एफ-16 व्ही लढाऊ विमानांची पहिली तुकडी या वर्षाच्या अखेरीस मिळेल असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. विमानांचे वितरण होण्यास विलंब होण्यामागे आंतरराष्ट्रीय परिस्थितीत झपाट्याने होणारे “तीव्र चढउतार” जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेने 2019 मध्ये लॉकहीड मार्टिन कंपनीला 8 अब्ज डॉलर्सच्या एफ-16 लढाऊ विमानांची तैवानला विक्री करण्यास मान्यता दिली. या करारामुळे तैवानला एफ-16 ताफ्यातील 200हून अधिक विमाने वितरित केली जातील. ही आशियातील सर्वाधिक संख्या असेल. तैवान हा आपलाच भाग आहे असे मानणाऱ्या चीनकडून वाढलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, या विमानांच्या सहभागामुळे तैवानचे हवाई दल अधिक मजबूत बनेल.
तैवान 141 एफ-16 ए/बी जेट विमानांचे एफ-16 व्ही प्रकारात रूपांतर करत आहे आणि 66 नवीन एफ-16 व्हीची मागणी नोंदवली आहे. या जेट्समध्ये जे-20 स्टेल्थ फायटरसह चिनी हवाई दलाचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करण्यासाठी लागणाऱ्या प्रगत विमान, शस्त्रे आणि रडार यंत्रणांचा समावेश आहे.
मात्र नवीन एफ-16 व्हीएसच्या वितरणात विलंब झाल्याची तक्रारही तैवानने केली आहे. तैवानच्या म्हणण्यानुसार समस्यांमध्ये सॉफ्टवेअर समस्यांचाही समावेश आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने वितरणाबाबत अद्ययावत माहिती देताना म्हटले आहे की नवीन एफ-16व्हीची पहिली तुकडी या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत पाठवली जाणे अपेक्षित होते.
आता मंत्रालय “चौथ्या तिमाहीत (वर्ष अखेरीस) विमानाचे वितरण पूर्ण होईल अशी आशा करत आहे.”
अधिक मागणी, अधिक उशीर
हवाई दलाचे उत्पादन वेळापत्रकावर बारकाईने लक्ष असून 2026च्या अखेरीस वितरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने दल कारखान्यांना भेटी देईल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
लॉकहीड मार्टिनने मात्र या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिलेला नाही.
तैवानने 2022 पासून स्टिंगर विमानविरोधी क्षेपणास्त्रांसारख्या अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांच्या वितरणास विलंब झाल्याचे नमूद केले आहे, कारण उत्पादक कंपनी युक्रेनला रशियन सैन्याशी लढण्यासाठी मदतीचा पुरवठा करत आहेत आणि हा मुद्दा अमेरिकेच्या खासदारांना चिंतेचा विषय वाटत आहे.
तैवानचे हवाई दल चांगले प्रशिक्षित आहे परंतु त्यांच्याकडे असणारी काही लढाऊ विमाने आता जुनी होत आहेत, ज्यात 1997 मध्ये पहिल्यांदा मिळालेल्या मिराज 2000 या फ्रान्सनिर्मित ताफ्याचा समावेश आहे. या आठवड्यात एका प्रशिक्षण सरावादरम्यान यातील एक विमान समुद्रात कोसळले.
गेल्या पाच वर्षांत तैवानजवळ उडणाऱ्या चिनी लष्करी विमानांना रोखण्यासाठी हवाई दलाकडून वारंवार आवश्यक ती पाऊले उचलली गेली आहेत.
तैवानचे नवे सरकार चीनच्या सार्वभौमत्वाचे सर्व दावे नाकारते.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)