चिप संदर्भात वाटाघाटी आणि गुंतवणूक करण्याचे तैवानचे अमेरिकेला वचन

0
गुंतवणूक
तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांचा फाईल फोटो (रॉयटर्स/एन वांग)

चिप उद्योगाबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वाटणाऱ्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेशी बोलण्याचे आणि अमेरिकेची गुंतवणूक वाढवण्याचे तसेच त्यांच्याकडून अधिक खरेदी करण्याचे, संरक्षणावरील खर्च वाढवण्याचे तैवानने शुक्रवारी वचन दिले. 

ट्रम्प यांनी गुरुवारी तैवानृर टीका करताना म्हटले की सेमीकंडक्टर चिप्सचे अमेरिकेतील उत्पादन पुनर्संचयित करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे. मात्र तैवानने अमेरिकेत परत हवा असलेला उद्योग काढून घेतल्याचा दावा त्यांनी परत एकदा केला.

राष्ट्रपती कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तैवानचे अध्यक्ष लाई चिंग-ते म्हणाले की जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळी ही एक परिसंस्था आहे ज्यामध्ये विविध देशांमध्ये कामाची विभागणी महत्त्वाची आहे.

“अध्यक्ष ट्रम्प यांच्या चिंतेची आम्हाला जाणीव आहे,” असे लाई म्हणाले.

“तैवानचे सरकार सेमीकंडक्टर उद्योगाशी संवाद साधेल, त्यांच्याशी चर्चा करेल आणि चांगली धोरणे तयार करेल. त्यानंतर आम्ही चांगले प्रस्ताव आणू  शकू आणि अमेरिकेसोबत पुढील चर्चा करू,” असे ते म्हणाले.

एआय चिप्ससाठी जागतिक युती आणि प्रगत चिप्ससाठी “लोकशाही पुरवठा साखळी” तयार करण्यासाठी अमेरिकेसह लोकशाही देशांनी एकत्र आले पाहिजे, असे लाई म्हणाले.

“आम्हाला सेमीकंडक्टर्स उद्योगामध्ये फायदा आहे हे मान्य असले तरी, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या समृद्धीसाठी योगदान देणे ही तैवानची जबाबदारी म्हणूनही आम्ही त्याकडे पाहतो.”

तैवान हे जगातील सर्वात मोठ्या कंत्राटी चिप मेकर्सचे घर असून, टीएसएमसी ही प्रमुख पुरवठादार कंपनी ॲपल आणि एनव्हीडियासह इतर कंपन्या आणि विकसनशील एआय उद्योगाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

टीएसएमसी अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील नवीन कारखान्यांमध्ये 65 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे, हा प्रकल्प ट्रम्प यांच्या पहिल्या प्रशासन काळात 2020 मध्ये सुरू झाला होता.

टीएसएमसीचे तैपेई-सूचीबद्ध समभाग शुक्रवारी 2.8 टक्क्यांनी घसरून बंद झाले, जे 1.1 टक्क्यांवर बंद झालेल्या व्यापक बाजारपेठेपेक्षा कमी कामगिरी करत होते.

तैवानच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पत्रकारांशी बोलताना सांगितले की जर टीएसएमसीने आपली अमेरिकी गुंतवणूक वाढवणे व्यवहार्य असल्याचे ठरवले तर तैवानचे सरकार अमेरिकेशी बोलणी करण्यास कंपनीला मदत करेल.

टीएसएमसीने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की तैवान आणि अमेरिकेच्या आर्थिक, सुरक्षा आणि संरक्षण अधिकाऱ्यांमधील संवाद सध्या “खूप चांगले” आहेत आणि “अमेरिकेचा भक्कम पाठिंबा आम्हाला आहे”.

चीन दावा करत असलेल्या तैवानशी बहुतेक देशांप्रमाणेच अमेरिकेचेही औपचारिक राजनैतिक संबंध नसले तरी लोकशाही पद्धतीची शासन व्यवस्था असलेल्या या बेटाचा सर्वात महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय समर्थक आणि शस्त्रास्त्र पुरवठादार आहे.

जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या वॉशिंग्टन दौऱ्यानंतर  अमेरिका – जपान यांनी संयुक्त निवेदनाद्वारे “तैवान सामुद्रधुनीमध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्याचे” आवाहन केल्यानंतर ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात तैवानला प्रोत्साहन दिले आणि “आंतरराष्ट्रीय संघटनांमधील तैवानच्या अर्थपूर्ण सहभागाला” पाठिंबा दर्शविला.

मात्र तैवान अमेरिकेला आयातीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात निर्यात करते, जी गेल्या वर्षी 83 टक्क्यांनी वाढली होती, सेमीकंडक्टर्ससारख्या उच्च-तंत्रज्ञान उत्पादनांच्या मागणीमुळे तैवानची अमेरिकेला होणारी निर्यात विक्रमी 111.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली.

अमेरिका हे तैवानचे सर्वात मोठे परकीय गुंतवणुकीचे ठिकाण आहे आणि तैवान हा अमेरिकेचा सर्वात विश्वासार्ह व्यापार भागीदार आहे, असे लाई म्हणाले.

ट्रम्प यांनी यापूर्वी तैवानवर – ज्याला चीनकडून वाढता लष्करी धोका आहे – स्वसंरक्षणावर पुरेसा खर्च न केल्याबद्दल टीका केली आहे का अर्थात ही टीका त्यांनी अमेरिकेच्या इतर अनेक मित्रराष्ट्रांवर देखील केली आहे.

“तैवानने स्वतःचे रक्षण करण्याचा आपला निर्धार दाखवून दिला पाहिजे,” असे सांगून लाई म्हणाले की, त्यांचे सरकार संरक्षण खर्च त्याच्या जीडीपीच्या 2.5 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी या वर्षी विशेष अर्थसंकल्प प्रस्तावित करण्याचे काम करत आहे.

संरक्षण खर्चासह अर्थसंकल्पातील कपातीवरून विरोधी पक्षांचे बहुमत असलेल्या संसदेत त्यांचे विरोधी पक्षाशी खटके उडत आहेत.

“निश्चितच, अधिकाधिक मित्र आणि हितचिंतकांनी आमच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे की तैवानचा स्वसंरक्षणासाठीचा निर्धार कमकुवत झाला आहे की नाही,” असे लाई म्हणाले.

तृप्ती नाथ
(रॉयटर्स)

 


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here