Tuesday, March 3, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi युक्रेनवर रशियाचा सर्वात मोठा हवाई हल्ला, कीवमधील सरकारी इमारतीला आग

युक्रेनवर रशियाचा सर्वात मोठा हवाई हल्ला, कीवमधील सरकारी इमारतीला आग

0

रशियाने युक्रेनसोबतच्या युद्धातील आजवरचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला, ज्यात कीवमधील युक्रेनच्या मुख्य सरकारी इमारतीला आग लागली आणि तीन जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती रविवारी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. जळललेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये, एका अर्भकाचा (infant) मृतदेह असल्याचेही त्यांनी नमूद केले.

युक्रेनच्या पंतप्रधान युलिया स्विरिडेन्को यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर सांगितले की, “शत्रूच्या हल्ल्यामुळे पहिल्यांदाच सरकारी इमारतीचे नुकसान झाले असून, तिच्या छताला आणि वरच्या मजल्यांना हानी पोहचली आहे.”

रॉयटर्सच्या साक्षीदारांनी पाहिले की, ऐतिहासिक पेचेर्स्कीई जिल्ह्यात असलेल्या युक्रेनच्या मुख्य सरकारी इमारतीचा वरचा मजला जळत होता आणि सूर्योदयानंतर स्वच्छ निळ्या आकाशात दाट धूर पसरला होता.

805 ड्रोन्स एका रात्रीत डागले

युक्रेनच्या वायुसेनेने टेलिग्रामवर सांगितले की, “रशियाने रात्रभर सुरु ठेवलेल्या या हल्ल्यांत 805 ड्रोन्स आणि 13 क्षेपणास्त्रे युक्रेनवर डागली. मात्र, युक्रेनच्या संरक्षण युनिट्सने 751 ड्रोन आणि 4 क्षेपणास्त्रे हाणून पाडली.”

फेब्रुवारी 2022 मध्ये मॉस्कोने युक्रेनवर पूर्ण-प्रमाणात आक्रमण सुरू केल्यापासून, रशियाने देशावर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या ड्रोनची ही सर्वाधिक संख्या होती.

राजधानीच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख तिमुर तकाचेंको म्हणाले की, “डार्नित्स्कीई जिल्ह्यात एका चार मजली अपार्टमेंट इमारतीला नुकसान झाले होते, जिथे ढिगाऱ्याखालून बालकाचा मृतदेह काढण्यात आला.”

या हल्ल्यामुळे ड्निप्रो नदीच्या पूर्वेकडील या जिल्ह्यात एका तरुणीचाही मृत्यू झाल्याचे, तकाचेंको यांनी सांगितले.

राज्य आपत्कालीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, “रात्रभर सुरू राहिलेल्या या हल्ल्यात 18 लोक जखमी झाले असून, शहरात ठिकठिकाणी आगी लागल्या आहेत.”

मॉस्कोने या हल्ल्यांवर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दोन्ही पक्ष हल्ल्यांमध्ये नागरिकांना लक्ष्य केल्याचे अमान्य करतात, पण फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या पूर्ण-प्रमाणातील आक्रमणात हजारो लोक मरण पावले आहेत.

यापूर्वी, कीवचे महापौर विटाली क्लित्श्को यांनी सांगितले होते की, “डार्नित्स्कीईमधील एका बॉम्ब निवारागृहात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि जखमी झालेल्यांमध्ये एक गर्भवती महिला देखील होती.”

राज्य आपत्कालीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ड्रोन हल्ल्यात ज्या चार मजली निवासी इमारतीला धक्का बसला, तिच्या दोन मजल्यांमध्ये आग लागली आणि तिची रचना अंशतः उद्ध्वस्त झाली.”

ड्रोनचे अवशेष

“पश्चिम भागातील स्वियातोशिन्स्कीई जिल्ह्यात, नऊ मजली निवासी इमारतीचे अनेक मजले अंशतः उद्ध्वस्त झाले”, असे क्लित्श्को आणि आपत्कालीन अधिकाऱ्यांनी सांगितले.

“पडणाऱ्या ड्रोनच्या अवशेषांमुळे एका 16 मजली अपार्टमेंट इमारतीला आणि आणखी दोन नऊ मजली इमारतींना आग लागली”, असे महापौरांनी सांगितले.

स्विरिडेन्को यांनी युक्रेनसाठी आणखी शस्त्रे आणि रशियन हल्ल्यांना जगाने उत्तर देण्याचे आवाहन केले.

“आम्ही इमारती पुन्हा बांधू पण गमावलेले जीव परत आणता येत नाहीत. शत्रू दररोज देशभरातील आमच्या लोकांचा छळ करत आहे आणि त्यांना मारत आहे,” असे स्विरिडेन्को म्हणाल्या.

इमारतींमधून बराच काळ धूर बाहेर पडताना दिसत होता, काही इमारतींचे मजले अंशतः कोसळले होते आणि दर्शनी भाग तुटले होते, असे आपत्कालीन अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये दिसले.

“रशिया जाणीवपूर्वक नागरी ठिकाणांना लक्ष्य करत आहे,” असे कीवचे लष्करी प्रशासक तकाचेंको यांनी टेलिग्रामवर सांगितले.

“युक्रेनमधील मध्यवर्ती शहर क्रेमेन्चुकमध्येही डझनभर स्फोटांमुळे हादरे बसले, ज्यामुळे काही भागांतील वीज पुरवठा खंडित झाला आणि ड्निप्रो नदीवरील एका पुलाला नुकसान झाले,” असे शहराचे महापौर विटाली मालेत्स्की यांनी टेलिग्रामवर सांगितले.

युक्रेनमधील मध्यवर्ती शहर क्रिवी रिह येथे, रशियन हल्ल्यांनी वाहतूक आणि शहरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्याचे, असे शहराच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेक्सान्द्र विल्कुल यांनी टेलिग्रामवर सांगितले, पण यामध्ये कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

“दक्षिणेकडील ओडेसा शहरात, नागरी पायाभूत सुविधा आणि निवासी इमारतींचे नुकसान झाले, अनेक अपार्टमेंट ब्लॉक्समध्ये आग लागली,” असे प्रादेशिक राज्यपाल ओलेह किपर यांनी टेलिग्रामवर सांगितले.

“पश्चिम युक्रेनला हवाई हल्ल्यांचा धोका असल्याने, पोलंडने हवाई सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्वतःचे आणि मित्र राष्ट्रांची विमानसेवा सक्रिय केली आहे,” असे पोलिश सशस्त्र दलाच्या ऑपरेशनल कमांडने सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअमेरिकेसोबतचे संबंध काही महिन्यांत पूर्ववत होऊ शकतात का? तज्ज्ञांचे मत…
Next articleकाई कींचा उदय आणि प्रगती: शींचा उजवा हात, मात्र उत्तराधिकारी नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here