माध्यमांमधील मनी लॉन्ड्रिंगच्या अमेरिकेच्या आरोपांवर रशियाची टीका केली आहे. अमेरिकेने बुधवारी रशियन स्टेट मीडिया नेटवर्क आरटीच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे आरोप दाखल केले.
रशियन खासदारांनी आरटीविरुद्ध अमेरिकेच्या दंडात्मक उपाययोजनांवर टीका केली असून हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. आरटी हा एक रशियन स्टेट मीडिया ग्रुप आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने दोन आरटी कर्मचाऱ्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे आरोप दाखल केले आहेत. आगामी अध्यक्षीय निवडणुकीतील मतांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने आशय तयार करण्यासाठी अमेरिकन कंपनीची नियुक्ती केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
प्रत्यक्ष आरोप
कर्मचाऱ्यांनी कथितपणे शेल कंपन्या आणि बनावट व्यक्तींचा वापर करून एका अज्ञात टेनेसी कंपनीला 10 दशलक्ष डॉलर्स दिले. या कंपन्या अमेरिकेतील राजकीय मतविभागणी वाढवण्याच्या उद्देशाने ऑनलाइन व्हिडिओ तयार करतील.
यू. एस. ट्रेझरी आणि राज्य विभागांनी आरटी नेटवर्कच्या सर्वोच्च संपादक मार्गारिटा सिमोनोवना सिमोनियन यांच्याविरोधातही आरोप केले आहेत.
अमेरिकेची राजकीय मतविभागणी वाढवणे आणि युक्रेनला दिला जाणारा अमेरिकी मदतीसाठीचा सार्वजनिक पाठिंबा कमकुवत करणे हे रशियाचे उद्दिष्ट असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
2016 आणि 2020च्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचे अमेरिकेच्या आधीच्या गुप्तचर अहवालात आढळून आले होते. तर दुसरीकडे रशियातील अधिकाऱ्यांचा दावा आहे की अमेरिकेनेदेखील त्यांच्या देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केला आहे.
निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा दावा रशियाला अमान्य
क्रेमलिन आणि रशियन परराष्ट्र मंत्रालयाने वारंवार स्पष्ट केले आहे की मॉस्कोने अमेरिकेच्या निवडणुकीत कोणताही हस्तक्षेप केलेला नाही, परंतु ते सगळ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
रशियन संसदेच्या वरच्या सभागृहाचे उपाध्यक्ष कॉन्स्टँटिन कोसाचेव्ह यांनी आरआयए वृत्तसंस्थेला सांगितले की, अमेरिकेच्या या आरोपांमागचा उद्देश पर्यायी मते जाहीर होण्यापासून रोखणे हा होता.
कोसाचेव्हने आरआयएला सांगितले की, “त्यामुळे रशियन माध्यमे अधिकाधिक लोकप्रिय असून त्यांना प्रचंड मागणी असल्याचे दिसून येते.”
“अमेरिकी अधिकाऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रियेमागील हेच कारण आहे, जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या तत्त्वांशी पूर्णपणे विसंगत आहे.”
स्टेट ड्यूमाच्या खालच्या सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष लियोनिद स्लट्स्की यांनी हे निर्बंध “वाईट हेतूने प्रेरित असून, ते भाषण स्वातंत्र्यावर दबाव टाकणारे आणि आक्षेपार्ह सेन्सॉरशिपशी संबंधित असल्याचे” म्हटले आहे.
स्लट्स्की म्हणाले, ‘खोट्या साम्राज्याचे’ प्रतिनिधी समकालीन नव-वसाहतवाद्यांच्या धोरणाबद्दल सत्य सांगणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध युद्ध पुकारत आहेत.
या निर्बंधांबाबत क्रेमलिनकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
रशियाने निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असा अमेरिकी गुप्तचरांचा दावा मूर्खपणाचा असल्याचे सांगत क्रेमलिनने जूनमध्ये हा दावा फेटाळून लावला होता. अमेरिकेच्या हेरांचा रशियाला शत्रू ठरवण्याचा हेतू होता अशी प्रतिक्रिया रशियाने त्यावेळी दिली होती.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यापूर्वी बायडेन यांच्याविषयी तिरकसे बोलले असले तरी रशियासाठी जो बायडेन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक श्रेयस्कर ठरले असते असे मत व्यक्त केले होते.
क्रेमलिन आणि रशियन खासदारांची प्रतिक्रिया
निर्बंधांच्या घोषणेपूर्वी, रशियन खासदार मारिया बुटीना म्हणाल्या की निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा कोणतीही दावा हा निव्वळ मूर्खपणा आहे. मॉस्कोला असे वाटते की अमेरिकेच्या निवडणुकीतील एकमेव विजेता यूएस मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“अमेरिकेचे दावे निव्वळ मूर्खपणाचे आणि आकसयुक्त होते आणि आहेत,” असे बुटिना म्हणाल्या. नोंदणीकृत नसलेली रशियन एजंट म्हणून काम केल्याबद्दल त्यांनी अमेरिकेच्या तुरुंगात 15 महिने घालवले होते. त्या आता सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षाच्या खासदार आहेत.
अमेरिकेच्या निवडणुकीत कोण जिंकते याने काहीच फरक पडत नाही असे आम्हाला (रशियाला) वाटते कारण अमेरिकेचे खाजगी लष्करी-औद्योगिक संकुल हाच एकमेव विजेता आहे. तेच महत्त्वाचे आहे-आणि दुसरे काही नाही,” असे बुटिना म्हणाल्या.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांची रविवारी प्रकाशित झालेल्या एका मुलाखतीत सांगितले की, रशियाच्या दृष्टीने अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक चांगल्या संभाव्य उमेदवार आहेत. मात्र त्यामुळे रशियाचे अमेरिकेशी संबंध सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही.
ऐश्वर्या पारेख
(रॉयटर्स)