गेल्या काही वर्षांमध्ये जगात कुठे ना कुठे युद्ध, युद्धजन्य परिस्थिती किंवा तणाव उफाळून येताना दिसत आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावानंतर आता चीन आणि तैवान यांच्यातील नव्या तणावाची चर्चा सुरू आहे. अलिकडेच चीनने तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. तैवानच्या एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, लढाऊ विमाने आणि ड्रोनच्या मदतीने चीनने त्यांच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली आहे. यामध्ये चिनी जे-16 लढाऊ विमाने, शांक्सी वाय-8 विमाने आणि ड्रोनसह 21 चिनी लष्करी विमानांचा समावेश होता. यापैकी 17 विमानांनी तैवान सामुद्रधुनीची मध्यरेषा पार केली.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार चिनी जे-16, वाय-8 विमाने आणि ड्रोनसह पीपल्स लिबरेशन आर्मीची 21 विमाने तैवानच्या हद्दीत घुसली. यापैकी 17 विमानांनी मध्यरेषा ओलांडली आणि तैवानच्या उत्तर, मध्य आणि नैऋत्य भागात गस्त घातली.
We detected activities from 21 PLA aircraft, including J-16, Y-8, and drones since 0815 (UTC+8). 17 aircraft crossed the median line and its extension, entered our northern, central, and southwestern ADIZ, and joined PLA vessels for joint combat patrol.
— 國防部 Ministry of National Defense, R.O.C. 🇹🇼 (@MoNDefense) April 20, 2024
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की चीनच्या सैन्याकडून पाठवण्यात आलेली विमाने सकाळी 8.15च्या सुमारास दिसली. त्यात लढाऊ विमाने आणि ड्रोनचा समावेश होता. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 17 पैकी काही विमानांनी तैवान सामुद्रधुनीची मध्यरेषा ओलांडली तर काहींनी वेगवेगळ्या दिशांनी तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली. ही सर्व विमाने आणि ड्रोन चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केलेल्या गस्तीत सहभागी होते. या घुसखोरीला तैवाननेही प्रत्युत्तर दिले आहे.
चिनी विमाने विशेषत: तैवानच्या नैऋत्येकडील हवाई हद्दीत घुसखोरी करतात. 1949 मध्ये गृहयुद्धात तैवान आणि चीन वेगळे झाले, परंतु चीन या बेटावर दावा करत आहे. परिणामी, चीन तैवान सरकारच्या प्रत्येक कृतीला विरोध करते. ते तैवानला एकटे पाडण्यासाठी आणि धमकावण्यासाठी मुत्सद्दी आणि लष्करी बळाचा वापर करत आहेत.
आराधना जोशी
(एएनआयच्या इनपुट्सह)