अमेरिकेतील विविध शहरांत ICE एजंट्सविरोधात हजारो लोकांची आंदोलने

0
ICE

दोन अमेरिकन नागरिकांच्या गोळीबारात झालेल्या मृत्यूनंतर, मिनेसोटा राज्यातून फेडरल इमिग्रेशन एजंट्स (ICE) मागे घेण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी, मिनियापोलिसमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आणि संपूर्ण अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयांमधून ‘वॉकाऊट’ (वर्ग सोडून बाहेर येणे) केले.

कॅलिफोर्नियापासून न्यूयॉर्कपर्यंत विद्यार्थी आणि शिक्षकांनी राष्ट्रीय निषेध दिनानिमित्त वर्गांवर बहिष्कार टाकला. ट्रम्प प्रशासन ‘ऑपरेशन मेट्रो सर्ज’कमी करणार की नाही, याबद्दल संभ्रमाचे संदेश येत असतानाच हे आंदोलन झाले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील इमिग्रेशन धडक मोहिमेअंतर्गत, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिनियापोलिस परिसरात 3,000 ICE एजंट्स तैनात केले आहेत, जे लष्करी वेशात रस्त्यावर गस्त घालत आहेत. हे संख्याबळ मिनियापोलिस पोलीस विभागाच्या तुलनेत पाचपट मोठे आहे.

ही वाढीव फौज आणि ‘यू.एस. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट’ (ICE) कडून वापरल्या जाणाऱ्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी, गोठवणाऱ्या थंडीत मिनियापोलिसच्या डाउनटाउनमध्ये हजारो लोक जमले होते. यामध्ये लहान मुलांसह अनेक कुटुंबं, वृद्ध दांपत्ये आणि तरुण कार्यकर्त्यांचा समावेश होता.

याच महिन्यात, फेडरल इमिग्रेशन एजंट्सच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या ॲलेक्स प्रेट्टी आणि रेनी गुड या दोन अमेरिकन नागरिकांच्या निवासस्थानांजवळील मिनियापोलिसमधील एका परिसरात, स्थानिक शाळांमधील सुमारे 50 शिक्षक आणि कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते.

रॉक स्टार ब्रूस स्प्रिंगस्टीन यांनीही या निषेधाला आपला पाठिंबा दिला. मिनियापोलिसमध्ये रेनी गुड आणि ॲलेक्स प्रेट्टी यांच्यासाठी आयोजित एका निधी संकलन कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आणि आपले “स्ट्रीट्स ऑफ मिनियापोलिस” हे नवीन गाणे सादर केले.

हे आंदोलक केवळ मिनेसोटापुरते मर्यादित नव्हते. “काम नाही, शाळा नाही, खरेदी नाही. ICE ला निधी देणे थांबवा” या घोषणेखाली 46 राज्यांमध्ये आणि न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, शिकागो आणि वॉशिंग्टन सारख्या प्रमुख शहरांमध्ये 250 आंदोलनांचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला होता.

दुसरीकडे, ट्रम्प यांनी होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांच्यावर विश्वास दर्शवला, ज्यांचा विभाग ICE चे कामकाज पाहतो. टीकाकारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले की, नोएम यांनी “खरोखरच उत्तम काम केले आहे!” आणि असा दावा केला की, “मला वारसाहक्काने मिळालेली सीमा आपत्ती आता सुधारली आहे.”

स्थानिक प्रमुखांना पद सोडण्यास भाग पाडले

दरम्यान, मिनियापोलिसमधील घटनांचे पडसाद फेडरल सरकारमध्येही उमटले.

या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन सूत्रांनुसार, मिनियापोलिस एफबीआय (FBI) कार्यालयाचे कार्यवाहक प्रमुख जॅरड स्मिथ यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. एका सूत्रानुसार, स्मिथ यांची रवानगी वॉशिंग्टन येथील एफबीआय मुख्यालयात करण्यात आली आहे.

