सीरियातील अंतर्गत युद्धामध्ये आणि बंडखोरींच्या घटनांमध्ये दर दिवशी एक नवी पाहायला मिळत आहे. अशातच Syria चे अध्यक्ष बशर अल-असाद यांनी रविवारी, शांततापूर्वक सत्ता हस्तांतरणाचे आदेश दिले आणि त्यानंतर त्यांनी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते आपला देश सोडून निघून गेले. त्यामुळे सीरियाचे भविष्य आता अधिक धोक्यात आले असल्याची चर्चा जागतिक पातळीवर विविध स्तरांतून होते आहे.
रविवारी ८ डिसेंबर रोजी इस्लामी बंडखोरांनी दमास्कसवर ताबा मिळवल्याची मोठी घटना घडली. त्यानंतर लगेचच अल-असाद यांना पदच्युत केल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे असाद यांनी दमास्कसमधून रविवारीच उड्डाण केले.
दरम्यान Bashar al-Assad यांना तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा का द्यावा लागला, त्यांच्याच देशातून त्यांना अशाप्रकारे का पळ काढावा लागला, असाद यांची कायदा व सुव्यवस्था यंत्रणा आणि त्यांचे नियोजन नेमके कुठे तोकडे पडले, हे सर्व मुद्दे विचार गंभीरपणे विचार करायला भाग पाडतात. बशर-अल याच्या पतनातून शिकण्यासारखे ५ मुख्य धडे (5 Important lessons) कोणते आहेत, यावर एक नजर टाकूया.
धडा 1
जागतिक पातळीवरील राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, सीरियाचे माजी अध्यक्ष बशर अल-असाद यांनी त्यांच्या देशाच्या लष्करी व्यवस्थेकडे व प्रणालीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. सीरियन सैन्य मुख्यतः त्यातील सैनिकांच्या भरतीवर आणि त्याच्या क्षमता वाढीवर अवलंबून होते. बंडखोर गटांनी लढाई न करता काही प्रमुख शहरे ताब्यात घेतली आणि तिथल्या सीरियन सैनिकांनी पळ काढला किंवा लगेच आत्मसमर्पण केले ही सीरियन लष्करासाठी नामुष्कीची बाब आहे.
ज्यांनी बंडखोरांविरोधात प्रत्यक्ष लढा दिला ते राष्ट्रीय संरक्षण दलांसारखे निमलष्करी गट होते, ज्यांना इराण आणि लेबनॉनमधील स्वतंत्र शिया गटांनी मदत केली होती. मात्र तेही मागील फ्लेअर-अप दरम्यान जितके प्रभावी होते, तितके यावेळी दिसून आले नाहीत. परकीय पाठिंब्याचा अभाव याला कारणीभूत असू शकतो. याशिवाय २०१६-१७ नंतर अनेक सहाय्यक मिलिशिया अन्य ठिकाणी स्थलांतरित झाल्यामुळे त्याचा फटकाही यांना बसलेला असू शकतो.
धडा 2
युद्धस्थितीमध्ये कोणतेही मित्रराष्ट्र हे कायमस्वरूपी सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही, याचा बहुधा बशर अल-असाद यांना विसर पडला असावा, अशी शक्यता राजकीय विश्लेषक नोंदवतात. सीरियातील आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी असाद हे रशिया आणि इराणवर खूप काळ अवलंबून होते. मात्र हे दोन्ही मित्र पक्ष आता त्यांच्या स्वत:च्याच लष्करी समस्यांनी ग्रासले असल्याकारणाने ते सीरियाला समान पातळीवर समर्थन देण्यास कमी पडत आहेत.
