रशियाची पाच क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडल्याचा युक्रेनचा दावा
दि. ०७ जून: रशियन हवाईदलाने शुक्रवारी सकाळी आपल्या ड्रोन आणि केएच-१०१ आणि केएच-५५५ या क्षेपणास्त्रांच्या मदतीने युक्रेनची राजधानी कीव्हच्या परिसरात हवाईहल्ले चढविले. या हल्ल्यांमुळे लागलेल्या आगीमुळे किव्हच्या परिसरातील औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची माहिती या प्रांताच्या राज्यपालांनी दिली आहे. दरम्यान, रशियाने डागलेली पाच क्षेपणास्त्रे आणि ५३ पैकी ४८ ड्रोन आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने पडली असल्याचा दावा युक्रेनच्या हवाईदलाने केला आहे.
रशियाने सकाळच्या सुमारास केलेल्या या हल्ल्यात खार्कीव्हमध्येही नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. या ड्रोन हल्ल्यात शहरातील कमीतकमी तीन इमारतींचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस आणि एका किराणा दुकानांसह काही औद्योगिक आस्थापनांचेही नुकसान झाले आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आगीमुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि तातडीच्या सेवांनी काम सुरु केले आहे, असे खार्कीव्ह प्रांताचे गव्हर्नर ओलेह सिनैहुबोव यांनी सांगितले. तर, द्निप्रोपेत्रोव्स्क भागात रशियाची तीन ड्रोन पाडण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.
किरोवोह्रड भागातही रशियाने ड्रोनच्या मदतीन हवाईहल्ला चढविला. मात्र, युक्रेनी लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे ड्रोन हवेतच नष्ट केल्यामुळे फार नुकसान झाले नाही, असे या प्रांताच्या गव्हर्नरने सांगितले. तर, ख्मेलनिस्की या भागात डागण्यात आलेली ११ रशियन ड्रोन हवाईदलाने नष्ट केली, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दक्षिण ओडेसा भागात सात, खेर्सोन भागात तीन आणि मिकोलैव भागात दोन ड्रोन पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात वीज यंत्रणेचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे युक्रेनचे वीज उपमंत्री मिकोला कोलीन्स्क यांनी सांगितले.
गेल्या महिन्यापासून युक्रेनच्या उर्जा निर्मिती क्षेत्राला रशियाने मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले आहे. युक्रेनची उर्जा निर्मिती केंद्रे बंद पडून त्यांची वीज निर्मिती क्षमता नष्ट करणे हे रशियाचे उद्दिष्ट आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या वीज निर्मिती प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले असून, देशात वीज टंचाईचे संकट उभे थकले आहे.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)