कीवच्या राज्यपालांनी सोमवारी दिलेल्या वृत्तानुसार, रशियाने रविवारी रात्री उशीरा कीववर सलग तिसऱ्यांदा हवाई हल्ला केला, ज्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाली तर आजूबाजूच्या प्रदेशातील अनेक घरांचे नुकसान झाले.
टेलिग्राम मेसेजिंग अॅपवरील पोस्टमध्ये, राज्यपाल मायकोला कलाश्निक यांनी जाहीर केले की, “या हल्ल्यामध्ये एका ३७ वर्षीय व्यक्तीच्या शरीराच्या वरच्या भागात आणि डोक्यात शस्त्रांच्या तुकड्यांमुळे जखमा झाल्या आहेत. उपचारासाठी त्या व्यक्तीला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
“रविवारी उशिरा आग्नेय झापोरिझ्झिया प्रदेशात, रशियाने केलेल्या हल्ल्यात एक 54 वर्षीय महिला जखमी झाली आणि बहुमजली आणि निवासी इमारतीतील घरांचे नुकसान झाले,” असे प्रदेश प्रशासनाने टेलिग्रामवर सांगितले.
हल्ल्यांनंतर शांतता चर्चांचा पाठपुरावा
हे हल्ले युक्रेनच्या शिष्टमंडळाने, सौदी अरेबियात अमेरिकन अधिकाऱ्यांशी शांतता चर्चेसाठी भेट घेतल्यानंतर आणि सोमवारी रशिया-अमेरिका चर्चांसाठी सुरू होणाऱ्या बैठकीच्या अगोदर झाले. या बैठकीत काळ्या समुद्रातील (black sea) जहाजांच्या सुरक्षेसाठीच्या उपायांवर चर्चा करण्यात येणार होती.
‘अमेरिका युक्रेन आणि रशियामधील शांतता करारासाठी दबाव आणत आहे आणि 20 एप्रिलपर्यंत युद्धातील व्यापक युद्धविराम साध्य करण्याची आशा ठेवत आहे’, असे ब्लूमबर्ग न्यूजने रविवारी सांगितले, ज्यामध्ये नियोजनाशी परिचित असलेल्या व्यक्तींना उद्धृत केले आहे.
परंतु शांततेच्या प्रयत्नांनंतरही, दोन्ही बाजूंनी सतत हल्ल्यांच्या अहवालांची नोंद केली जात आहे.
दरम्यान, या हल्ल्याविषयी रशियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. दोन्ही बाजू युद्धात नागरिकांना लक्ष्य केल्याचे नाकारतात, जिथे रशियाने 2022 फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर सुरु केलेल्या हल्ल्यांत मोठी जीवितहानी झाली होती.
कीव, त्याच्या आसपासचा प्रदेश आणि युक्रेनच्या पूर्वीच्या भागात रविवारच्या उशिरापासून काही तासांपर्यंत हवाई हल्ल्याची चेतावणी होती, असे युक्रेनच्या वायुसेना नकाशांवर सांगितले आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांची आगीशी झुंज
दरम्यान, रशियाच्या क्रास्नोडार प्रदेशातील तेल गोदामात लागलेल्या आगीशी, अग्निशमन दलाचे जवान सलग पाच दिवस झुंजत होते. गेल्या आठवड्यात युक्रेनवरील ड्रोन हल्ल्यामुळे ही आग लागली, असा आरोप स्थानिक प्रशासनाने केला आहे.
“गोदामातील एका टाकीला आणि तेल उत्पादन प्लांटमध्ये ही आग लागली आहे,” असे स्थानिक प्रशासनाने रविवारी टेलिग्राम मेसजिंग अॅपवर पोस्ट करत सांगितले.
“रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, कवकझस्काया गावाजवळ असलेल्या गोदामात लागलेली ही आग, सुमारे 2 हजार चौरस मीटर (21,500 चौरस फूट) आवारात पसरली होती,” असे प्रशासनाने टेलिग्रामवर सांगितले.
“तेल उत्पादनांच्या गळतीमुळे रात्रीच्या वेळी आगीचा आवाका जवळजवळ दुप्पट झाला,” असेही त्यांनी यात नमूद केले.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “हा हल्ला युक्रेनमध्ये युद्धविराम प्रस्थापित करुन, पायाभूत सुविधांवर हल्ले थांबविण्याच्या कराराचे उल्लंघन होता.”
स्थानिक प्रशासनाने आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण केले.
हे गोदाम, रशियान तेल पुरवठ्यासाठी कझाकस्तानला जाणाऱ्या पाईपलाइनसाठीचे एक रेल्वे टर्मिनल आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)