तरीही रशियाने सीरियातील बंडखोरांवर अनेक हवाई हल्ले केले. मात्र त्याचा खूप काही फायदा झाला असे म्हणता येणार नाही. कारण जमिनीवरील सैन्याच्या पाठिंब्याशिवाय हे हवाई हल्ले अपूर्ण आहेत. दुसरीकडे विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, सीरियात एकेकाळी सक्रिय असलेला ‘कुख्यात वॅग्नर ग्रुप’ची प्रीगोझिनच्या बंडानंतर मात्र फारशी हालचाल दिसत नाहीये,
इराणने मुख्यतः असादच्या शत्रूंविरुद्ध हिजबुल्लाहचा प्रमुख शस्त्र म्हणून वापर केला, परंतु नुकतेच इस्रायलने हिजबुल्लाचे नेतृत्व नष्ट केले आणि त्यांना सध्याचे समीकरण पुरते बदलून टाकले.
धडा 3
विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, अल-असाद यांच्या सरकारने बहुधा असे गृहीत धरले होते की विसंगत बंडखोर गट हे कधीही एकत्र येणार नाहीत. मात्र त्यांचा हा अंदाज पुरता अयोग्य ठरला. कारण सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसचे (SDF) बंडखोर सैनिक, ज्यांना USA चा पाठिंबा आहे, ज्यांची स्वतंत्र देशाची मागणी आहे ते सर्वजण आणि हयात तहरीर अल-शाम या (HTS) अतिरेकी इस्लामवादी संघटनेचे बंडखोर ज्यांना पूर्वी अल-नुसरा फ्रंट म्हणून ओळखले जात असे हे एकत्र आले.
दरम्यान, यापूर्वी HTS ने केलेल्या एका हल्ल्यानंतर सर्वांनाच याचा अंदाज आला होती की आंतरराष्ट्रीय समर्थनाशिवाय सीरियाचा बचाव अशक्य आहे. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा इतर बंडखोर गटांनी घेतला आणि सीरियाला मोठा झटका दिला. ज्यातूनच अल-असादवर हल्ला करण्यात आल्याचे बोलले जाते.
धडा 4
‘अल-असाद यांच्या मुत्सद्दी शैलीतील आणखी एक महत्वाची त्रुटी म्हणजे, ते शेजारी राष्ट्रांशी तडजोड करण्यात कमी पडले’, असे राजकीय विश्लेषक म्हणतात. तुर्कस्तान – जे सध्या उत्तरेकडील सर्व गैर-कुर्दिश बंडखोर गटांना, जसे की सीरियन नॅशनल आर्मीचे समर्थन करतो, त्यांना काही सवलती देऊन, योग्यप्रकारे तडजोडी करुन असादना जिंकता आले असते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
अंकाराशी संबंध सुधारण्यासाठी आणि कुर्दांसारख्या परस्पर शत्रूंविरुद्ध लढण्यासाठी असद भविष्यात याचा उपयोग करू शकले असते, असेही ते म्हणतात. तथापि, असाद यांनी निर्वासितांना परत स्वीकारण्याची तुर्कीची विनंती स्पष्टपणे नाकारली आणि तुर्कीमध्ये निर्वासितांचे संकट आणखी वाढवण्यासाठी अंकारा समर्थित बंडखोर भागावर हल्ला करुन एर्दोगनची नाराजी ओढावून घेतली, असे विश्लेषक सांगतात.
धडा 5
विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, ‘भू-राजकीय साखळी प्रतिक्रियांना’ कमी लेखण्याची खूप मोठी चूक अल-असाद यांनी केली. दोन आठवड्यांपूर्वी, क्वचितच कोणत्याही भू-राजकीय निरीक्षकाने देशव्यापी लढाईच्या पुनरागमनाची भविष्यवाणी केली होती. मात्र या पार्श्वभूमीवर एका अल- असाद देशातून पळून जातील आणि दमास्कस इतक्या लवकर हार मानेल असा अंदाज कोणीही व्यक्त केला नव्हता.
इस्रायलवरील ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यामुळे एक भू-राजकीय साखळी प्रतिक्रिया निर्माण होईल आणि अखेरीस असादचा पतन होईल असा अंदाज फार कमी लोकांनी व्यक्त केला असेल. मात्र असाद यांच्या देश सोडून जाण्याच्या या भूमिकेमुळे सीरियाचे भविष्यातील अस्तित्व अधिक धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.
सीरियाची वाताहत निश्चित?
