इस्रायलने बैरुतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख कमांडर ठार

0
इस्रायलने
20 सप्टेंबर 2024 रोजी लेबनॉनच्या बैरुतच्या दक्षिणेकडील उपनगरात इस्रायली हल्ल्याच्या ठिकाणी लोक आणि लष्करी सदस्य. यामध्ये हिजबुल्लाचा एक प्रमुख कमांडर मारला गेला. (मोहम्मद अझाकिर/रॉयटर्स)

इस्रायलने शुक्रवारी बैरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा एक प्रमुख कमांडर मारला, असे लेबनॉनमधील दोन सुरक्षा सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यांमुळे इस्रायल आणि इराण समर्थित गट हिजबुल्ला यांच्यात गेल्या वर्षभर चाललेल्या संघर्षात आणखी वाढ झाली आहे.
या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाचा ऑपरेशन्स कमांडर इब्राहिम अकील याला लक्ष्य करण्यात आले. अकील हिजबुल्लाच्या सर्वोच्च लष्करी संस्थेत काम करतो, असे लेबनॉनमधील दोन सुरक्षा सूत्रांनी आणि इस्रायली आर्मी रेडिओने सांगितले.
एका सुरक्षा सूत्राने सांगितले की, हिजबुल्लाच्या एलिट रादवान युनिटच्या सदस्यांसोबत बैठक सुरू असताना अकीलला ठार मारण्यात आले.

या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला आणि 59 जण जखमी झाले, असे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने प्राथमिक आकडेवारीत म्हटले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला हिजबुल्लाहवर झालेल्या अभूतपूर्व हल्ल्यानंतर ते सावरत असतानाच या हल्ल्यामुळे हिजबुल्लाहला आणखी मोठा धक्का बसला आहे. आधी झालेल्या हल्ल्यांमध्ये त्याचे सदस्य वापरत असलेले पेजर आणि वॉकी टॉकीजचा स्फोट करण्यात आला होता. या स्फोटात 37जण ठार झाले तर हजारो जखमी झाले. हा हल्ला इस्रायलने केला होता असे प्रामुख्याने मानले जात असले तरी , इस्रायलने त्याच्या सहभागाबाबत दुजोरा किंवा नकार दिलेला नाही.

नागरी संरक्षण विभागाची बचाव पथके शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात कोसळलेल्या दोन इमारतींच्या ढिगाऱ्याखालील लोकांचा शोध घेत आहेत.

इस्रायली सैन्याने अधिक तपशील न देता बैरुतमध्ये “लक्ष्यित हल्ला” केल्याचे सांगितले.

इस्रायलने बैरूतमधील प्रमुख हिजबुल्ला लष्करी कमांडरला ठार करण्याची ही दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील दुसरी घटना आहे. जुलैमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात गटाचा सर्वोच्च लष्करी कमांडर फुआद शुक्र ठार झाला.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वेबसाइटनुसार, 1983 मध्ये लेबनॉनमध्ये नौसैनिकांवर करण्यात आलेल्या प्राणघातक बॉम्बहल्ल्यात अकीलचा सहभाग होता. त्यामुळे त्याच्या डोक्यावर अमेरिकेने 7 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे.

बैरुत हल्ल्यानंतर उत्तर इस्रायलमध्ये इशारा देणारे सायरन वाजल्याची माहिती इस्रायली सैन्याने दिली. इस्रायली माध्यमांनी उत्तर इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात रॉकेटद्वारे गोळीबार झाल्याची बातमी दिली.

उत्तर इस्रायलमधील मुख्य गुप्तचर मुख्यालय, जिथे या हत्यांचा कट रचला गेला, त्यावर कात्युशा रॉकेट डागल्याचे हिजबुल्लाने म्हटले आहे.

व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, बैरुत हल्ल्यापूर्वी अमेरिकेला दिलेल्या इस्रायली सूचनेबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नव्हती. तसेच अमेरिकन नागरिकांना लेबनॉनला न जाण्याचे किंवा ते आधीच तेथे असतील तर तिथून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा जोरदार आवाहन करण्यात आले आहे.

लेबनॉन आणि इस्रायलच्या सीमेचा संदर्भ देत किर्बी म्हणाले, “निळ्या रेषेवर युद्ध अपरिहार्य नाही आणि ते रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत राहू.”

नुकसान झालेल्या आणि जळालेल्या गाड्या

हल्ल्याच्यावेळी आम्ही बैरूतमध्ये विमानाचा आवाज ऐकला आणि हल्ला झाल्यानंतर त्या भागातून धुराचे ढग दिसले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

“इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) बैरुतमध्ये लक्ष्यावर नेमका हल्ला केला. सध्या होम फ्रंट कमांडच्या संरक्षणात्मक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणताही बदल झालेला नाही,” असे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

जारी करण्यात आलेल्या फुटेजमध्ये हल्ल्यामुळे मोडकळीला आलेली इमारत तसेच रस्ता ढिगाऱ्यांनी आणि जळालेल्या गाड्यांनी भरलेला दिसत आहे.

जवळजवळ वर्षापूर्वी संघर्ष सुरू झाल्यापासून गुरुवारी रात्री इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये सर्वात तीव्र स्वरूपाचे हवाईहल्ले केले.

इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील वर्षभराचा संघर्ष हा 2006 मधील युद्धानंतरचा सर्वात भीषण संघर्ष आहे. सीमेच्या दोन्ही बाजूंना राहणाऱ्या हजारो नागरिकांना घरे सोडावी लागली आहेत.

हा संघर्ष मुख्यत्वे सीमेजवळच्या किंवा त्या नजीकच्या भागात आटोक्यात आला असला तरी, या आठवड्यातील हल्ल्यानंतर हा संघर्ष परत एकदा आणखी तीव्र होऊ शकतो. यामुळे चिंता वाढली आहे.

इस्रायली लष्कराने सांगितले की लष्करप्रमुख जनरल हर्झी हलेवी यांनी शुक्रवारी सकाळी उत्तर कमांडचे प्रमुख आणि इतर विभागीय कमांडर यांची भेट घेतली.

इस्रायली वृत्तपत्रांच्या बातम्यांनुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी होणारा त्यांचा न्यूयॉर्क दौरा एका दिवसाने पुढे ढकलला आणि ते बुधवारी येतील.

ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी यांनी शुक्रवारी लेबनॉनमधील ताज्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सीओबीआर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरकारच्या आपत्कालीन समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here