पंतप्रधान नेतन्याहू यांच्याविरोधात आठवड्याच्या शेवटी निदर्शने सुरू झाली आहेत. इस्रायलमधील हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि ओलीसांना परत आणण्यात नेतन्याहू अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. टाईम्स ऑफ इस्रायलच्या मते, राजधानी तेल अवीवच्या नेसेटच्या बाहेर 100 हून अधिक तंबू उभारण्यात आले असून निदर्शकांनी तिथे तळ ठोकला आहे. नेतन्याहू यांचे टोपणनाव “गुन्हे मंत्री” असे ठेवण्यात आले असून त्यांनी त्वरित पायउतार व्हावे अशी मागणी निदर्शकांनी केली. शेवा, सीझरिया आणि इतर शहरांमधून 1लाखाहून अधिक लोक या निदर्शनांमध्ये सामील झाले होते असा अंदाज आहे.
चार दिवस चालणाऱ्या या आंदोलनाचा रविवार हा पहिला दिवस असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
इस्रायलचे विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांनीही लवकर निवडणुका घेण्याचे आवाहन करत ओलिसांच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याबद्दल सरकारवर टीका केली. एक्सवर प्रतिक्रिया लिहिताना ते म्हणाले , “एकामागून एक, सरकारचे मंत्री आज पहाटेपासून विविध माध्यमांमधून यासंदर्भात आपली प्रतिक्रिया देत आहेत आणि अपहरणकर्त्यांच्या कुटुंबांवर शाब्दिक हल्ले करत आहेत. तुम्ही तुमच्या मनावरचा ताबा गमावलेला आहे. तुमच्या डोळ्यांसमोरून तरुणी, वृद्ध, लहान मुले पळवून नेली जात आहेत. गेल्या सहा महिन्यांत त्यांना घरी आणण्यात तुम्ही अपयशी ठरलात आणि तुम्ही त्यांच्याच कुटुंबाला दोष देता? हे विनाशकारी सरकार घरी गेलेच पाहिजे. आता निवडणूक.”
इस्रायलच्या युती सरकारवरील दबाव वाढू लागला आहे. सांस्कृतिक मंत्री अमिचय एलियाहु यांनी स्थानिक इस्रायली दूरचित्रवाणी वाहिनी चॅनल 12 शी बोलताना या आंदोलनावर जोरदार टीका केली आणि म्हटले की, या निदर्शनांनी “हमासला कोलीत” दिले आहे.
“आयलॉनमधील निषेध हिंसक होता … हमाससाठी ही एक आयतीच संधी आहे. याचा विपरीत परिणाम होत असून आघाडीवरील सैनिकांचे मनोबल खच्ची होत आहे,” असे इलियाहू यांनी चॅनल 12ला सांगितले.
केवळ ओलिसांची कुटुंबेच सरकारसाठी डोकेदुखी निर्माण करत आहेत असे नाही. जेरुसलेममध्ये हरेदी ज्यू आणि ब्रदर्स इन आर्म्स ग्रुपमध्ये लष्करी भरतीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या कुरबुरीमुळे हळूहळू देशाची विभागणी सुरू झाली आहे. हरेदी ज्यू हे अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ज्यू आहेत ज्यांना इतर इस्रायलींप्रमाणे सैन्यात सक्तीने भरती व्हावे लागत नाही. गाझामध्ये लढाई सुरू असताना, इतर ज्यूंना हा प्रकार अपमानास्पद वाटायला लागला आहे. त्यातून ब्रदर्स इन आर्म्स – आयडीएफमधील विविध युनिट्समधील राखीव पुरुष आणि महिलांची संघटना – त्यांच्या विरोधात हल्ले करू लागली आहे.
ऑर्थोडॉक्स ज्यू पक्ष हा नेतान्याहू यांच्या उजव्या विचारसरणीच्या आघाडीचा भाग आहेत हे लक्षात घेता, सरकार आता राखीव लष्करी संघटनेची मदत घेत आहे हे पाहून आश्चर्य वाटायला नको. जर ते युतीमधून बाहेर पडले तर देशाला नव्याने निवडणुक घ्यावी लागेल आणि या निवडणुकीत नेतान्याहू लक्षणीयरीत्या पिछाडीवर असतील. त्यामुळेच सरकार ठामपणे हरेमच्या बाजूने उभे आहे ही काही नवलाची गोष्ट नाही. टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन गवीर यांनी रविवारी सांगितले की, ब्रदर्स इन आर्म्स संघटनेने “गृहयुद्ध आणि इस्रायली समाजाचे विभाजन घडवून आणण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत.”
या सर्व परिस्थितीत, पंतप्रधानांनी कैरोला जाण्यासाठी शिष्टमंडळाच्या प्रस्थानास मान्यता दिल्याचे मानले जाते जेथे इस्रायल आणि हमास यांच्यात अप्रत्यक्ष चर्चा होणार आहे. इस्रायली शिष्टमंडळ मायदेशी येत असताना कतारमधील चर्चा असफल ठरल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात ही चर्चा होणार आहे. मात्र ही चर्चा आतापर्यंत ठप्पच आहे कारण सर्व उत्तर गाझावासियांना घरी परतण्याची परवानगी द्यावी तसेच गाझामधून इस्रायलने संपूर्ण माघार घ्यावी या मागणीवर हमास ठाम आहे. अर्थात या दोन्ही मागण्या इस्रायलने आतापर्यंत फेटाळून लावल्या आहेत.
पण देशांतर्गत होणारा विरोध आणि इस्रायलवरील वाढता आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे पंतप्रधानांना यावेळी पुनर्विचार करावा लागेल. आदल्याच दिवशी पत्रकार परिषदेच्या शेवटी गाझाबद्दल जगाचे मत इस्रायलच्या विरोधात का आहे? या प्रश्नावर नेतान्याहू यांनी उत्तर दिले की, “गेल्या काही महिन्यांत जे घडले ते म्हणजे 7 ऑक्टोबरचे भयंकर हत्याकांड त्वरित विसरले गेले आणि संपूर्ण जग आता आपल्याच विरोधात उभे आहे. येथे आणि परदेशात असे लोक आहेत जे म्हणतात की कदाचित यात काहीतरी आहे; कदाचित आम्ही खरोखर ठीक नाही आहोत.
नेतन्याहू पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले की, या “चांगल्या लोकांनी” विचार केला पाहिजे की “सीरियन गृहयुद्धात किंवा येमेनच्या अंतर्गत युद्धात आणि इतरत्र कोट्यवधी लोकांची झालेली हत्या किंवा त्यांच्या घरातून निर्वासित केल्याबद्दल एक शब्दही का बोलला गेला नाही? आणि अगदी कमी संख्येने – प्रत्येक मरण पावलेला नागरीक – असे प्रत्येक नुकसान अर्थातच एक शोकांतिका आहे – परंतु त्याची तुलना होऊ शकत नाही; लाखो लोकांच्या नरसंहाराच्या तुलनेत आपण फारच कमी संख्येबद्दल बोलत आहोत… हे कसे होऊ शकते की हा नरसंहार फक्त इस्रायल करत असल्याचे ते दावे या सर्व वाईट गोष्टींवर विश्वास कसा ठेवला जातो?
अश्विन अहमद