मिनियापोलिस एफबीआय कार्यालय या फेडरल मोहिमेत तसेच प्रेट्टी गोळीबार प्रकरण आणि चर्चमधील निदर्शनांच्या तपासात सहभागी होते, ज्या निदर्शनांमुळे माजी सीएनएन (CNN) अँकर डॉन लेमन यांच्यावर गुन्हे दाखल झाले.

एफबीआयने शुक्रवारी, लेमन यांना अटक केली आणि न्याय विभागाने त्यांच्यावर या महिन्याच्या सुरुवातीला सेंट पॉल, मिनेसोटा येथील एका चर्चमध्ये निदर्शनादरम्यान फेडरल कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला. लेमन यांच्या वकिलांनी या कारवाईला ‘प्रेस स्वातंत्र्यावर हल्ला’ असे म्हटले आहे.

दोषी नसल्याचा दावा केल्यानंतर लेमन यांनी पत्रकारांना सांगितले की, “माझा आवाज दाबला जाणार नाही. मी न्यायालयात माझी बाजू मांडण्यास उत्सुक आहे.”

न्यूयॉर्क टाइम्सने एका अंतर्गत ICE मेमोचा हवाला देत शुक्रवारी अहवाल दिला की, फेडरल एजंट्सना या आठवड्यात सांगण्यात आले आहे की त्यांना वॉरंटशिवाय अटक करण्याचे व्यापक अधिकार आहेत. यामुळे खालच्या स्तरावरील ICE एजंट्सना संशयित विनापरवाना स्थलांतरितांना पकडण्याची क्षमता वाढली आहे.

प्रशासनाच्या इमिग्रेशन धोरणाविरुद्धच्या या रोषामुळे अमेरिकन सरकारचे कामकाज अंशतः ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे, कारण काँग्रेसमधील डेमोक्रॅट्सनी होमलँड सिक्युरिटी विभागाला निधी देण्यास विरोध केला आहे.

जनमताचा कल बदलला

मिनियापोलिसच्या रस्त्यावर सशस्त्र आणि नकाबपोश एजंट्सच्या आक्रमक कार्यपद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे, ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाला असलेल्या जनमानसातील पाठिंब्याने त्यांच्या दुसऱ्या टर्ममधील निचांकी पातळी गाठली आहे, असे नुकत्याच झालेल्या रॉयटर्स/इप्सोसच्या पोलमध्ये दिसून आले.

ICE मोहिमेबाबतचा आक्रोश वाढल्यानंतर, ट्रम्प यांचे ‘बॉर्डर झार’ टॉम होमन यांना मिनियापोलिसला पाठवण्यात आले. त्यांनी सांगितले की, त्यांचे अधिकारी आता सरसकट कारवाई करण्याऐवजी विशिष्ट टार्गेट्सवर लक्ष केंद्रित करतील, ज्यामुळे निदर्शकांशी होणारे संघर्ष टळतील.

निदर्शकांच्या भावनांना दुजोरा देत, मिनेसोटाचे डेमोक्रॅटिक गव्हर्नर टिम वॉल्झ यांनी शुक्रवारी हे खरोखर घडेल का यावर शंका उपस्थित केली आणि अधिक तीव्र बदलांची गरज असल्याचे सांगितले.

“मिनेसोटाच्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फेडरल सरकारने आपली फौज कमी करणे आणि ही क्रूर मोहीम थांबवणे,” असे वॉल्झ यांनी ‘X’ वर म्हटले.

ट्रम्प यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, त्यांना “परिस्थिती थोडी शांत करायची आहे,” परंतु गुरुवारी पत्रकारांनी त्यांना माघार घेण्याबद्दल विचारले असता, त्यांनी “अजिबात नाही” अशी प्रतिक्रिया दिली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleव्हेनेझुएला: कैद्यांसाठी माफी कायदा आणि तुरुंगातील स्थिती सुधारण्याचा प्रस्ताव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here