नवा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी रशियात आजपासून तीन दिवसांच्या मतदानाला सुरुवात होत आहे. 2030 पर्यंत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन सत्तेवर येणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याने निवडणूक निकालांबाबत फारशी उत्सुकता नाही.
मुळातच पुतीन यांना आव्हान देणारी किंवा विरोध करणारी कोणतीही व्यक्ती एकतर तुरुंगात पाठवली किंवा हद्दपार करून तिची परदेशात रवानगी होते.
मतदानाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?
गुन्हेगारी किंवा अन्य दोषारोपामुळे तुरुंगात नसलेल्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही रशियन नागरिक मतदान करण्यास पात्र असतो. या निवडणुकीसाठी रशियामध्ये सुमारे 112.3 दशलक्ष पात्र मतदार आहेत.
रशियाच्या 2018च्या अध्यक्षीय निवडणुकीत 67.5 टक्के मतदान झाले होते. मात्र त्यावेळी मतदानात फार मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे मानले जाते.
लोक मतदान कसे करतील ?
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकाऐवजी सलग तीन दिवस रशियन जनता मतदान करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र अनेक दिवसांचे मतदान होण्याची रशियातील ही पहिलीच वेळ नाही. 2020 मध्ये पुतीन यांनी आणखी दोन वेळा निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यासाठी घटनात्मक सुधारणांवर सार्वमत घेतले होते. त्यावेळी चाललेले मतदान एकापेक्षा जास्त दिवस आयोजित केले होते.
याशिवाय ऑनलाईन मतदानाचा वापर करणारी ही पहिलीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. 27 रशियन प्रदेश आणि क्रिमिया – जे मॉस्कोने 10 वर्षांपूर्वी युक्रेनकडून बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले होते – या ठिकाणी रशियन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. याशिवाय 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण करून रशियाने ताब्यात घेतलेल्या डोनेट्स्क , लुहान्स्क , झापोरिझ्हिया आणि खेरसन या चार प्रदेशांमध्येही निवडणुका होतील.
71 वर्षीय विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, त्यामुळे ते आणखी सहा वर्षे सत्तेत राहतील. 2000 साली पहिल्यांदा ते सत्तेवर आले आणि आता सोव्हिएत हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर ते सर्वात जास्त काळ पदावर राहणारे क्रेमलिन नेते असतील.
कम्युनिस्ट पक्षाचे निकोलाई खारितोनोव्ह , राष्ट्रवादी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे लियोनिद स्लुत्स्की आणि न्यू पीपल्स पार्टीचे व्लादिस्लाव दावनकोव्ह हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील इतर उमेदवार आहेत.
पुतीन यांच्या विरोधात उभे असलेले लोक युक्रेनमधील युद्धासह क्रेमलिनच्या धोरणांना पाठिंबा देतात. मात्र पुतीन यांना आव्हान देण्यासाठी अशा उमेदवारांना पुरेशी मते मिळण्याची शक्यता नसते हे या आधीच्या निवडणुकांमध्ये बघायला मिळाले आहे.
या निवडणुकीत पुतीन यांना सर्वाधिक धोका बोरिस नादेझदीन या उदारमतवादी राजकारण्याकडून असल्याचे मानले जात होते. युद्ध संपवणे यावर जोर देत त्याने आपला मुख्य प्रचार करायला सुरूवा केली होती. पण निवडणूक आयोगाने त्याला निवडणूक लढवण्यास मनाई केल्यामुळे त्याची उमेदवारीच नाकारली गेली.
मुक्त आणि निष्पक्ष मतदान नाही
या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष होण्याची अजिबात शक्यता नाही असे निरीक्षक मानतात; कारण तीन दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या ऑनलाइन मतदानामुळे पारदर्शकतेमध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे .
केवळ एकच विजेता
अस्तित्वात नसलेला विरोध आणि कोणताही इतर पर्याय नसणे यामुळे निवडणुकांमध्ये रशियन जनतेला पुतीन आणि युद्धाबद्दल वाटणारा असंतोष दर्शविण्याची फार कमी संधी आहे. जो कोणी पुतीन यांना आव्हान देऊ शकतो त्याला एकतर तुरुंगात टाकले जाते किंवा हद्दपार करण्यात येते.
पिनाकी चक्रवर्ती