पर्शियाच्या आखातातील बेटांवरून ‘यूएई’शी वाद, चिनी राजदूताला समज
दि. ०३ जून: पर्शियाच्या आखातातील तीन वादग्रस्त बेटांविषयी चीनने घेतलेल्या भूमिकेवरून नाराज झालेल्या इराणने सोमवारी चीनवर चांगलीच आगपाखड केली. त्याचबरोबर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिनी राजदूताला पाचारण करून संयुक्त अरब अमिरातबरोबर (यूएई) असलेल्या द्वीपक्षीय वादात चीनने दाखल देण्याची गरज अन्ही, अशी समजही दिली. चीन हा इराणचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे, त्यामुळे इराणची ही भूमिका आश्चर्यकारक मानली जात आहे. मात्र, इराणच्या त्राग्यानंतरही चीनने आपली भूमिका कायम ठेवली आहे.
पर्शियाच्या आखातातील ग्रेटर तुंब, लेसर तुंब आणि अबू मुसा या तीन बेटांवरून संयुक्त अरब अमिरात आणि इराणमध्ये वाद आहे. संयुक्त अरब अमिरातचा या तीन बेटांवर दावा आहे. मात्र, ही तिन्ही बेटे १९७१ पासून इराणच्या ताब्यात असून, त्यांनी संयुक्त अरब अमिरातचा दावा फेटाळून लावला आहे. या विविदाबाबत चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची भूमिका ‘यूएई’ने घेतली होती. चीनने ‘युएई’च्या या भूमिकेला आपला पाठींबा जाहीर केला होता. चीनकडून या वादात सातत्याने ‘यूएई’ची बाजू उचलून धरण्यात येत आहे. त्यामुळे इराणने ही जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘यूएई’चा दावा तथ्यहीन असल्याचे इराणचे म्हणणे आहे.
चीन आणि इराणमधील सामरिक भागीदारी पाहता चीनकडून त्यांची भूमिका बदलण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, चीनने आपली पहिलीच भूमिका कायम ठेवली. ‘चीन आणि ‘यूएई’ने प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त पत्रकानुसारच चीनची भूमिका आजही आहे,’असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी इराणच्या भूमिकाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. इराणकडून निंग यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ‘चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सोमवारीही इराण आणि ‘यूएई’दरम्यानच्या वादाबाबत आपल्या पहिल्याच भूमिकेचा पुनरुच्चार करण्यात आला. संवाद आणि सल्लामसलतीच्या माध्यामतून वादावर तोडगा काढावा ही चीनची भूमिका कायम आहे,’ असे इराणने म्हटले आहे. तर, ‘चीन आणि इराण यांचे संबंध अतिशय मजबूत आहेत. उभय देशांतील सामरिक भागीदारीला चीन आणि ही भागीदारी विकसित होण्याला चीन सर्वोच्च प्राथमिकता देतो,’ असेही निंग यांनी स्पष्ट केले.
चीनने डिसेंबर २०२२मध्ये या वादग्रस्त तीन बेटांबाबत शांततामय मार्गाने तोडगा काढण्यासाठी आखाती सहकार्य परिषदेतील देशांसह संयुक्त निवेदन प्रसिद्धीस दिले होते. त्याचबरोबर इराणच्या अणूकार्यक्रमाबद्दलही यात वक्तव्य करण्यात आले होते. इराणचा अणुकार्यक्रम शांततेसाठीच असल्याची खातरजमा करून घेण्यावर या निवेदनात भर देण्यात आला होता. त्यामुळे इराणचा संताप झाला होता. मात्र, ताज्या निवेदनात अणूकार्यक्रमाबद्दल उल्लेख टाळण्यात आला आहे.
विनय चाटी
(रॉयटर्स ‘इनपुट्स’सह)