सध्या वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, रक्कासह तेल समृद्ध ईशान्य भागात कुर्द आपली स्थिती मजबूत करू शकतात. HTS च्या ताब्यात दमास्कसमध्ये कदाचित नवीन शासन लागू केले जाऊ शकते. याआधी अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची आश्वासने देण्यात आली असली तरी, त्यांना कोणत्या शासन निर्णयांचा पाठपुरावा आणि अंमलबजावणी करायची हे येणारी वेळ आणि सरकारच उघड करेल. दुसरीकडे तुर्की गट जिथे आहेत तिथे राहू शकतात. तुर्कीसाठी बफर झोन प्रदान करणे आणि निर्वासितांचा आणखी मोठा ओघ रोखणे हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
रिपोर्टनुसार, सिरियाच्या लोकसंख्येपैकी सुमारे 80% लोक हे सुन्नी आहेत. ज्यांच्या सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न उद्भवला आहे. कुर्द यांच्या स्वतंत्र राज्याची मागणी असून त्याकरता ते अनिश्चित काळासाठी लढाई करण्यास तयार आहेत. मात्र ही बाब तुर्कांना अस्वीकार्य असल्यामुळे सीरियाच्या अलेप्पोमध्ये दोन गट आधीच आपापसांत भिडले आहेत. यावर, दक्षिण सीरियातील दक्षिणी आघाडी सारखे विविध बंडखोर गट कार्यरत आहेत. हे गट सांप्रदायिक संघर्षाला बढावा देत असतात आणि आधी म्हटल्यानुसार, या गटांमध्ये आपासांत अनेक मतभेद आहेत.
या सगळ्यात भर म्हणजे, सीरियातील भू-राजकीय परिस्थितीही खूप अस्थिर आहे. सीरियाचे शेजारी इस्रायल अनेक आघाड्यांवर लढत असून गोलान हाइट्सचा मुद्दा अजूनही इस्रायल-सीरिया संबंधांमध्ये तणावपूर्ण संबंध कायम आहेत.
दरम्यान असद यांच्यानंतर सिरीयात स्थापन होणाऱ्या नवीन सरकारने निर्वासितांना परत घ्यावे अशी तुर्कीची इच्छा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे अल-असदचे सहयोगी देखील त्यांच्या पुढील हालचालींवर विचार करुन त्यानुसार पुढील निर्णय घेतील असे समजते आहे.
या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या क्रूर संघर्षात मारल्या गेलेल्या आणि विस्थापित झालेल्या सर्वसामान्य नागरिकांचाही नव्या सरकारने विचार केला पाहिजे, अशी मागणी होते आहे.
२०१० च्या रिपोर्टनुसार, सीरियाचे दरडोई उत्पन्न (per capita income) हे अनेक शेजारी राष्ट्रांच्या तुलनेत सर्वाधिक होते. मात्र २०११ पासून, तिथले पाच लाखांहून अधिक लोक मरण पावले आणि कित्येक लाख लोक विस्थापित झाले. UNHCR ने या वर्षाच्या सुरुवातीला अंदाज लावला होता की. सीरियन लोकसंख्येपैकी किमान 90% लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहतात. ही परिस्थिती गेल्या आठवड्यात अधिकच बिघडली असेल यात जराही शंका नाही.
पश्चिम आशियातील बहु-पक्षीय लोकशाहीची शक्यता नेहमीच कमी राहिली आहे, इस्त्राईल ही या प्रदेशातील एकमेव वास्तविक लोकशाही आहे. अरब स्प्रिंगनंतर ट्युनिशियामध्ये बहु-पक्षीय लोकशाही प्रणाली उदयास आली हे एकमेव उदाहरण आहे, परंतु ते देखील अपयशी ठरले आहे.
दुर्देवाने सीरियामध्ये पूर्वीसारखी स्थिरता पूर्णत: परत येणे शक्य नाही. नवीन राज्यकर्ते कशाप्रकारचे निर्णय घेतील यावर सीरियाचे संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे.
नीलांथन निरूथन
(अनुवाद – वेद बर्वे)