अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांचे प्रतिपादन
दि. ११ जून: हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोनात्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी फिलिपिन्सने सज्ज असणे गरजचे आहे, असे प्रतिपादन फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांनी मंगळवारी केले. चीनकडून वाढत असलेल्या धोक्याचाही त्यांनी आपली भाषणात उल्लेख केला.
फिलिपिन्सच्या इसाबेला प्रांतात असलेल्या लष्करी तळावर फिलिपिनो लष्करातील अधिकारी आणि जवानांशी बोलताना मार्कोस यांनी बदलती जागतिक भूराजकीय आणि भूसामारिक स्थिती आणि त्याचा फिलिपिन्सवर होणारा संभाव्य परिणाम या विषयी भाष्य केले. ‘आपली तैवानशी असलेली भौगोलिक जवळीक आणि त्यामुळे चीनच्या प्रभावक्षेत्रात असलेल्या आपल्या समावेशामुळे आपण कधीही चीनकडून लक्ष्य होऊ शकतो. त्याचबरोबर हिंद-प्रशांत क्षेत्रात वाढत असलेल्या तणावामुळे कधीही आपल्याला कोणत्याही आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे फिलिपिन्सने सातत्याने आपली लष्करी सिद्धता वाढवीत आव्हानाच्या मुकाबल्यासाठी सज्ज राहिले पाहिजे,’ असे मार्कोस म्हणाले. फिलिपिन्स आपल्या विशेष सागरी क्षेत्र आणि क्षेत्रीय एकतेशी कधीही तडजोड करणार नाही अथवा विनाकारण ती नव्याने रचण्याचा प्रयत्नही करणार नाही. मात्र, राजनयाच्या माध्यमातून आपले हित जपण्याचा प्रयत्न आम्ही करीतच राहू, असेही मार्कोस यांनी स्पष्ट केले.
मार्कोस यांच्या विधानावर फिलिपिन्समधील चिनी दुतावासाने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, चीनकडून सातत्याने दक्षिण चीन समुद्राच्या संपूर्ण क्षेत्रावर हक्क सांगण्यात येत असल्याने अनेक वर्षांपासून चीन आणि फिलिपिन्स यांच्यात या मुद्द्यावरून वाद आहे. या समुद्रातून वर्षाला सुमारे तीन ट्रीलियन अमेरिकी डॉलरचा व्यापार होत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्याही या समुद्रावर वर्चस्व असणे चीनला महत्त्वाचे वाटते. चीनकडून दक्षिण चीन समुद्रावर करण्यात येणारा दावा हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बेकायदा ठरविला असला, तरी चीनकडून हा निर्णय फेटाळण्यात आला आहे.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’वरून)