अमेरिकेने युक्रेनला शस्त्र पुरवठा सुरु करताच, रशियाचा कीववर हल्ला

0

गुरुवारी पहाटे, रशियन ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या जोरदार हल्ल्यामुळे कीव शहर हादरले. या हल्ल्यात 2 जण ठार, तर 13 जण जखमी झाले असून, नागरी व व्यावसायिक इमारतींमध्ये आगी लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकेने युक्रेनला शस्त्र पुरवठा सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे.

हा हल्ला रशियाच्या वाढत्या आक्रमकतेचा भाग होता. रशियाने शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागल्याने युक्रेनचे हवाई संरक्षण ताणले गेले असून, हजारो नागरिकांना रात्रीतून सतत बाँबस्फोटांच्या निवाऱ्यांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे.

“निवासी इमारती, वाहने, गोदामे, कार्यालये आणि अन्य अनिवासी इमारती आगीच्या विळख्यात आहेत,” असे कीवच्या लष्करी प्रशासनप्रमुख तिमूर त्काचेंको यांनी टेलिग्रामवर सांगितले.

हल्ल्याची संपूर्ण व्याप्ती लगेचच स्पष्ट झाली नव्हती. रशियाकडून या हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. याच्या आदल्या दिवशी रशियाने एका रात्रीत सर्वाधिक ड्रोन डागले होते, हे लक्षात घेता ही कारवाई त्याच मालिकेचा भाग होती.

अमेरिकेकडून अधिक शस्त्रांची मदत

या आठवड्याच्या सुरुवातीस, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, युक्रेनला अधिक संरक्षणात्मक शस्त्र पुरवठ्याचे वचन दिल्यानंतर, अमेरिकेने आधीच तोफांचे शेल्स आणि मोबाइल रॉकेट आर्टिलरी क्षेपणास्त्रे युक्रेनला पाठवायला सुरुवात केली आहे, अशी माहिती दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी, बुधवारी रोममध्ये ट्रम्प यांचे युक्रेनसाठीचे दूत कीथ केलॉग यांच्याशी “महत्त्वपूर्ण” बैठक घेतली. ही बैठक युक्रेनच्या पुनर्बांधणी परिषदेसाठी आयोजित करण्यात आली होती.

ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, यांच्याबद्दलची वाढती नाराजी व्यक्त केली असून, पुतिन अमेरिकेच्या युद्ध समाप्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये खोटेपणाचे खेळ खेळत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.

गुरुवारी मलेशियाच्या क्वालालंपूर येथे आयोजित ASEAN परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट होणार असल्याचे, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तसेच रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

गुरुवारी झालेल्या रशियन हल्ल्यांमुळे कीवमध्ये स्फोटांचे मोठे हादरे जाणवले, असे साक्षीदारांनी सांगितले. व्हिडीओंमध्ये खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, इमारतींचे अवशेष, जळून खाक झालेल्या गाड्या दिसून आल्या. शहराच्या 10 पैकी 6 जिल्ह्यांमध्ये हानी झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कीवमधील शेव्हचेंकिवस्की जिल्हा, जो त्याच्या उच्चभ्रू रेस्टॉरंट्स, कला गॅलऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या बार्ससाठी प्रसिद्ध आहे, तेथे निवासी इमारतींना मोठी हानी झाली आहे, असे जिल्हा प्रमुखांनी सांगितले.

शहराच्या काही भागांत दाट धूर पसरलेला असून, त्यामुळे तीन मिलियन लोकसंख्येच्या शहरावर उगवती सूर्यकिरणेही धूसर झाल्याचे साक्षीदारांनी सांगितले. कीवमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा तब्बल चार तास चालू होता, अशी माहिती युक्रेनच्या हवाई दलाने दिली.

“शेल्टरमधून घरी परतल्यावर खिडक्या बंद ठेवाव्यात, धूर खूप पसरला आहे,” अशी चेतावणी त्काचेंको यांनी दिली.

युक्रेनच्या पूर्वेकडील फ्रंटलाइन शहर कोस्त्यांतिनिव्का येथे, बुधवारी उशिरा झालेल्या रशियन हवाई हल्ल्यात, 3 जण ठार झाले आणि 1 जण जखमी झाल्याचे, राष्ट्रीय आपत्कालीन सेवांनी सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleयेत्या काही आठवड्यांत Israel-Hamas शस्त्रसंधी होण्याची शक्यता- सूत्र
Next articleKPMG Report Highlights Ten Game-Changing Trends Shaping Aerospace & Defence in 2025

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here