मार्क्सवादी नेते अनुरा कुमार दिसानायके यांनी आज सकाळी अध्यक्षपदाची शपथ घेतली. शनिवारी श्रीलंकेत झालेल्या मतदानाचा निकाल काल रविवारी जाहीर करण्यात आला. देशाला गेल्या दशकांमधील सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्यानंतर झालेल्या या निवडणुकीत त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याचे आणि नाजूक आर्थिक परिस्थिती सावरत देशाला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी आपण चालना देऊ असे त्यांनी वचन दिले होते.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 55 वर्षीय दिसानायके यांच्याकडे त्यांच्या इतर काही प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे कोणताही राजकीय वारसा नव्हता. मात्र त्यांची दिशा आणि प्राधान्यक्रम स्पष्टपणे दिसून येत आहेत.
“आम्हाला विश्वास आहे की आम्ही या देशाची परिस्थिती बदलू शकतो, आम्ही एक स्थिर सरकार तयार करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. माझ्यासाठी हे पद नाही तर एक जबाबदारी आहे,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “हे यश कोणत्याही एका व्यक्तीच्या कार्याचा परिणाम नाही तर तुमच्यासारख्या हजारो लोकांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे. हा विजय आपल्या सर्वांचा आहे.”
पुढचा मार्ग सुकर नाही, असे सांगत त्यांनी इशारा दिला, “मी गारुडी नाही की जादूगार नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्या मला माहीत आहेत आणि अशाही गोष्टी आहेत ज्या मला माहीत नाहीत. पण मी सर्वोत्तम सल्ला घेईन आणि सर्वतोपरी प्रयत्न करेन.”
ही निवडणूक विक्रमसिंघे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची होती. मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी असलेल्या देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक बनलेली असताना त्यांनी देशाची सूत्रे हाती घेतली. मात्र या संकटातून बाहेर येण्यासाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या कठोर उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे मतदार संतप्त झाले. त्यामुळे या निवडणुकीत विक्रमसिंघे यांना अवघ्या 17 टक्के मतांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
“अध्यक्ष महोदय, येथे मी तुम्हाला खूप प्रेमाने श्रीलंका नावाच्या प्रिय मुलाची भेट देतो, ज्यावर आपण दोघेही खूप प्रेम करतो,” असे 75 वर्षीय विक्रमसिंघे यांनी पराभव स्वीकारताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दिसानायके यांना 5.6 लाख किंवा 42.3 टक्के मते मिळाली, जी 2019 मधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या 3 टक्क्यांपेक्षा बरीच वाढली आहेत. 32.8 टक्के मते मिळाल्याने प्रेमदासा दुसऱ्या क्रमांकावर आले.
दुसऱ्या फेरीची मतमोजणी
पहिल्या दोन उमेदवारांना विजयी घोषित करण्यासाठी आवश्यक असणारी 50 टक्के मते जिंकण्यात उमेदवारांना अपयश आल्यानंतर, श्रीलंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतीपदाचा उमेदवार दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीद्वारे ठरवण्यात आला.
2022 मध्ये परकीय चलनाच्या तीव्र टंचाईमुळे अर्थव्यवस्था ढासळल्यानंतर देशात झालेली ही पहिलीच निवडणूक होती. आर्थिक टंचाईमुळे इंधन, औषध आणि स्वयंपाकाच्या गॅससह इतर आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी पैसे देणे अशक्य झाले होते. या विरोधात झालेल्या निदर्शनांमुळे तत्कालीन राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांना आधी देश सोडावाआणि नंतर राजीनामा देत पदही.
2.9 अब्ज डॉलर्सच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बेलआउटशी संबंधित कठोर उपाययोजनांमुळे त्रस्त असलेल्या मतदारांसमोर दिसानायके यांनी स्वतःला बदलाचे उमेदवार म्हणून सादर केले. याशिवाय सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांच्या धोरणांसाठी नवीन जनादेश मिळावा यासाठी पदभार स्वीकारल्यानंतर 45 दिवसांच्या आत संसद विसर्जित करण्याचे आश्वासन दिले.
“निवडणुकीचा निकाल स्पष्टपणे दर्शवितो की 2022 मध्ये आपण पाहिलेल्या उठावाची परिस्थिती अजून संपलेली नाही, ” असे कोलंबो विद्यापीठातील राजकीय अभ्यासक प्रदीप पीरिस म्हणाले. वेगवेगळ्या राजकीय पद्धती आणि राजकीय संस्था असाव्यात या विचाराच्या अनुषंगाने लोकांनी मतदान केले आहे. एकेडी (डिसानायके या नावाने लोकप्रिय आहेत) या आकांक्षा प्रतिबिंबित करतात आणि लोक त्यांच्याभोवती गोळा झाले आहेत,” असे ते म्हणाले.
आयएमएफच्या वित्तीय उद्दिष्टांवर परिणाम होऊ शकणाऱ्या करांमध्ये कपात करण्याचे वचन देणाऱ्या जाहीरनाम्यामुळे आणि 25 अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या पुनर्रचनेमुळे दिसानायके यांनी गुंतवणूकदारांना चिंतेत टाकले खरे. पण प्रचारादरम्यान, हे सर्व बदल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी सल्लामसलत करून नंतरच केले जातील आणि कर्जाची परतफेड सुनिश्चित करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असे सांगत त्यांनी अधिक तडजोडीचा दृष्टीकोन स्वीकारला.
कोट्यवधी लोक दारिद्रयरेषेखाली
आयएमएफशी झालेल्या करारामुळे त्रस्त झालेल्या श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला तात्पुरती संजीवनी मिळाली आहे. गेल्या तीन वर्षांपैकी यंदा पहिल्यांदाच अर्थव्यवस्थेत वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि चलनवाढही 70 टक्क्यांच्या उच्चांकी पातळीवरून 0.5 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.
मात्र अनेक मतदारांसाठी जगण्यासाठी आवश्यक असणारा दैनंदिन खर्च आवाक्याबाहेर असल्याने हा एक गंभीर मुद्दा बनला आहे कारण लाखो लोक अजूनही गरिबीत अडकले आहेत. अनेकांच्या मते नवा नेता चांगल्या भविष्याची आशा दाखवणारा आहे.
दिसानायके यांनी नॅशनल पीपल्स पॉवर अलायन्सचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, ज्यात त्यांचा मार्क्सवादी-कल असलेला जनता विमुक्ति पेरेमुना पक्ष समाविष्ट आहे.
संसदेत जेव्हीपीच्या केवळ तीन जागा असल्या तरी, भ्रष्टाचारविरोधी कठोर उपाययोजना आणि गरिबांना मदत करण्यासाठी अधिक धोरणे राबण्याच्या दिसानायके यांच्या आश्वासनांमुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे.
श्रीलंकेची अर्थव्यवस्था स्थिर विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी, बाजारपेठांना आश्वस्त करण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि देशाच्या एक चतुर्थांश नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी 2027 पर्यंत श्रीलंकेला आयएमएफचा आर्थिक कार्यक्रम राबवण्याची खात्री करावी लागेल.
“या देशाच्या पतनाचे मूळ कारण खराब व्यवस्थापन आहे. या देशावर राज्य करण्यासाठी जर एक चांगला व्यवस्थापक असेल तर आम्ही भविष्यात यशस्वी होऊ शकतो अशी आमची एक तीव्र भावना आहे,” असे 55 वर्षीय रिअल इस्टेट व्यापारी जनक डायस म्हणाले.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)