पाकिस्तानच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी चीनकडून पाकला केली जाणारी गुप्त मदत बघता, चीन सातत्याने आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचे उल्लंघन करत आहे असेच म्हणावे लागेल.
गेल्या फक्त चार वर्षांत, भारतीय गुप्तचर आणि तपास यंत्रणांनी चिनी संस्थांनी खरेदी केलेल्या दुहेरी वापराच्या किमान अर्धा डझन वस्तूंनी भरलेला माल पकडला आहे किंवा त्यांचा मागोवा घेतला आहे. हा माल चीनने युरोप आणि अमेरिकेमधून पाकिस्तानला पुरवठा करण्यासाठी खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
फक्त उपकरणेच नाही…
भारतीय आणि इतर देशांच्या गुप्तचर संस्थांनी केलेल्या विश्लेषणानुसार, चीनकडून पाकिस्तानला मिळणारी मदत ही केवळ साधनसामग्रीच्या रूपातच नव्हे तर तंत्रज्ञान आणि सेवा पुरवणे अशा स्वरूपातही बघायला मिळते.
निरनिराळ्या देशांकडून असा माल रोखणे, तो जप्त करणे किंवा अनेक राज्य संस्था आणि शेल कंपन्यांवर निर्बंध घालण्याचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे चीन आणि पाकिस्तान आपला माल गुप्तपणे देशात पोहोचण्याची प्रक्रिया सुलभ, सोपी करण्यासाठी तिसऱ्या जगातील देशांमध्ये असलेल्या शेल कंपन्यांचा पर्यायी मार्ग शोधत आहेत.
गुन्ह्यांची मालिका
खाली नमूद केलेल्या उदाहरणांवरून हे सिद्ध होते की, अलीकडच्या काळात भारतीय बंदरांवर संवेदनशील किंवा दुहेरी वापराच्या मालवाहतुकीच्या जप्तीत वाढ झाली आहे. यामुळे पाकिस्तान आणि चीन या दोघांनाही त्यांच्या अवैध मालवाहतूकीबाबतच्या प्रक्रिया उघड होत असल्याबद्दल चिंता आहे.
भारतात अलीकडेच करण्यात आलेली काही मालाच्या जप्तीची उदाहरणे बीजिंग आणि इस्लामाबादने अवैध व्यापारावरील बंदी आणि निर्बंध यांना अटकाव करण्यासाठी सुरू असणाऱ्या अथक प्रयत्नांकडे निर्देश करतात.
नवे वर्ष, जुनीच गोष्ट
याचे ताजे उदाहरण यावर्षीच्या जानेवारी महिन्यात बघायला मिळाले. जीकेडीसीएनसी टेक्नॉलॉजी या इटालियन कंपनीने तयार केलेलई सीएनसी यंत्रे भारतीय सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 23 जानेवारी रोजी मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर जप्त केली. ही यंत्रे चीनमार्फत पाकिस्तानला पाठवण्यात येत होती.
हा माल शांघाय जेएक्सई ग्लोबल लॉजिस्टिक कंपनी लिमिटेड, चीनने पाठवला होता आणि ज्याच्याकडे माल पोहोचणार होता त्याचे नाव पाकिस्तान विंग्ज प्रायव्हेट लिमिटेड, सियालकोट असे होते.
सीएनसी यंत्रांचा हा कंटेनर चीनमधील शेकोऊ बंदरावर सीएमएसीजीएम अट्टिला या व्यापारी जहाजावर 9 जानेवारी रोजी चढविण्यात आला होता आणि तो कराची बंदराकडे जात होता. मात्र हे जहाज कराचीकडे जाण्याआधी 22 जानेवारी 2024 रोजी मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर पोहोचले.
बनावट ग्राहक
सखोल तपास केल्यावर भारतीय अधिकाऱ्यांना आढळले की पाकिस्तानी संरक्षण पुरवठादार कॉसमॉस इंजिनिअरिंग कंपनी मालवाहतुकीची मूळ ग्राहक होती, तर चीनची मेसर्स ताईयुआन मायनिंग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंपनी लिमिटेड ही मूळ मालवाहतूकदार होती.
त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की पाकिस्तान विंग्स प्रायव्हेट लिमिटेड चीन, इटली आणि तुर्कीसारख्या विविध ठिकाणांहून पाकिस्तानी संरक्षण संस्थांसाठी दुहेरी वापराच्या आणि प्रतिबंधित वस्तूंची मालवाहतूक सुलभ करण्यात गुंतलेली आहे.
आंतरराष्ट्रीय संस्थांकडून अशा मालाचा शोध टाळण्यासाठी, पाकिस्तान विंग्स कॉसमॉस इंजिनिअरिंगसारख्या मालवाहकाचे नाव मुखवट्यासारखे वापरते. पाकिस्तान विंग्सचे राष्ट्रीय अभियांत्रिकी आणि वैज्ञानिक आयोगाची (नेस्कॉम) शेल कंपनी मेसर्स क्वांटम लॉजिक्सशी जवळचे संबंध आहेत. याशिवाय पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेने निर्बंध घातलेली ही संस्था आहे.
