‘डीआरडीओ’ परिसंवाद: संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांचे मत
दि. ०९ मे: ‘भूराजकीय आणि भूसामारिक बाबतीत विश्वासार्ह असे काहीच नसते त्यामुळे भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संरक्षणासह सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची आहे, असे मत संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी व्यक्त केले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ‘पायाभूत क्षेत्राच्या विकासातील नवीन तंत्रज्ञान’ या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सरकारचा आत्मनिर्भर भारत कार्यक्रम आणि पायाभूत क्षेत्राच्या विकासात नव्या तंत्रज्ञानामुळे निदर्शनास आलेली आव्हाने या विषयावर विचारमंथन करण्यासाठी उद्योगजगत, शिक्षणक्षेत्र, सैन्यदले आणि डीआरडीओतील तज्ज्ञांनी एकत्र येवून विचारमंथन करावे आणि अनुभवांची देवाणघेवाण करावी, या साठी या दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात बोलताना संरक्षण सचिव गिरीधर अरमाने म्हणाले, की भारत हा तरुणाचा देश आहे. त्यामुळे त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी संरक्षण उत्पादनासह देशउभारणीच्या विविध क्षेत्रात स्वयंपूर्णता गरजेची आहे. त्यातूनच रोजगारनिर्मितीलाही मोठी चालना मिळेल. संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेबाबत बोलताना ते म्हणाले, ‘भूराजकीय आणि भूसामारिक बाबतीत विश्वासार्ह असे काहीच नसते, त्यामुळे आपल्या संरक्षणासाठी आणि राष्ट्रीय हिताच्या जपणुकीसाठी भारत दुसऱ्यावर अवलंबून राहू शकत नाही. स्वयंपूर्णतेमुळे २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सीमाभागातील पायाभूत सुविधांच्या विकासाकडे सरकारने प्राधान्याने लक्ष पुरविले असून, या भागाच्या विकासात पायाभूत सुविधानिर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योगांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. सीमाभागातील लोकांनी त्यांच्या गावातच राहावे व तेथेच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, याच उद्देशाने सरकारने ‘व्हायब्रंट व्हिलेज’ ही संकल्पना राबविली आहे. ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी खासगी क्षेत्राच्या सहयोगाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर भारतासाठी होण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील उद्योगांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे आणि त्याच उद्देशाने ‘डीआरडीओ’ने खासगी उद्योगांना संशोधन आणि विकास कार्यात मदत करण्यास सुरुवात केली आहे, असे ते म्हणाले.
संरक्षण विभागाचे संशोधन आणि विकास सचिव व ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनी या प्रसंगी देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. भारताने तांत्रिक पायाभूत सुविधांच्या विकासात मोठी मजल मारली आहे. देशाची सामरिक प्रतिकार क्षमता सिद्ध करण्यासाठी या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. आपण या क्षेत्रात चांगले काम करीत आहोत, मात्र अधिक मजल मारायची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे त्यामुळे या क्षेत्रात पर्यावरणपूरक आणि शाश्वत तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
या परिषदेसाठी उद्योगजगताच्या प्रतिनिधींसह आयआयटी व एनआयटीचे विद्यार्थीही उपस्थित आहेत. त्यांच्या विविध प्रकल्पांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही अरमाने यांच्या हस्ते करण्यात आले.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)