खलिस्तानी फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे आम्ही आरोप केले तेव्हा आमच्याकडे नव्हते अशी धक्कादायक कबुली कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दिली आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) ट्रुडो यांच्या अशा वर्तनामुळे भारत-कॅनडा संबंधांना नुकसान पोहोचवण्यासाठी त्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरले आहे.
कॅनडाच्या अंतर्गत प्रक्रिया समितीसमोर ट्रुडो यांनी हा गौप्यस्फोट केला. निज्जर हत्या प्रकरणातील भारताच्या सहभागाबाबतचे आरोप फक्त गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केल्याचं त्यांनी कबूल केलं आहे. भारतानं जस्टिन ट्रुडो यांच्या या कबुलीचा निषेध करताना आम्ही सुरुवातीपासून जे सांगत होतो, तेच खरं ठरलं, असं म्हटलं आहे.
“आज आम्ही जे ऐकले आहे ते आम्ही सातत्याने सांगत असलेल्या गोष्टीला दुजोरा देते “कॅनडाने भारत आणि भारतीय राजदूतांवर लावलेल्या गंभीर आरोपांच्या समर्थनार्थ आम्हाला त्यांनी कोणताही पुरावा सादर केलेला नाही.” या बेपर्वाईच्या वर्तनामुळे भारत-कॅनडाच्या संबंधांना पोहोचलेल्या नुकसानाची जबाबदारी केवळ पंतप्रधान ट्रुडो यांच्यावर आहे, असे ट्रुडो यांनी त्यांची साक्ष संपल्यानंतर लगेचच रात्री उशिरा भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या प्रतिसादात्मक निवेदनात म्हटले आहे.
निज्जर हत्येतील आरोप जाहीर करण्यापूर्वी आम्ही त्वरित भारत सरकारसोबत याहंदर्भात संवाद साधला. भारत सरकारनं आमच्याकडे पुरावे मागितले. पण तेव्हा आमच्याकडे सबळ पुरावा नव्हता, तर फक्त गुप्तचर यंत्रणेकडून आलेली माहिती होती,” असे ट्रुडो यांनी अंतर्गत प्रक्रिया समितीसमोर बोलताना सांगितले.
सुनावणीदरम्यान ट्रुडो यांनी कबुली दिली, “त्यांनी (भारताने) आम्हाला विचारले की तुम्हाला किती माहिती आहे? यावर तुमच्याकडे असलेला पुरावा आम्हाला द्या आणि आमचा प्रतिसाद होता, “ते तुमच्या सुरक्षा यंत्रणेमध्येच आहेत, तुम्ही किती गुंतले पाहिजे हे त्यांना किती माहीत आहे यावर तुम्ही ठरवायला पाहिजे.”
इंटरपोलची नोटीस ज्याच्या नावावर होती त्या फरार आरोपी निज्जरच्या हत्येत सरकारी एजंट किंवा राजनैतिक अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे भारताने स्पष्टपणे नाकारले आहे. कॅनडाने निज्जर प्रकरणात भारतीय राजदूतांचे नाव ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ म्हणून घेतल्यानंतर भारताने कॅनडातील आपले राजदूत आणि इतर पाच राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशात परत बोलावले तर दिल्लीतील सहा कॅनडियन राजनैतिक अधिकाऱ्यांची भारताने हकालपट्टी केली.
कॅनडातील भारतीय उच्चायुक्त आणि इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय लक्ष्य करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताच्या निवेदनात ट्रुडोच्या सरकारवर अतिरेकी आणि हिंसाचाराचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला असून कॅनडातील भारतीय राजदूत आणि समुदायाच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी हिंसक अतिरेक्यांना आश्रय दिल्याचा दावा केला.
ट्रुडो यांना भारताविरुद्ध टोकाची, गैर-राजनैतिक भूमिका घेण्यास कशामुळे प्रवृत्त केले जात आहे? हे काही वैयक्तिक आहे का? किंवा भारताकडे बोट दाखवणे इतके सहजसोपे आहे का?
कॅनडातील निवडणुका फार दूर नाहीत. अशा वेळी चीनकडून कॅनडातील परदेशी हस्तक्षेपाच्या चौकशीच्या निकालापासून लक्ष विचलित करणे हा कदाचित ट्रुडो यांच्या भारताविरुद्धच्या टीकेचा उद्देश असू शकतो. मात्र तो त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अधिक हानीकारक ठरू शकतो.
कोणत्याही प्रकारे, भारताने त्यांच्या सरकारचे आरोप मान्य करण्यास नकार दिल्याने ट्रुडो यांच्या डावपेचांचा उलटा परिणाम झाला आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)