मार्च 2022 मध्ये, याच न्हावा शेवा बंदरावर, भारतीय अधिकाऱ्यांनी मेसर्स डिस्टेक स्ट्रुमेन्टी अँड मिस्युर एसआरआय (डीएसएम) या इटालियन कंपनीकडून मिळवलेल्या थर्मो-इलेक्ट्रिक उपकरणांचा माल पकडला होता. कॉसमॉस इंजिनिअरिंग ही ए. क्यू. खान संशोधन प्रयोगशाळेसाठी तयार करण्यात आलेली कंपनी आहे. या जप्तीनंतर कॉसमॉस इंजिनिअरिंगला आंतरराष्ट्रीय निरीक्षण यादीत (watch list) ठेवण्यात आले.
पाकिस्तानच्या डब्ल्यूएमडी कार्यक्रमाला मदत
मे 2023 मधील आणखी एका घटनेत, पाकिस्तानच्या डब्ल्यूएमडी (weapon/weapons of mass destruction) कार्यक्रमासाठी चीनमधून पाठवण्यात आलेली जॅकेटयुक्त ग्लास रिॲक्टर्स (तापमान नियंत्रित करण्यासाठी तेल किंवा पाणी प्रसारित करते) आणि प्रयोगशाळेची इतर प्रमुख उपकरणे भारतीय सीमाशुल्क विभागाने न्हावा शेवा बंदरावर जप्त केली. माल्टाचा ध्वज असलेले सीएमएसीजीएम फिगारो हे जहाज किंगदाओ बंदरातून कराचीला जाणाऱ्या कंटेनरमधून ही उपकरणे घेऊन जात होते. आपल्या प्रवासादरम्यान हे जहाज न्हावा शेवा बंदरावर पोहोचले, जिथे भारतीय सीमाशुल्क विभागाने माल जप्त केला.
उपलब्ध तपशीलांनुसार वर्ल्ड पांडा लॉजिस्टिक्स कंपनी लिमिटेडला माल पाठवणारी म्हणून सूचित करण्यात आले होते, तर उपकरणांची निर्मिती चीनच्या शॅन्डोंग प्रांतातील जिनान येथे स्थित मेसर्स बायोबेस इंटरनॅशनल कंपनी लिमिटेडने केली होती. इमर्जिंग फ्युचर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही पाकिस्तानच्या डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशनची (DESTO) रावळपिंडी स्थित शेल कंपनीकडे हा माल पोहोचवला जाणार होता. पाकिस्तानच्या डब्ल्यूएमडी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल अमेरिकन वाणिज्य विभागाच्या बीआयएसने निर्बंध घातलेली संस्था म्हणून या कंपनीला सूचीबद्ध केले होते.
पुरवठादारावर अमेरिकेकडून निर्बंध
हे सगळं इथेच संपत नाही. सीमाशुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेने निर्बंध घातलेला चिनी पुरवठादार मेसर्स जनरल टेक्नॉलॉजी लिमिटेडने पुरवलेले ऑटोक्लेव्ह (दाब वाहिन्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरले जाणारे) फेब्रुवारी 2020 मध्ये भारतीय अधिकाऱ्यांनी गुजरातमधील कांडला बंदरात जप्त केले होते.
हाँगकाँगचा झेंडा असलेल्या दाई कुई युन नावाच्या चिनी जहाजातून हे ऑटोक्लेव्ह जप्त करण्यात आले. ते चीनच्या जिआंगसू प्रांतातील जिआंगिन बंदरातून पाठवण्यात आले आणि ते पाकिस्तानच्या कासिम बंदराकडे जात होते. ही उपकरणे जहाजाच्या तळाशी लपवून ठेवण्यात आली होती.
ताब्यात घेतलेल्या मालाची तपशीलवार तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की ही उपकरणे “औद्योगिक ड्रायर” असल्याचे खोटेच घोषित करण्यात आले होते. मुळात ही उपकरणे लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या विकासात गुंतलेल्या पाकिस्तानी राज्य संस्था राष्ट्रीय विकास संकुलासाठी (एनडीसी) होती.
रासायनिक युद्धासाठीची सामग्री
जानेवारी 2022 मध्ये, पाकिस्तानच्या डीईएसटीओसाठी पाठवण्यात आलेले महत्त्वपूर्ण विद्युत/स्वयंचलित घटक आणि इतर संबंधित यंत्रसामग्रीची एक कन्साइनमेंट मुंबईच्या न्हावा शेवा बंदरावर जप्त करण्यात आली. ‘कोटा मेगाह’ या सिंगापूरच्या झेंड्याखाली प्रवास करणाऱ्या कंटेनर जहाजाने डिसेंबर 2021च्या मध्यात शांघाय बंदरातून चार कंटेनरमध्ये असलेली 80 हजार 390 किलो वजनाची कन्साइनमेंट उचलली होती.
