भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या सैन्यमाघारी घेण्याच्या प्रयत्नांवर बोलताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) परिस्थितीचे ‘संवेदनशील पण स्थिर’ असे वर्णन केले. सोमवारी लष्कर दिनापूर्वी पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी अधोरेखित केले की पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक सारख्या पारंपरिक भागात गस्त आणि चराईचे उपक्रम आता नेहमीप्रमाणे सुरू झाले आहेत.
“आमची तैनाती संतुलित आणि मजबूत आहे; आम्ही कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहोत,” असे जनरल द्विवेदी यांनी आश्वस्त केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पुढील वाटचालीबाबत चर्चा करताना, त्यांनी सीमा पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या महत्त्वावर आणि परिचालन सज्जता वाढविण्यासाठी क्षमता विकासाला चालना देण्यावर भर दिला.
“मी माझ्या सर्व कॉर्प्स कमांडर्सना गस्त आणि चराईच्या संदर्भात उपस्थित योणारे सगळे मुद्दे प्राथमिक स्तरावर हाताळण्यासाठी अधिकार दिले आहेत जेणेकरून हे क्षुल्लक प्रश्न लष्करी पातळीवरच सोडवता येतील. वास्तविक नियंत्रण रेषेवर स्वतःची तैनाती संतुलित आणि मजबूत आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. युद्ध-लढाऊ प्रणालीमध्ये विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा पायाभूत सुविधा आणि क्षमता विकासाला चालना देण्यावर लष्कर लक्ष केंद्रित करत आहे,” असे ते म्हणाले.
तरीही, जनरल द्विवेदी म्हणाले की, या प्रदेशात अजूनही काही प्रमाणात विरोध आहे आणि भारतीय तसेच चिनी सैन्यांमध्ये विश्वास पुनर्प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. विश्वास पुनर्प्रस्थापित होईपर्यंत भारत चीनच्या सीमेवरील सैन्यात कपात करणार नाही यावर त्यांनी भर दिला.
लष्करप्रमुख म्हणाले की, एप्रिल 2020 पासून दोन्ही देशांनी भूप्रदेशात बरेच बदल केले आहेत, सैन्य वाढवले आहे, (शस्त्रे आणि साधनसामुग्री) साठवली आहे आणि सैन्याची संख्या वाढवली आहे. “तर, या अटींमध्ये काही प्रमाणात गतिरोध आहे,” असे ते म्हणाले.
‘जम्मू-काश्मीरमधील सीमापार दहशतवादाला पाकिस्तानचा पाठिंबा’
जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीबाबत जनरल द्विवेदी म्हणाले की, हा प्रदेश स्थिर आणि नियंत्रणात असला तरी सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत.
पाकिस्तानसोबतच्या नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी कायम आहे, मात्र घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानमध्ये दहशतवादी पायाभूत सुविधा अबाधित आहेत कारण हा देश सीमेपलीकडील दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे.
“गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी 60 टक्के दहशतवादी पाकिस्तानचे होते,” असे सांगत जनरल द्विवेदी म्हणाले, “आज जम्मू आणि काश्मीरमधील उर्वरित दहशतवाद्यांपैकी सुमारे 80 टक्के किंवा त्याहून अधिक दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे आहेत.” दहशतवादी कारवायांच्या वाढत्या घटनांमुळे या भागात आणखी 15 हजार सैनिक तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
‘मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात’
मणिपूरमधील अशांततेबाबत बोलताना जनरल द्विवेदी यांनी परिस्थिती स्थिर करण्यासाठी सरकार आणि सुरक्षा दलांच्या सक्रिय प्रयत्नांची प्रशंसा केली.
जनरल द्विवेदी म्हणाले, “सुरक्षा दलांच्या समन्वित प्रयत्नांमुळे आणि सरकारच्या सक्रिय उपक्रमांमुळे मणिपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आली आहे.” ते पुढे म्हणाले की हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत मात्र सैन्य या प्रदेशात शांतता आणण्याचा प्रयत्न करीत आहे आणि राज्यात तैनात असलेल्या सुरक्षा संस्थांमध्ये चांगला समन्वय आहे.
परिवर्तन आणि स्वावलंबनाचा दृष्टीकोन
जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारतीय लष्कराला भविष्यासाठी सज्ज आणि स्वावलंबी दलात रूपांतरित करण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाची रूपरेषा मांडली.
ते म्हणाले, “राष्ट्र उभारणीसाठी अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचा एक संबंधित आणि प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारतीय लष्कराचे ‘आत्मनिर्भर’ भविष्यासाठी सज्ज दलात रूपांतर करताना संपूर्ण सज्जता सुनिश्चित करणे हे माझे ध्येय आहे.”
2047 पर्यंत विकसित देश बनण्याच्या भारताच्या ध्येयाशी त्यांनी या प्रयत्नांचा संबंध जोडत म्हटले की, “2047 पर्यंत विकसित राष्ट्राच्या दृष्टीने आमचे प्रयत्न खरोखरच सुसंगत आहेत.”
रवी शंकर