व्हिएतनामच्या अध्यक्षांचे चीनला आवाहन, चिनी राजदुताशी चर्चा
दि. ११ जून: उभय देशांचे हित जपले जाईल याची काळजी घेऊन सागरी सरहद्दीबाबतच्या वादातून शांततेने तोडगा काढला जावा, असे आवाहन व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांनी चीनला केले आहे. चीन आणि व्हिएतनाम यांच्यात दक्षिण चीन समुद्रातील सागरी सरहद्दीवरून अनेक वर्षांपासून वाद आहे. त्या पार्श्वभूमीवर चिनी राजदुताशी झालेल्या चर्चेत लाम यांनी हा मुद्दा उपस्थित केला, अशी माहिती व्हिएतनामच्या अध्यक्षांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
चीनकडून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगण्यात येत असल्यामुळे व्हिएतनाम, तैवान, फिलिपिन्स अशा दक्षिण चीन समुद्राच्या परिसरात वसलेल्या देशांशी चीनचा सागरी सरहद्दीवरून वाद सुरु आहे. चीन आणि व्हिएतनाम हे दोन साम्यवादी देश परस्परांचे सर्वांत मोठे व्यापारी भागीदार असूनही त्यांच्यातही दक्षिण चीन समुद्रातील सागरी सरहद्दीवरून अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. त्या पार्श्वभूमीवर चीनचे व्हिएतनाममधील राजदूत हनोई शिओंग यांनी व्हिएतनामच्या अध्यक्षांनी पाचारण केले होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत लाम यांनी सागरी सरहद्दीबाबत व्हिएतनामची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही देशांनी परस्परांचे हितसंबंध मान्य केले पाहिजेत, असे लाम या वेळी म्हणाले, अशी माहिती अध्यक्षांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
सागरी सरहद्दीबाबतचा वाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे समाधानकारक तोडगा काढण्यासाठी पुढाकाराने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत लाम यांनी व्यक्त केले. गेल्या गुरुवारी चीनची सागरी सर्व्हेक्षण नौका व्हिएतनामच्या विशेष आर्थिक क्षेत्रात बळजबरीने घुसली होती. त्या पार्श्वभूमीवर लाम यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, चीनचे हे कृत्य अत्यंत चिंताजनक आहे, असे मत व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केले आहे. ‘चीनशी मैत्री आणि सहकार्य विकसित करणे हा व्हिएतनामचा सामरिक निर्णय आहे. व्हिएतनामच्या परराष्ट्र धोरणात चीनला कायमच प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या डिसेंबरमधील व्हिएतनाम दौऱ्यात व्हिएतनामने चीनबरोबर रेल्वेसह अनेक विषयात परस्पर सहकार्याचा करार केला आहे, असेही लाम यांनी हनोई यांना सांगितले. व्हिएतनाममधील शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चीन व व्हिएतनाममध्ये रेल्वेचे जाळे उभारले जाण्याची गरजही लाम यांनी जिनपिंग यांच्याशी बोलताना व्यक्त केली होती.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’वरून)