतिरिक्त, संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांनी  मलेशियन संरक्षणमंत्री दातो ‘सेरी मोहम्मद खालिद बिन नोर्डिन आणि लाओ पीडीआरचे संरक्षणमंत्री जनरल चांसमोन चान्यालाथ यांचीही वियनतियान येथे भेट घेतली.

मलेशियाच्या संरक्षणमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक सुरक्षा आणि स्थैर्याला चालना देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. अर्थपूर्ण परिणाम साध्य करण्यासाठीच्या परस्पर प्रयत्नांबाबतही त्यांनी चर्चा केली आणि 2025च्या पहिल्या तिमाहीत होणाऱ्या मलेशिया-भारत संरक्षण समितीच्या बैठकीबाबतही यांनी चर्चा केली. या आगामी बैठकीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल.

दहशतवादविरोधी एडीएमएम-प्लस तज्ज्ञ कार्यकारी गटाचे सह-अध्यक्ष म्हणून भारत आणि मलेशिया यांनी याअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला तसेच प्रादेशिक सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य अधिक दृढ करण्याचे वचन दिले.
या चर्चेमुळे सुरक्षित आणि समृद्ध इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी भागीदारी बळकट करण्यासाठी, आसियन सदस्य देशांशी असणारे भारताचे सक्रिय संबंध परत एकदा अधोरेखित झाले.

21 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 11 व्या एडीएमएम-प्लसमध्ये सहभागी होण्यासाठी, संरक्षणमंत्री सिंह सध्या तीन दिवसांच्या वियनतियान दौऱ्यावर आहेत. प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा आव्हानांबाबत भारताचा दृष्टीकोन मांडत ते या मंचाला संबोधित करणार आहेत.

एडीएमएम-प्लस हा एक धोरणात्मक मंच आहे, ज्यामध्ये 10 आसियन सदस्य देशांबरोबर भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, रशिया आणि अमेरिका या आठ प्रमुख संवाद भागीदारांचा समावेश आहे. प्रादेशिक संरक्षण आणि सुरक्षा मुद्यांवर संवाद तसेच सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा मंच म्हणून हा काम करतो.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleRajnath Singh Highlights Lessons From 2020 In Talks With Chinese Counterpart In Laos
Next articleनिज्जर हत्येबद्दल मोदींना माहिती असल्याच्या बातमीचा भारताकडून इन्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here