सागरी सीमा बदलण्याचा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचा प्रस्ताव, फिनलंडचा विरोध
दि. २२ मे: क्रीमियाचा घास घेऊन युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियाने आता सागरी विस्तारवादाचे धोरण अवलंबिले असून, बाल्टिक समुद्रातील रशियाची सागरी सीमा बदलण्याचा, स्पष्टच शब्दांत सांगायचे झाल्यास विस्तारण्याचा, प्रस्ताव रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. दरम्यान, फिनलंडने या प्रस्तावाचा विरोध केला असून, रशियाकडून विनाकारण गोंधळ पसरविण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे फिनलंडने म्हटले आहे.
बाल्टिक समुद्रातील रशियाची सागरी सीमा बदलण्याबाबत रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक कच्चा मसुदा तयार केला असून, त्या मसुद्यातील प्रस्तावानुसार रशियाच्या सागरी सीमेचा विस्तार करून ती फिनलंडच्या आखाताच्या पूर्वेला असणाऱ्या रशियन बेटांपासून कालीनीनग्राडच्या बाजूने वाढविण्याचा रशियाचा विचार आहे, अशा आशयाचा मसुदा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने २१ मे रोजी दिला आहे. ‘संरक्षण मंत्रालयाने दिलेला प्रस्ताव मंजूर झाल्यास रशियाच्या बाल्टिक समुद्रातील सागरी सीमा बदलतील आणि हा बदल २५ जानेवारीपासून अंमलात येईल,’ असे रशियाने म्हटले आहे. सोविएतकाळात १९८५ मध्ये रशियाच्या सागरी सीमा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यात वापरण्यात येणाऱ्या सागरी तक्त्यांचा वापर करण्यात आला होता. ते तक्ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या नकाशांशी मेळ खात नाहीत, असे सांगून रशियाने आपल्या या कृतीचे समर्थन केले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या या प्रस्तावामुळे त्यांची सागरी सीमा नक्की कशी बदलली जाणार आहे आणि या बाबत त्यांनी बाल्टिक समुद्राच्या परिसरात वसलेल्या इतर देशांशी चर्चा केली आहे का, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
बाल्टिक समुद्रातील सीमा बदलण्याबाबतच्या रशियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रस्तावाला फिनलंडने विरोध केला आहे. ‘फिनलंडच्या अखातातील सागरी क्षेत्राच्या रशियाने लावलेल्या अर्थाबाबत रशियाच्या माध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या माहितीची आम्ही चौकशी करीत आहोत. रशियाने या बाबत आमच्याशी संपर्क केलेला नाही. या सर्व प्रकारावर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. फिनलंड या ही विषयात नेहेमीप्रमाणे शांतपणे आणि तथ्यांवर आधरित भूमिका घेईल,’असे फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी म्हटले आहे. तर, ‘रशियाने विनाकारण या विषयांत गोंधळ निर्माण करू नये व संयुक्त राष्ट्राच्या सागरी कायदा विषयक धोरणाचे पालन करावे,’ असे आवाहन फिनलंडच्या परराष्ट्रमंत्री एलिना वाल्तोनेन यांनी रशियाला केले आहे. रशियाच्या या प्रस्तावामुळे रशिया आणि उत्तर अटलांटिक करार संघटना (नाटो) यांच्यात तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
असा विचार नाही: रशियाचे स्पष्टीकरण
दरम्यान, रशियन संरक्षण मंत्रालयाचा हा प्रस्ताव उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. तर, बाल्टिक समुद्रातील सागरी सीमा, विशेष आर्थिक क्षेत्र अथवा काहीही बदलण्याचा रशियाचा विचार नाही, असे ‘इंटरफॅक्स’ने संरक्षण मंत्रालयातील सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे. रशियातील ‘टीएएएस’ (तास) आणि ‘आरआयए ‘ या वृत्तसंस्थांनीही रशियाचा असा कसलाही विचार नसल्याचे वृत्त दिले आहे.
विनय चाटी
(रॉयटर्स)