अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमधील निर्वासितांसाठीचे कार्यवाहक मंत्री खलील उर-रहमान हक्कानी बुधवारी राजधानी काबूलमधील मंत्रालयाच्या मुख्यालयात झालेल्या स्फोटात ठार झाला.
“आम्ही एक अतिशय शूर मुजाहिद गमावला,” अशी प्रतिक्रिया त्याचा पुतण्या अनस हक्कानी याने रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केली. मुजाहिद ही तालिबानी संज्ञा त्याच्या लढवय्यांसाठी वापरली जाते, ज्याचा अर्थ पवित्र योद्धा असा आहे. “आम्ही त्याला आणि त्याच्या बलिदानाला कधीही विसरणार नाही,” असेही अनस याने सांगितले.
तालिबानच्या अंतर्गत मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सीबीएस न्यूजला सांगितले की, हक्कानी त्याच्या किमान चार सहकाऱ्यांसह या आत्मघातकी हल्ल्यात ठार झाला. मारेकऱ्याने शारीरिक अपंगत्व असलेल्या पाहुणा म्हणून वेषांतर केले होते. हक्कानी नमाज पढायला कार्यालयातून बाहेर पडत असताना स्फोटकांनी भरलेल्या साधनाने त्यावर हल्ला करण्यात आला, असे ते म्हणाले.
आतापर्यंत कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी, तालिबानला सत्ता हाती घेतल्यापासून, मुख्यतः इसिस किंवा इस्लामिक स्टेटद्वारे, त्यांच्या वरिष्ठ मंत्री आणि सुरक्षा दलांवर वारंवार हल्ले केले जात आहेत.
प्रमुख तालिबान नेता आणि अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी याचे काका आणि कुख्यात हक्कानी नेटवर्कचा दिवंगत संस्थापक जलालुद्दीन हक्कानी याचा भाऊ हक्कानी, 2021 मध्ये परदेशी सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानच्या अंतरिम सरकारमध्ये मंत्री झाला.
ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने देशात सत्ता परत मिळवल्यानंतर खलीलचा मृत्यू हा अफगाणिस्तानमधील सर्वात मोठा अपघात आहे.
घोषित दहशतवादी
अफगाणिस्तानमधील आघाडीच्या सैन्यावर झालेल्या मोठ्या हल्ल्यांमागे हक्कानी नेटवर्कचा हात होता आणि 2011 मध्ये खलीलला अमेरिकेने विशेष जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते.
तालिबानवर परिणाम
हक्कानीचा मृत्यू हा तालिबान सरकारसाठी मोठा धक्का देणारा ठरेल, कारण सध्या तो देशातील निर्वासितांचे संकट हाताळण्यासाठी काम करत होता.
गेल्याच महिन्यात, त्याने अफगाण निर्वासितांशी गैरवर्तन केल्याबद्दल शेजारील देशांवर टीका केली होती आणि परदेशात सुरक्षितता शोधत असलेल्या अफगाणांची हकालपट्टी थांबवण्याचे आवाहनही केले होते. अफगाण निर्वासितांनी मायदेशी परतावे यासाठी हक्कानीने जाहीर आवाहनही केले होते आणि शरिया कायद्यांतर्गत काम करणाऱ्या तालिबानच्या प्रशासनामुळे देशात सुरक्षा आणि स्थिरता सुनिश्चित झाली असल्याचे त्याने ठासून सांगितले होते.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)