कराचीकडील प्रवासादरम्यान हे जहाज 8 जानेवारी 2022 रोजी न्हावा शेवा येथे पोहोचले. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी हे चारही कंटेनर खाली उतरवले. संबंधित कागदपत्रांमध्ये मेसर्स सुझोऊ कांजिया क्लीन टेक्नॉलॉजी लिमिटेडला माल पाठवणारी कंपनी म्हणून सूचीबद्ध करण्यात आले होते. रावळपिंडी येथील चत्तर पार्कसमोर, स्थळ-3 येथे असलेले पाकिस्तानचे डेस्टो मुख्यालय हा माल स्वीकारणार होते.
संबंधित क्षेत्रातील तज्ञांद्वारे योग्य तपासणी केल्यानंतर, असे आढळून आले की ही उच्च दर्जाची उपकरणे अत्यंत लवकर झीज होणाऱ्या वातावरणात काम करणाऱ्या सुविधेमध्ये वापरण्यासाठी होती आणि रासायनिक युद्ध/अण्वस्त्र युद्ध सामग्रीच्या निर्मिती/उत्पादनासाठी वापरली जाण्याची शक्यता होती.
याच साखळीतील अजून एक कडी जुलै 2021 मध्ये शोधली जाऊ शकते, जेव्हा पाकिस्तान स्पेस अँड अपर ॲटमॉस्फियर रिसर्च कमिशनसाठी (एसयूपीएआरसीओ) असलेल्या दोन क्रायोजेनिक ऑक्सिजन साठवण टाक्यांची कन्सानमेंट निंगबो बंदरातून ‘फेलिक्सस्टो ब्रिज’ जहाजाद्वारे कराचीला पाठवण्यात आली होती.
25 जुलै 2021 रोजी न्हावा शेवा बंदर (मुंबई) येथे हे जहाज रोखण्यात आले. शिपिंगच्या तपशीलानुसार, क्रायोजेनिक टाक्या लाहोरस्थित मेसर्स हांगझोउ चेंगयिंगी एनर्जी टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड मेसर्स घनी ग्लोबल होल्डिंग्सने पाठवल्या होत्या. पाकिस्तानी संरक्षण पुरवठादार ही कन्साइनमेंट उचलणार होता.
भारतीय अधिकाऱ्यांनी या टाक्या जप्त केल्या कारण त्या वासेनार व्यवस्था दस्तऐवज आणि एससीओएमईटी किंवा भारताच्या निर्यात नियंत्रण सूची अंतर्गत प्रतिबंधित आहेत आणि यांचा विशेषतः बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात वापर होतो.
भारतीय अधिकाऱ्यांकडून घेतली जाणारी वाढीव दक्षता आणि प्रभावी गुप्तचर मोहिमांनंतर, चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आता अशा संवेदनशील मालवाहतुकीसाठी असणारे नियमित माल पाठवणारी /माल उचलणारा अशा दोघांचे तपशील लपवत आहेत.
‘भारतीय बंदरे टाळा’
अलीकडील अभ्यासानुसार, पाकिस्तानने संवेदनशील मालवाहतुकीसाठी चिनी मालवाहतूकदारांना भारतीय बंदरांकडे न वळता थेट मालवाहतूक मार्ग वापरण्यास सांगितले आहे. माल उचलणारेही सामान्य मालवाहतूक खर्चाच्या तीन-चार पट अधिक खर्चाचा भार उचलण्यास तयार आहेत. गेल्या वर्षीच्या नौवहन वाहतुकीच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की चिनी बंदरे आणि कराची दरम्यान कोणत्याही भारतीय बंदराकडे न वळता दरमहा डझनभर व्यापारी जहाजांची ये जा सुरू होती.
याव्यतिरिक्त, चीन आणि पाकिस्तान दोघेही चीनच्या विविध भागातून पाकिस्तानमध्ये संवेदनशील/दुहेरी-वापराची सामग्री/उपकरणे वाहून नेण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहेत. पाकिस्तानच्या संरक्षण/धोरणात्मक संस्थांना संवेदनशील/संरक्षण खरेदीसाठी रस्ते वाहतूक हे वाहतुकीचे सर्वात सुरक्षित साधन वाटते. पाकिस्तानी संस्था आता भू-मार्गाचा (चायना मेनलँड काशगर ड्राय पोर्ट-काराकोरम हायवे-सॉस्ट ड्राय पोर्ट-इस्लामाबाद) वापर करण्यासाठी जास्त रक्कम मोजायला तयार आहेत, ज्याची किंमत नौवहन मार्गांपेक्षा किमान चार पटीने जास्त असू शकते.
नितीन अ. गोखले